Aurangabad Tendernama
मराठवाडा

जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाबाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) हद्दीतील चिकलठाणा येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या (District Sport Complex) बहुउद्देशीय हाॅलच्या इमारतीचे पहिल्या टप्प्यातील ६० हजार स्क्वेअर मीटरच्या बसमेंटचे काम पूर्ण झाले आहे. या कामाला गती देऊन ते वेळेत पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिल्या आहेत. राज्याच्या क्रीडा धोरणानुसार मान्यता मिळाल्यानंतर आता औरंगाबादेत जिल्हा क्रीडा संकुल आकाराला येत आहे.

चव्हाण यांच्या प्रयत्नांतून मराठवाड्यासाठी सर्व सुविधांयुक्त, प्रशस्त असे विभागीय क्रीडा संकुलाचे स्वप्न साकार झाले आहे. आता जिल्हा क्रीडा संकुल उभारणीचे कामही चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जिल्हा क्रीडा संकुलासाठी जागा ताब्यात मिळाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जमिनीबाबत वाद उपस्थित केले होते. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी भूमी अभिलेख कार्यालयाकडून जागेच्या सीमा रेषा निश्चित करून पंचनामा केला. यापूर्वी एकूण क्षेत्र ३७ एकर होते. परंतु नावंदे यांनी अक्षांस - रेखांशानुसार जागा मोजल्याने सद्यस्थितीत ३९ एकर ९ आर जागा जिल्हा क्रीडा संकुलास मिळाली.

जागेचा रितसर ताबा मिळाल्यानंतर महसुली अभिलेखात जिल्हा क्रीडा संकुलाचे नाव आल्यानंतरच नावंदे यांनी जिल्हा क्रीडा संकुल उभारणीसाठी शासनाकडे १६ कोटीचे अंदाजपत्रक व आराखडे सादर केले होते. त्यास मान्यता प्राप्त झाल्यानंतर व जिल्हा क्रीडा संकुल, उभारणीसाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात चार कोटी ३१ लाख रुपये पदरात पडल्यानंतरच क्रीडा संकुलाच्या पहिल्या फेजमध्ये बहूऊद्देशीय हाॅल, संरक्षण भिंत, विहिर , पाण्याची टाकी या चार बांधकाम बाबींचे ई-टेंडर मागवून अंतीम करण्यात आले. औरंगाबादेतील निसर्गराजा कंस्ट्रक्शन आणि बळीराजा कंस्ट्रक्शन कंपन्यांना हे काम देण्यात आले आहे. १० डिसेंबर २०२१ रोजी वर्क ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर कंत्राटदारांनी कामाला सुरवात केली आहे.

नियोजित जिल्हा क्रीडा संकुलातील सुविधा

संरक्षक भिंत, विविध खेळाची मैदाने, स्केटिंग, बास्केटबॉल, मल्टीपर्पज हॉल, जिम्नॅशिअम, योगा, जिम, टेबल टेनिस, बॉक्सिंग, शूटिंग रेंज, धनुर्विद्या, भारत्तोलन, कुस्ती, बॅडमिंटन हॉल, पाण्याची अंतर्गत सुविधा व टाकी, सिंथेटिक कोर्ट, ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, ड्रेनेज व वॉकिंग पाथवे, अंतर्गत रस्ते, सौरऊर्जा प्रकल्प, विद्युतीकरण, शेडसह पार्किंग सुविधा, मुलांमुलींसाठी वसहतीगृह