Aurangabad Tendernama
मराठवाडा

चार दिवसात ना ठेकेदार सुधारले अन् ना प्रशासनाने गुन्हे दाखल केले

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : हर्सूल ते फर्दापूर राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफचे काम करताना किरकोळ नियमांचे उल्लंघन झाल्याने उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांना कलम १३३ (१) ब नुसार नोटीस बजावली होती. चार दिवसांत कामांत सुधारणा करा, नसता गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला होता. यावर 'टेंडरनामा' प्रतिनिधीने आठ दिवसानंतर पाहणी केली असता, ना ठेकेदार सुधारले ; ना उप विभागीय अधिकाऱ्यांनी पुन्हा पाहणी करून ठेकेदारांवर गुन्हे दाखल केले. एकुणच या प्रकरणात कारवाईचा केवळ दिखावा करण्यात आल्याचे टेंडरनामाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.

महामार्ग कामात कंत्राटदारांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मार्गावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हर्सुल टी पाॅईंट ते फर्दापूर अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यात या कामात ठेकेदाराकडुन रस्ता बांधकाम करताना साधे नियमही पाळले जात नसल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना गेल्या तीन आठवड्यापूर्वी केलेल्या पाहणीत आढळून आले होते. अनेक ठिकाणी काम प्रगतीपथावर असल्याचे बोर्ड नाहीत. ठिकठिकाणी काम अर्धवट सोडले आहे. खड्डे खोदून ठेवले आहेत. वाहतूक मार्गांची पार चाळणी झाली असुन पर्यायी मार्ग देखील उपलब्ध करून दिले नाहीत. विशेष म्हणजे धूळ उडू नये म्हणून पाणी मारले जात नाही.

ठेकेदारांनी रस्ता बांधकाम करताना टेंडरमधील नियमांकडे दुर्लक्ष करत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोणतेही उपाय केले जात नसल्याने येथे मोठ्या अपघाताची धोकादायक स्थिती पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या सुचनेने उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना नोटीस बजावली होती. त्यासाठी कामात हयगय करणार्या लॅन्को रिथविक (जे.व्ही.) आर.के.चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर, मेघा इंजिनिअरींग या ठेकेदारांना जबाबदार धरत चार दिवसात सुधरा ; अन्यथा गुन्हे नोंदवू अशा आशयाची नोटीस एमएसआरडीसी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला बजावली होती.

'टेंडरनामा'ने केली पाहणी

जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या सुचनेनंतर उपविभागीय अधिकारी रोडगे यांनी बजावलेल्या नोटीसानंतर देखील ठेकेदारांकडुन 'जैसे'थे परिस्थिती असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर 'टेंडरनामा' प्रतिनिधीने हर्सूल टी पाॅईंट ते फुलंब्रीपर्यंत रस्ता बांधकामाची पाहणी केली असता जिल्हा प्रशासनाचा केवळ कारवाईचा दिखावा असल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून उघड झाले.

कधी फुटणार हर्सुलची कोंडी?

दहा दिवसांपूर्वी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी हर्सूल येथील हनुमान मंदिरात बैठक घेऊन हर्सुल रस्ता रूंदीकरणात बाधित होणाऱ्या १०२ मालमत्ताधारकांची बैठक घेतली होती. त्यात रास्त दराने मोबदला देण्यासाठी प्रशासनाने मंजुरी दिल्याचे रोडगे यांनी सांगितल्यावर मालमत्ताधारकांनी भूसंपादनास सहमती देखील दर्शवली होती. त्यामुळे ३१ मे च्या आधीच बाधित मालमत्ताची पाडापाडी करण्यास सुरूवात होईल असे रोडगे यांनी जाहिर केले होते. मात्र अद्याप एक वीट देखील काढली नसल्याने येथील वाहतूक कोंडी कधी फुटेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय म्हणतात जबाबदार

उपविभागीय अधिकाऱ्यांची नोटीस आल्यावर मी स्वतः तीन दिवस कामाची पाहणी केली. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी ठेकेदार धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी पाण्याचा मारा करत आहे. ठेकेदाराने वरच्या भागात खड्डे देखील भरले आहेत. मात्र वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने रस्त्याची कायमस्वरूपी दुरूस्ती होऊ शकत नाही. मुळात समृध्धी महामार्ग दरम्यान रस्ता दुरूस्तीची आमची दोन्ही बाजुने केवळ अठराशे मीटर लांबीची हद्द आहे. आमच्या हद्दीतील अंडरपास कामाची गती वाढवली आहे. आठ ते दहा दिवसात हे काम पुर्ण होईल आणि रस्ता वाहतूकीस मोकळा करणार आहोत.

- बी. बी. साळुंखे, मुख्य अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ

नोटीस बजावल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातर्फे ठेकेदारांनी खुलासा केला आहे. दरम्यान इतर प्रशासकीय कामकाजामुळे पडताळणी केली नाही.याबाबत संबंधित अधिकार्यांमार्फत पून्हा पाहणी करणार आहोत. पुढील आठवड्यात हर्सूल रस्ता रूंदीकरणाची मोहिम हाती घेणार आहोत.

- रामेश्वर रोडगे , उप विभागीय अधिकारी. औरंगाबाद तहसिल

या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता पल्लवी सोनवणे यांना संपर्क होऊ शकला नाही.