औरंगाबाद (Aurangabad) : धुळे-चाळीसगाव या जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११ चे आता एनएच-५२ असे नामकरण करण्यात आलेले आहे. ठेकेदाराचा कासवगती कारभार आणि कामात अत्यंत हलगर्जीपणा दिसत असल्याने या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाने अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे मराठवाड्याच्या ऐतिहासिक राजधानी आणि उद्योग पंढरीकडे येणाऱ्या युपी, एमपी आणि उत्तर महाराष्ट्राचा संपर्क तुटल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे औरंगाबादच्या विकासाची गती मंदावल्याचे समोर येत आहे.
रूंदीकरणासाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यांवर टेंडरमधील अटीशर्तीनुसार पाण्याचा मारा करणे बंधनकारक असताना ठेकेदार पाण्याच्या बचतीतून पैसे वाचवत आहे. मात्र, प्रवाशांसह आसपासच्या शेतकऱ्यांना आणि व्यावसायिकांना धुळीमुळे श्वसनाचे आजार सुरु झाले आहेत. तरी देखील धुळे येथील नॅशनल हायवे ऑफ ॲथोरिटी इंडियाच्या अधिकाऱ्यांचे ठेकेदाराच्या हलगर्जीपणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष दिसून येत असल्याने यामार्गातील ग्रामस्थांमध्ये आणि प्रवाशांमध्ये प्रचंड रोष उत्पन्न झाला आहे. धुळे-सोलापूर मार्गातील सोलापूर-ऐडशी, ऐडशी-औरंगाबाद, औरंगाबाद ते कन्नड या तीन टप्प्याचे काम संपले आहे. मात्र वर्षभरातच या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. वेरूळ ओव्हरब्रीज खाली तर खड्ड्यात गुडघ्याइतके पाणी साचल्याने कंबरदुखीचा त्रास वाढला आहे. कन्नड ते ओट्रम घाट या चौथ्या टप्प्याचा तिढा कायम असल्याने २६ किमीचे अंतर कापण्यासाठी सहा तास लागत आहेत. वाहनांनी दररोज घाट जाम होत आहे. परिणामी वेळ आणि इंधनाचा तोटा सहन करावा लागत आहे. असे असताना धुळे ते चाळीसगाव या रस्त्याचे पाचव्या टप्प्याचे काम ९ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. सद्य:स्थितीत धुळे चौफुलीपासून बोढरे गावापासून या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम चालू आहे.
मात्र, हे काम करताना ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी जनतेच्या सुरक्षेकडे साफ दुर्लक्ष करत हे काम अतिशय मंद गतीने होत आहे. जागोजागी प्रत्येक एक ते दीड किलोमीटर अंतरामध्ये रूंदीकरणासाठी खोदलेल्या असुरक्षित जागेत भरावाचे काम संथगतीने सुरू आहे. काही ठिकाणी खडी पडलेली आहे. दोन्ही बाजुने रस्ता खोदल्यामुळे वाहनांसाठी केवळ सात मीटर रस्ता शिल्लक राहत असल्याने अपघात घडत आहेत. कित्येकदा दुचाकीस्वार या खोदकामात पडून जखमी होत आहेत. आहे, त्या वाहतूकीच्या रस्त्यात खड्डे आणि खडीमुळे चारचाकी वाहनांचे व अवजड वाहने तसेच एसटी बसेसचे मोठे नुकसान होत आहे.यामार्गावरील नदीवरील लहाणमोठ्या अरूंद जुन्या पुलांची कालमर्यादा संपल्याने अधिक धोका निर्माण झाला आहे. जुन्या पुलाशेजारी नव्यापुलांचे काम देखील रखडलेले आहे.
बोढरे येथील जगन्नाथ पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, अनेक ठिकाणी अद्याप भुसंपादन झालेले नाही. आधी एकाच बाजुने काम करणे अपेक्षित असताना रस्त्याच्या मधोमध जुन्या 'रस्त्याच्या दोन्ही बाजुला खोदकाम करून ठेवल्याने रस्ता मृत्युचा महामार्ग करून ठेवलाय. त्यात काम बंद असल्यामुळे दररोज अपघात घडत आहेत. मुरूमाच्या जागी भरावात चक्क मातीचे प्रमाण अधिक असल्यमुळे आसपासचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकप्रकारे जनतेच्या जीवाशी खेळ चालविला असून प्रशासनाने तातडीने लक्ष न घातल्यास तीव्र रस्तारोको आंदोलन करणार,' असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.