छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शिवाजीनगर रेल्वेगेट भुयारी मार्गासाठी अस्तित्वातील रस्त्याचे २४ मीटर रुंदीकरण करण्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे. या प्रकरणी अंतिम निवाड्यातील उर्वरित रक्कम जमा करणेबाबत नगर रचना व मुल्य निर्धारण विभागाचे विशेष भूसंपादन अधिकारी वि. भा. दहे यांनी आज तातडीचे पत्र पाठवले आहे. या कार्यालयाने प्रारूप निवाड्याला मान्यतेसाठी जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांण्डेय यांच्याकडे ३ मार्च रोजी प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला ५ एप्रिल रोजी पांण्डेय यांनी मान्यता दिली आहे.
मौजे सातारा गट नं. १२४ / २ व १३१ मधील अस्तित्वातील रस्त्याचे २४ मीटर रुंदीकरण शिवाजीनगर रेल्वेगेट भुयारी मार्गासाठी भूसंपादन संस्था म्हणून महानगरपालिकेने ८ मार्च २०२२ रोजी पहिल्या टप्प्यात एक कोटी ८१ लाख ३४ हजार व दुसऱ्या टप्प्यात १७ ऑक्टोबर २०२२ रोजी चार कोटी २३ लाख १३ हजार रुपये अशी एकूण सहा कोटी ४ लाख ४७ हजार इतकी रक्कम विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयात भरली आहे.
सदर प्रकरणी अंतिम निवाडा १५ मे रोजी घोषित करण्याचे प्रस्तावित करून अंतिम निवाडा रक्कम सहा कोटी ८७ लाख ९ हजार १६१ इतकी परिगणित होत आहे. सबब उर्वरित रक्कम ८२ लाख ६२ हजार १६१ रुपये विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयात १० मे पूर्वी जमा करण्यात यावी, म्हणजे १५ मे रोजी निवाडा घोषित करण्यात येईल, असे विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासकांना कळवले आहे.
शिवाजीनगर भुयारी मार्गाबाबत न्यायालयात जनहित याचिका (क्र. ९६/२०२२) दाखल असल्याने अंतिम निवाडा करण्याची कार्यवाही तातडीने होणे आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने रक्कम जमा केल्यास अंतिम निवाडा घोषित करून मिळकतीचा ताबा घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, असा देखील पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.