औरंगाबाद (Aurangabad) : तालुक्यातील फुलंब्री मतदार संघातील प्रमुख जिल्हा मार्ग-१८ जालनारोड-हिरापूर-सुलतानपूर ते वरूड फाटा या चार किमी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मनिषा कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. याकामाची मुदत १२ महिन्याची होती. पण गेल्या दीड वर्षांपासून हा रस्ता पूर्ण करण्यात आला नसल्याने प्रवाशांसह पादचाऱ्यांना चालणेही अवघड होऊन बसले आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी महाआघाडी सरकारच्या काळात माजी विधानसभा अध्यक्ष तथा विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांनी शेकडो गावकर्यांसह आंदोलन केले होते. मात्र, शाखा अभियंत्यापासून उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्यासह अधीक्षक अभियंत्यांचे या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने याचा काही उपयोग झाला नाही.
अधिकारीच म्हणतात ठेकेदार ऐकत नाही
या संदर्भात उपअभियंता उन्मेश लिंभारे यांना संपर्क केला असता ठेकेदार किरण पागोरे यांना तीन वेळा नोटीस बजावली आहे. टेंडरमधील अटीशर्तीचा भंग केल्याने त्याला दररोज ३०० रूपये दंड चालु आहे, त्याला लेखी व तोंडी सूचना देऊनही तो ऐकत नाही, नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात त्याने सर्वीकडे असा पसारा पांगवल्याचे त्यांनी सांगितले. या अधिकाऱ्याला जर ठेकेदाराबाबत इतकी माहिती आहे. मग कामाची मुदत संपल्यानंतर देखील अर्धवट स्थिती आहे, तर अधिकारी त्याला काळ्या यादीत का टाकत नाही, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार बागडे यांनी आंदोलन केल्यानंतर ठेकेदाराने दुसर्याच दिवशी काम सुरू केले होते. मग दोन महिन्यात काम पुर्ण न करता ठेकेदाराने पलायन केले. त्यावर बागडे का बोलायला तयार नाहीत, असे अनेक प्रश्न या कामात उपस्थित होत आहेत.
दोन कोटींचा रस्ता
औरंगाबाद तालुक्यातील फुलंब्री मतदार संघातील प्रमुख जिल्हा मार्ग-१८ जालनारोड-हिरापूर-सुलतानपूर ते वरूड फाटा या चार किमी रस्त्याच्या दर्जाउन्नतीसाठी बागडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर सरकारच्या २०१९-२० मध्ये ग्रामीण विकास मंत्रालय व एशियन डेव्हलपमेंट बॅकेतर्फे रस्त्यासाठी दोन कोटी १२ लाख रुपये मंजूर झाले होते. या रस्त्यांसाठी ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत काम करणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते.
टेंडर अहमदनगरच्या कंत्राटदाराला
यावर अधिक्षक आणि कार्यकारी अभियंत्यांनी प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी दिल्यानंतर टेंडर प्रक्रियेतील यशस्वी झालेल्या अहमदनगरच्या किरण पागोरे या कंत्राटदाराला काम दिले. १९ मे २०२१ रोजी वर्क ऑर्डर दिल्यानंतर या रस्त्याचे भूमीपूजन स्वतः बागडे, तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मिना शेळके यांच्या हस्ते झाल्यानंतर ठेकेदाराने सदर रस्त्याचे काम १२ महिन्यात पूर्णत्वास न्यायचे होते. परंतू रस्त्यावर गिठ्ठी अंथरून ठेवण्यात आली होती.
माजी विधानसभा अध्यक्षांचे आंदोलन गेले उडत
गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक गावकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार बागडे यांनी १४ मे रोजी वरूडफाटा येथे गावकऱ्यांसह मोठ्या प्रमाणात आक्रोश आंदोलन केले होते. त्यावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेने कार्यकारी अभियंता पी. जी. खडेकर यांनी आंदोलनस्थळी धाव घेत उप अभियंता उन्मेश लिंभारे तसेच शाखा अभियंता पंकज चौधरी यांची चांगलीच कान उघाडणी केली होती. मात्र यावेळी अधिकार्यांनी नेहमीप्रमाणे अनेक तांत्रिक कारण देत वेळ मारून नेली. स्वतः उपोषणाच्या तंबूत बसलेले बागडे दिसताच अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. ग्रामस्थ, शेतकरी व कामगार यांच्या रागाचा उद्रेक होऊ शकतो, अशी शक्यता वाटल्याने भीतीपोटी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दुसऱ्याच दिवशी, यंत्रणा कामाला लावली. पण हा केवळ दिखावाच ठरला.ठेकेदाराने खडीकरण मजबुतीकरण करून रस्त्यावर गिट्टी अंथरून ठेवली. तेव्हा पासून आजपर्यंत काम थंड बस्त्यात आहे.
ग्रामस्थांचा वैताग वाढला
हिरापुर, सुलतानपुर, हिरापूरवाडी, वरूड काझी व आसपासच्या शेकडो गावातील ग्रामस्थ रस्त्यामुळे वैतागून गेले आहे. कंत्राटदार आणि अधिकारी हेतुपुरस्सर या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. मुदत १२ महिन्याची असताना हे काम मनिषा कन्स्ट्रक्शन कंपनीला पूर्ण करणे बंधनकारक असतांना दिड वर्षाचा कालावधी लोटल्या नंतरही रस्त्याचे काम जैसे ते आहे त्यामुळे या कंपनीला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करणे गरजेचे असून त्याच्या कडून खुलासा मागवण्यात येणार का असा प्रश्न नागरिकांतून विचारण्यात येत आहे.
होय, यांचे काळेबेरेच
एवढे मात्र निश्चीत की अधिकारी, आमदार बागडे व कंत्राटदार यांच्यामध्ये काळेबेरे झाले असल्यानेच हे काम गेल्या दीड वर्षांपासून रखडल्याचे दिसून येत आहे.