औरंगाबाद (Aurangabad) : रस्त्यांच्या कामासंदर्भात प्रशासनाने बोलावलेल्या पहिल्या टप्प्यातील १०० कोटी रुपयांच्या टेंडरला प्रतिसाद मिळाला नाही. केवळ एका कंपनीने टेंडर दाखल केले. प्रशासनाने स्मार्ट सिटीतील रस्ते कामात आयआयटी-मुंबईची (IIT Mumbai) तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केल्यानेच आधीच्या ठेकेदाराची वैतागवाडी वाढल्याचे पाहत इतर ठेकेदारांनी या कामांकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. (Aurangabad Municipal Corporation)
अधिकारी म्हणतात कुठलेही राजकारण नाही
दुसरीकडे मर्जीतील ठेकेदारांना हे काम मिळावे यासाठी काही राजकारणी अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याबाबत विचारणा केली असता, यात काही तथ्थ नसल्याचे म्हणत शासन निर्णयानुसारच ऑनलाईन टेंडर प्रक्रिया सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता भागवत फड यांनी सांगितले आहे.
कोट्यवधीचे रस्ते पाण्यात
औरंगाबादेतील रस्त्यांची चाळणी झाली होती. चाळीशी उलटलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाने महापालिकेला भरघोस निधी दिला आहे. २०१४-१५ यावर्षी २४ कोटींचा निधी शासनाने महापालिकेला दिला. त्यानंतर २०१६-१७ मध्ये शंभर कोटींचा निधी देण्यात आला आहे. जानेवारी २०२० मध्ये १५२ कोटींच्या निधी देण्यात आला. इतक्या मोठ्या निधीतून ५९ रस्त्यांची व्हाइट टॉपिंगच्या माध्यमातून कामे झाली आहेत. मात्र आज कोट्यवधी खर्च करून तयार झालेले रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
आता निकृष्ट कामांना लगाम
याशिवाय स्मार्ट सिटी योजनेतून तब्बल २२५ कोटीतून ८३ किलोमीटरचे १११ रस्त्यांचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्याचबरोबर २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात महापालिका फंडातून २०० कोटीतील कोटींची रस्त्यांची कामे करण्याची तरतूद केली आहे. मात्र आता रस्त्यांची कामे करताना महापालिका प्रशासकांनी खूप चांगला बदल केला आहे.
महापालिकेने तरतूद केलेल्या २०० कोटीतील रस्ते कामांचे पहिल्या टप्प्यातील १०० कोटीचे टेंडर ८ जून रोजी प्रसिध्द करण्यात आले होते. गत शनिवारी टेंडर दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी ५० कोटींसाठी एकच टेंडर प्राप्त झाले. त्यामुळे महापालिकेने पुन्हा नव्याने टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ठेकेदारांनी टेंडर प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे.
आयआयटीचा घेतला ठेकेदारांनी धसका
औरंगाबादेत यापूर्वी सरकारी योजनेतील व्हाईट टाॅपिंग झालेल्या निकृष्ट रस्त्यांवर टेंडरनामाने सविस्तर मालिका लावल्यानंतर महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील १०८ रस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कसे तयार करावेत, यासाठी त्यांची गुणवत्ता तपासणीचे काम मुंबईच्या आयआयटी संस्थेला दिले आहे. दरम्यान आयआयटीच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदार ए. जी. कंन्स्ट्रक्शन यांनी भाग्यनगर ते वरद गणेश मंदिर आणि औरंगपुरा ते एस. बी. महाविद्यालय या दोन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.
यापूर्वी अस्तित्वात असलेल्या जुन्या रस्त्यावर जेसीबीच्या दात्यांनी केवळ स्कॅरिफ्राय करून आहे त्याच रस्त्याच्या बेसचे सपाटीकरण करून कॉंक्रिट ओतले जात असे. या रस्त्यांची तांत्रिक तपासणी केवळ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत होत असे. आता मात्र रस्ता एक ते दीड फूट खोदून जोड रस्त्यांची लेव्हल घेतली जात आहे. खोदकामाचा पहिला टप्पा झाल्यावर झालेल्या कामांसदर्भात प्रत्येक टप्प्याचा अहवाल द्यावा लागत आहे. खोदकामात माती आढळली तर पुन्हा तपासणी करावी लागत आहे. परिणामी यापूर्वी दोन दिवसांत तयार होणाऱ्या एका रस्त्याला आता पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो आहे. खोदकाम झाल्यावर खडी आणि मुरुमासह कॉंक्रिटची तपासणी जागेवर केल्यानंतरच ठेकेदाराला पुढील कामाची परवानगी मिळत आहे.
ठेकेदार वैतागला
या रस्त्यांच्या कामासाठी निवड झालेला ए. जी. कन्स्ट्रक्शन कंपनीचा ठेकेदार आणि स्मार्ट सिटी नियुक्त पीएमसी आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तांत्रिक तपासणी करणारे प्राध्यापकांसह स्मार्ट सिटीतील अधिकारी देखील वैतागले आहेत. रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी मुंबईच्या आयआयटी संस्थेतील तज्ज्ञ काटेकोरपणे तांत्रिक तपासणी करत आहेत. ठेकेदाराने तयार केलेली डिझाइन्स त्यावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केलेल्या तांत्रिक तपासणीनंतर पीएमसी आणि स्मार्ट सिटीतील प्रकल्प व्यवस्थापकामार्फत वेळोवेळी पुढील तपासणी आणि अभिप्राय मिळवण्यासाठी आयआयटी मुंबईला पाठविण्यात येत आहे. त्यावर आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांचा अभिप्राय आल्यावरच काम सुरू करावे लागत आहे. नेमका याचाच धसका ठेकेदारांनी घेतल्याने महापालिका फंडातील रस्ते टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्याचा धसका ठेकेदारांनी घेतल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.