Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : बाळासाहेब ठाकरे स्मारकाला कोणी लावला ब्रेक?

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : प्रियदर्शनी इंदिरा गांधी उद्यानाच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाच्या पहिल्या टप्प्यास आर्थिक अडचणींमुळे विलंब होत आहे. पहिल्या टप्प्यातील काम आतापर्यंत बऱ्याच प्रमाणात अपूर्ण असून ठेकेदार ९० टक्के काम झाल्याचा खोटा गवगवा करत असल्याचे टेंडरनामा पाहणीत उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे यातील टेंडर प्रक्रियेत देखील घोळ झाल्याचे दिसून येत आहे.

आत्तापर्यंत सदर काम पूर्ण करण्याचे आदेश माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून पालकमंत्री सुभाष देसाई त्यानंतर मविआ सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संदीपान भुमरे, तत्कालिन महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, विद्यमान प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी आदेश देऊनही ठेकेदार बधत नाही. कामाची मुदत १८ महिने असताना २४ महिन्याचा कालावधी लोटला अद्याप चबुतऱ्याचे काम देखील अर्धवट आहे. त्यामुळे स्मारक छत्रपती संभाजीनगरवासीयांच्या नजरेत कधी पडेल, याची आतुरतेने वाट पाहावी लागत आहे.

सिडको येथील एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी इंदिरागांधी उद्यानाच्या जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे  स्मारक उभारण्यात येत आहे. सरकारने महानगरपालिकेची कार्यान्वीय यंत्रणा म्हणून नेमणूक केलेली आहे. यासाठी २१ कोटी ७४ लाख रूपये खर्च येत आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर कंत्राटदाराला १८ महिन्याच्या मुदतीवर २५ मार्च २०२१ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आल्यानंतर स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली. १७ एकर जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व म्युझियम उभारणे, रिफ्रेशमेंट सेंटर तयार करणे व भारतीय वंशावळीची मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आदी कामांचा यात समावेश करण्यात आला आहे. स्मारकाचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार असून पहिला टप्प्यात चबुतरा, वाॅटर बाॅडी,  आदी कामे पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या टप्प्यातील बांधकाम (सिव्हिल वर्क) देखील पुर्ण  केले गेले नाही. यातील सिव्हिल वर्क अद्याप बाकी असल्याने स्मारक व म्युझियम उभारणे, रिफ्रेशमेंट सेंटर तयार करणे व त्या अनुषंघाने स्थापत्य, विद्युत, वातानुकूलित यंत्रणा उभारणी, इमारतीची अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामे कधी पार पडणार, हा मोठा प्रश्न आहे.

टेंडरनामा प्रतिनिधीने रविवारी जवळपास १७ एकर परिसर पिंजुन काढला. त्यात महापालिकेच्या उद्यान विभागाने साडेसात हजार वृक्षलागवड केलेली दिसली. त्यात राशी उद्यानातही भारतीय वंशावळीचा मोठा ऑक्सिजन हब तयार केलेला दिसला. एवढेच नव्हे, तर दोन एकर जागेत पाण्याचा साठवण तलाव तयार केला. गतवर्षी झालेल्या पावसाचे पाणी आजही तलावात तग धरून आहे. याशिवाय एक एकर जागेत बगिच्याचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. सिडको एन-पाच जलकुंभावरून पाइपलाइन आणून पाण्याची व्यवस्था केल्याने झाडांची वाढ देखील बर्यापैकी आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे  काम कुठेही प्रगतीपथावर दिसून येत नाही. बाळासाहेबांचे स्मारक ज्या ठिकाणी उभारले जात आहे. त्याठिकाणी बांधकाम साहित्याचे वाहने जाण्यासाठी ठेकेदाराने पक्के रस्ते तयार करण्याचे काम  पहिल्या टप्प्यात केले मात्र केलेले रस्ते वर्षभरातच उखडल्याचे विदारक चित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्यानंतर येथे फुडकोर्टचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र येथील जैवविविधतेला बाधा येऊ नये म्हणून न्यायालयाच्या आदेशान्वये ते काम बंद करण्यात आले. रविवारी टेंडरनामा प्रतिनिधीने येथील कामाचा आढावा घेतला असता कोणत्याही  कामाचा वेग नसल्याने स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण झालेले दिसत नाही.

आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील साधारण ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा ठेकेदार करीत असला, तरी बांधकामाला पाण्याचा तुटवडा येत असल्याचे येथील एका विश्वसनीय सुत्रांकडून कळाले. झालेल्या कामावर क्युरिंगचे प्रमाण कमी असल्याने ते उखडलेले दिसून येत आहे. चभुतऱ्यातील विटा देखील पांढऱ्या पडल्याचे दिसून येत आहे. अत्याधुनिक प्रसाधनगृहाची देखील तीच अवस्था आहे. २४ महिन्यात पहिल्या टप्प्याचा पायाच अपूर्ण असल्यानंतर ठेकेदार भल्यामोठ्या गप्पा मारत असलेली दुसरा टप्प्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून येथे लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक इत्यादी कामे कधी पूर्ण होणार याबाबत संशय निर्माण होत आहे.  स्मारकासमोरच बाळासाहेबांची प्रतिमा दिसावी म्हणून. एक मोठे कुंड उभारण्यात आले आहे. मात्र या कुंडाच्या कामाला सुरुवातीपासूनच क्युरींग न झाल्याने क्रॅक गेल्याचे दिसत आहे.

स्मारकाच्या कामासाठी व फुडकोर्टसाठी या १७ एकर भव्य ऑक्सिजन हबच्या जागेतील हजारो  झाडे कापली गेली. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशाने यापुढे एकही झाड न कापता काम करण्यात येत आहे. झाडे वाचवून काम करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाच्या आराखड्यात अनेक बदल करावे लागले. त्यात फुडकोर्ट व अन्य कामे रद्द करावी लागल्याने त्यामुळेही कामाला काहीसा विलंब झाला. पण झाडे वाचली ही बाब समाधानकारक आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे बांधकाम कमी झाल्याने ठेकेदाराच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने बहुधा त्याची मानसिकता काम करत नसल्यानेच काम कासवगतीने सुरू असल्याची महापालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.

टेंडर प्रक्रीयेत घोळ

● महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामासाठी केवळ दोन एजन्सीचे टेंडर काढण्यात आले होते. प्रत्यक्षात सरकारी नियमानुसार तीन टेंडर बंधनकारक असताना यात नोएडाच्या डिझाइन फॅक्टरी इंडिया या कंपनीने कमी दराने दाखल केलेले टेंडर अंतिम करण्यात आले व कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली.

●  १३ ऑक्टोबर २०२० रोजी पालिकेतर्फे टेंडर  प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत डिझाइन फॅक्टरी इंडिया आणि काँम्ट कंस्टक्शन प्रा. लिमिटेड या दोन कंपन्यांनीच टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतला होता. डिझाइन फॅक्टरी इंडियाचे २.३३ टक्के कमी दराचे टेंडर  अंतिम करून यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिका प्रशासकाकडे पाठविण्यात आला.

● त्यानंतर २५ जानेवारी रोजी प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानुसार कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली. त्यानुसार कंपनीने सदर कामास सुरुवात केली.

● पालिकेने स्मारकासाठी पीएमसी मे. आर्कहोम कंन्सलटंटकडून २५.५० कोटींचे अंदाजपत्रक तयार करून घेतले. त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजूरी मिळाली. त्यानुसार २१ कोटी ७४ लाख १०२ रूपयांची निविदा काढली होती. त्यात २.३३ टक्के कमी दराने म्हणजे एकूण २० कोटी ९६ लाख ८८ हजार ९३९ रुपयांत डिझाइन फॅक्टरी इंडिया कंपनीला काम देण्यात आले आहे. थर्ट पार्टी टेक्निकल ऑडिटचे काम छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून केले जात आहे.

असा केला गेला  गवगवा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वात मोठा पुतळा संभाजीनगरातच होत असल्याचा गवगवा केला जात आहे. हा पुतळा ५४ फुटांचा असून, चबुतऱ्यासह स्मारकाची उंची ८४ फुटांपेक्षा अधिक राहणार असल्याचे सांगितले गेले. मात्र स्मारकाची उंची खुप कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ५४ फुटाचा पुतळा असणार काय , असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२४ महिन्यानंतर देखील ही कामे अर्धवट

पुतळ्याच्या खालीच संग्रहालय. त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचे व्हिडिओ, व्यंगचित्रे आदी कामांचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये समावेश आहे. डिसेंबरपर्यंत काम संपविण्याची कंत्राटदाराला मुदत दिली होती. अद्याप ९० टक्के काम अपुर्ण आहे.

स्मारक समिती कोमात

विशेष म्हणजे राज्य सरकारने येथील स्मारकाचे काम जलदगतीने व उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे. त्यात पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष आहे. तसेच जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, महापालिका आयुक्त समितीत आहेत. मात्र स्मारकाच्या बातम्या आल्यावरच समिती आढावा आढावा बैठक घेते. मात्र कामाची गती कुठेही वाढत नसल्याचे दिसत नाही.