Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : अखेर चिकलठाणा, झाल्टा येथील भुयारी मार्ग वापरासाठी खुला; ग्रामस्थांकडून समाधान

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : तालुक्यातील चिकलठाणा येथील रेल्वे गेट क्रमांक-५७ व झाल्टा येथील रेल्वे गेट क्रमांक-५८  येथील लोहमार्गाखालून भुयारी मार्गांचे काम झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.‌ यातील झाल्टा येथील भुयारी मार्गाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले होते. तर चिकलठाणा येथील भुयारी मार्गाचे उद्घाटन आचारसंहितेत खोळंबले होते. याही भुयारी मार्गाचा नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार, अशी चिकलठाण्यात चर्चा सुरू आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भुयारी मार्ग करण्यात यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ , शेतकरी वर्ग,नागरिक विद्यार्थी व व्यापारी वर्गाची होती. या नुसार माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री तसेच केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हे भुयारी मार्ग बनवण्यात आले. चिकलठाणा रेल्वे गेट क्रमांक - ५७ च्या दोन्ही बाजूंना गजबजलेल्या वसाहती, शाळा व व मोठे व्यवसाय आहेत तर झाल्टा रेल्वे गेट क्रमांक - ५८ लगत झाल्टा व चिकलठाण्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय आहे. हे भुयारी मार्ग होण्याआधी लोहमार्ग ओलांडत असताना अनेक ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी वर्ग व महिलावर्ग तसेच शेतकऱ्यांचा व जनावरांचा अपघात झाला. त्यात अनेक अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांना व जनावरांना जीव गमवावा लागला आहे. हे होणारे अपघात थांबावेत म्हणून दक्षिण मध्य रेल्वेने येथे भुयारी मार्गांचे काम सुरू केले.

दोन्ही भुयारी मार्गाचे काम एससबी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. दोन्ही भुयारी मार्गांची लांबी ११ मीटर व उंची साडेपाच मीटर आहे. दोन्ही बाजूंना शंभर मीटरचे रूंद सिमेंट रस्ते आहेत. झाल्टा येथील भुयारी मार्गाखाली चार जोड सिमेंट रस्ते बनविले आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्टा येथील भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर सदर पूल वाहतूकीस खुला करण्यात आला. पाठोपाठ आता चिकलठाणा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २११ जुना बीड बायपास तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७५३ सी, छत्रपती संभाजीनगर - जालना व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ५२ सोलापूर - धुळे या जोडणारा रेल्वे गेट क्रमांक - ५७ येथील लोहमार्ग खालुन पूलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे . रंगरंगोटीचे व स्वच्छतेचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. आता या पुलाचे उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन पध्दतीने करणार असल्याची चिकलठाणासह झाल्टा शिवारात चर्चा सुरू आहे.‌ दुसरीकडे भुयारी मार्गांचे काम झाल्यामुळे, ग्रामस्थ, शेतकरी व‌ वसाहतीतील नागरिक, विद्यार्थी वर्गामध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. चिकलठाणा व झाल्ट्यातील या भुयारी मार्गामुळे आता नक्कीच अपघातास आळा बसणार आहे यामुळे येथील नागरिक समाधान व्यक्त करत आहे. रेल्वे प्रशासन व माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांचे या भागातील नागरिक आभार मानत आहेत.‌ लोकांचे हित पाहता त्यांनी अंत्यंत महत्वाचे हे काम पूर्ण करून दिले त्याबद्दल नागरिक धन्यता मांडत आहेत.