औरंगाबाद (Aurangabad) : महापालिकेच्या तिजोरीतील १०० कोटी रूपये खर्च करून शहरातील जवळपास ८१ रस्ते गुळगुळीत करण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने ८ जुन रोजी ५० कोटींचे दोन टेंडर प्रसिद्ध केले होते. मात्र, सदर टेंडर प्रक्रियेला ठेकेदारांकडून अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता २५ कोटींचे चार टेंडर प्रसिद्ध करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पॅकेज १ आणि पॅकेज २ मधील टेंडर कोणीही भरले नाही. पॅकेज २ मध्ये एकच टेंडरसाठी एकच ठेकेदारने सहभाग नोंदवला. ठेकेदारांनी टेंडर प्रक्रियेला पाठ दाखवल्याने आता २५ कोटींचे चार टेंडर प्रसिद्ध होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. टेंडरमध्ये किचकट अटी टाकुन मर्जीतल्या एकाच ठेकेदारासाठी काम देण्याचा खटोटोप होत असल्याचा आरोप माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी केला होता. मात्र स्मार्ट सिटीअंतर्गत होत असलेल्या कामात आयआयटीचा होत असलेला हस्तक्षेप पाहुन याकामाचे टेंडर घेणारा ठेकेदार घामाघुम झाला आहे. आयआयटीने महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेतील ढोबळ अंदाजपत्रकाला फाटा देत रस्ता खोदकामापासून ॲप्रोच रस्त्यांची लेव्हल घेण्यापासून तर खोदकामानंतर माती परिक्षण त्यानंतरच पुढील कामाची प्रक्रिया राबवली जात आहे. याकामात अंदाजपत्रक तयार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या अकलेचे दिवाळेही समोर येत आहे.
दरम्यान, बांधकाम साहित्याचा दर्जा स्वतः आयआयटी तपासत असल्याने औरंगाबादेत याकामांची जोरदार चर्चा सुरू आहे. परिणामी बहुतांश ठेकेदारांनी याचा धसका घेतल्याने महापालिका रस्ते कामात पुन्हा आयआयटीची त्रयस्थ समिती म्हणून निवड केल्यास पुढे काय? असा प्रश्न ठेकेदारांना सतावत असल्यानेच याकडे पाठ दाखवत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.