छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जालनारोड-हिरापुरवाडी ते वरूड या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मनिषा कन्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. पण, गेल्या २ वर्षांपासून हा रस्ता पूर्ण करण्यात आला नसल्याने प्रवाशांसह पादचाऱ्यांना चालणेही अवघड होऊन बसले आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि शाखा अभियंत्यांनी या कामाकडे पूर्णतः 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष केल्याने माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी गावकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन केले होते. या संदर्भात टेंडरनामाच्या वृत्तमालिकेनंतर कंत्राटदाराने या रस्त्याचे काम सुरू केले होते. मात्र पुन्हा अर्धवट काम सोडून त्याने पलायन केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग-१८ जालनारोड ते हिरापुरवाडी ते वरूड रस्ता एकूण लांबी ४ किलोमीटर. कामाची अंदाजित दोन कोटी असून १२ महिन्यात रस्त्याचे काम पूर्णत्वास नेयायचे होते. परंतु २४ महिन्याचा कालावधी उलटल्यावरही कंत्राटदाराकडून काम पुर्ण होत नाही. सुरूवातीला रस्त्यावर मुरूमाचे ढीग आणि गिठ्ठी अंथरून ठेवण्यात आली होती. त्या गिठ्ठीतून बैलगाडीसुध्दा जाऊ शकत नव्हती.
टेंडरनामाने वृत्तमालिका लावल्यानंतर कंत्राटदार ताळ्यावर आला होता. यानंतर बागडे यांच्या आंदोलनाचा धसका घेत त्याने काम चालु केले. खडीकरण, मजबुतीकरण आणि रूंदीकरणाचे काम केले. पण आता अर्धवट काम सोडून तो गेल्या महिन्याभरापासून यंत्रणेसह पसार आहे. तेव्हा पासून आजपर्यंत काम थंडबस्त्यात आहे. त्यामुळे येथील नागरिक रस्त्यामुळे वैतागून गेले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता निंभोरे यांच्या देखरेखीखाली तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम असून, चौधरी यांच्याकडे कार्यकारी अभियंत्याचा पदभार आहे. हेतुपुरस्सर त्यांनी तालुक्यातील कामाकडे दुर्लक्ष केले आहे. ९ महिन्यात हे काम मनिषा कन्ट्रक्शन कंपनीला पूर्ण करणे बंधनकारक असताना २ वर्षाचा कालावधी लोटल्या नंतरही रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्यामुळे या कंपनीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करणे गरजेचे असून त्याच्या कडून खुलासा मागविण्यात येणार का असा प्रश्न नागरिकांतुन विचारण्यात येत आहे. कार्यकारी अभियंता यांनी संबंधित रस्त्याच्या कामाची तात्काळ दखल घेऊन ७ दिवसाच्या आत काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
एवढे मात्र निश्चित की उपअभियंता, शाखा अभियंता व कार्यकारी अभियंत्यांचे आणि कंत्राटदार यांच्यामध्ये काळेबेरे झाले असल्याने गेल्या २ वर्षांपासून रस्त्याचे काम न केल्याने दिसून येत आहे. आता या रस्त्याबाबत थेट मुख्यमंत्री यांच्याकडे या भागातील ग्रामस्थ दाद मागणार आहेत. मनिषा कन्ट्रक्शन कंपनीकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम करण्यात येत आहे. पण गेल्या २ वर्षापासून थंडबस्त्यात आहे. याला एकमेव कारणीभूत अभियंते आहेत. ते २ वर्षांपासून कमिशन खोरीत अडकले आहेत. रस्त्यावर टाकलेली खडी अपघाताला आमंत्रण देत असल्याचे अधिकाऱ्यांना दिसत नाही का. मनिषा कन्ट्रक्शन कंपनीला ब्लॅकलिस्ट करून अभियंत्याच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.