औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेतील बीडबायपासवरील संग्रामनगर चौकातील उड्डाणपुलाच्या सदोष डिझाइनला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनी दोष झाकण्यासाठी चक्क पुलाच्या खाली खोदकाम करून पुलाची उंची वाढवण्याचा धक्कादायक प्रकार टेंडरनामाच्या तपासात उघड झाला आहे. या संदर्भात प्रतिनिधीने पीएमसीचे अभियंता अनिल कुबडे यांना विचारले असता त्यांनी तोंडावर बोट ठेवत पीडब्लुडीच्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवले. प्रतिनिधीने पीडब्लुडी अंतर्गत जागतिक बँक प्रकल्पाचे शाखा अभियंता सुनिल कोळसे यांना विचारले असता पुलाचे डिझाइन सदोष नाही, रस्त्याचा टाॅप आणि पुलाचा बाॅटम या दोघांमध्ये ५.५ मीटर क्लेअरंन्स असतो. त्यामुळे उंची मेंटन करण्यासाठी रस्ता स्लोपमध्ये घेऊन पाण्याचा निचरा करण्यासाठी खोदकाम करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आधी ठेकेदाराला आर्थिक फायदा पोहोचवण्यासाठी डिझाइनमधील पुलाच्या बांधकामाला कात्री लावत सदोष पुल बांधल्याचा आरोप सातारा-देवळाई संघर्ष समितीच्या सदस्यांनी करत मोठ्या प्रमाणात टिकास्र सोडले आहे.
मुळात सदोष उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या प्रकल्प सल्लागार समितीसह अधिकारी व ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी होत असून जनतेच्या खिशातून झालेले नुकसान संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराकडून वसूल केले जावे, अशी मागणी सातारा-देवळाई संघर्ष समितीच्या सदस्यांच्या वतीने करण्यात येत आहे. पुलाचे बांधकाम झाल्यावर पुलाखालून साधा जेसीबी देखील जाऊ शकत नसल्याचे लक्षात आल्यावर सदोष बांधकाम न पाडता अधिकाऱ्यांनी पुलाखालचे रस्ते खोदायचे काम सुरू केले आहे. सदोष बांधकामाची संपूर्ण जबाबदारी असलेल्या पीडब्लुडी अंतर्गत जागतिक बँक प्रकल्पाचे अधिकारी, ठेकेदार व या प्रकल्पासाठी नियुक्त केलेल्या हरियानाच्या ग्लोबल इन्फोटेक कंन्सलटंन्सी कंपनीतील सल्लागार समितीतील अधिकारी यांच्या संगनमताने 'तेरी भी चूप मेरी भी चूप' असे म्हणत पुलाखाली खोदकामाचा जुगाड करत आहेत. मात्र, पुलाच्या सदोष डिझाइनसाठी जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित ठेवत उड्डाणपुलाचा सदोष बांधकामाचा मुद्दा कुठेही उपस्थित केला नाही.
टेंडरनामाने या संदर्भात कार्यकारी अभियंता नरसिंह भंडे यांच्याकडे सदोष बांधकामासाठी जबाबदार कोण? या सदोष बांधकामाची चौकशी करायची मागणी पुर्ण होणार काय? पुलाचे सदोष काम करणाऱ्यांवर कारवाई करणार काय? आदी प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यांनी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर न देता या पुलाचे डिझाइन उपअभियंता सुर्यवंशी यांनी केले होते त्यांना विचारा असे म्हणत बोट दाखवले. सातारा-देवळाई संघर्ष समितीचे सदस्य येथील सदोष उड्डाणपुलाच्या बांधकामाबाबत आक्रमक झाले आहेत. संजय देशमुख, पद्मसिंह राजपुत, सोमीनाथ शिराने म्हणाले, बीडबायपासवरील संग्रामनगर चौकातील उड्डाणपुलाचे डिझाइन चुकल्याने अधिकाऱ्यांनी पुलाची उंची वाढवण्यासाठीच खोदकाम सुरू केले आहे. यापुलाचे सदोष बांधकाम तपासण्यासाठी त्रयस्थ तांत्रिक सल्लागार समितीची नेमणूक करण्यात यावी व तपासाअंती निष्कर्ष नोंदवावा व तो जनतेसमोर जाहीर करावा अशी मागणी सदस्यांनी केली आहे.
पुलाचा वळण मार्गाची २०० मीटर लांबी व १३ मीटर रूंदी आहे. यातून पुलाच्या उंचीच्या क्षमतेपेक्षा जास्त उंचीची वाहने पुलाखालुन आत-बाहेर करू शकत नसल्याचे निष्पन्न झाले. आज या पुलाच्या बांधकामाची चौकशी समिती नेमली असती, तर बांधकाम तोडून पुन्हा नव्याने करण्याची शिफारस करण्यात आली असती. मात्र सदोष डिझाइनसाठी जबाबदार अधिकार्यांना कारवाईच्या बडगा उगारला असता तसेच झालेले नुकसान ठेकेदाराकडून वसूल केले गेले असते. मात्र या खळबळजनक प्रकाराची धांदल न उडवता अधिकाऱ्यांनी मौन धारण केले आहे. प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी मंजूर नकाशातील डिझाइन नुसार काम करता ठेकेदाराला आर्थिक फायदा पोहोचवण्यासाठी बांधकामात परस्पर बदल करून पुलाची उंची कमी करण्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे. पुलाचे बांधकाम झाल्यावर एकाच वेळी दोन वाहने देखील पुलाखालुन पास होत नाहीत. आता अधिकार्यांनी पुलाखालचे रस्ते खोदुन दोष झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. पैठण टी पाॅईंट ते झाल्टा फाटा दरम्यान टाकण्यात येत असलेल्या सदोष दुभाजकाचा देखील मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. नव्याने होऊ घातलेल्या उंच दुभाजकामुळे अपघाताची संख्या वाढेल अशा प्रतिक्रीया या भागात उमटत आहेत.