Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर - पैठण रस्ता वर्षभरही टिकणार नाही! माजी आमदार संजय वाघचौरे यांनी का केला आरोप?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर ते पैठण या महामार्गाच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम कांचनवाडी ते कौडगावपर्यंत अद्याप सुरूच झालेले नाही. या संदर्भात एनएचएआयच्या (NHAI) अधिकाऱ्याला विचारले असता छत्रपती संभाजीनगर नवीन वाढीव पाणीपुरवठा योजने अंतर्गत जलवाहिनीचे काम सुरू आहे. शिवाय मार्गातील सरकारी जागेवर अनेकांनी अतिक्रमणे केल्याने नोटीसा बजावण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी कारण पुढे केले.

दुसरीकडे कौडगाव पासून पैठणकडील मार्गावर २० पैकी पाच किलोमीटरचे काम झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र दरम्यान सदर काम कासवगतीने व निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने हा रस्ता वर्षभर देखील टिकणार नाही, असा आरोप पैठण तालुक्याचे माजी आमदार संजय वाघचौरे (पाटील) यांनी केला आहे.

या संदर्भात एनएचएआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर कामाचा वेग वाढविण्याबाबत व निकृष्ठ कामाची तपासणी करण्याबाबत निवेदन देणार असल्याचे वाघचौरे यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना सांगितले.

विशेष म्हणजे वाहतुकीसाठी खुल्या केलेल्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या  महामार्गावर एकाच वेळी जायकवाडी ते छत्रपती संभाजीनगर नवीन पाणीपुरवठा अंतर्गत मुख्य जलवाहिनीचे काम सुरू आहे. त्यातच एनएचएआय मार्फत अनेक ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून, प्रवाशांना इकडे आड तिकडे विहीर अशा बिकट वाटेतून प्रवास करावा लागत आहे. पुलाच्या कामासाठी खोदकाम केल्याने पर्यायी वळणमार्गालगत रस्ता देखील खचला आहे. पुलाच्या बांधकामासाठी वापरलेल्या उघड्या लोखंडी सळई पाहताच वाहनधारकांना येथून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

महामार्गाच्या कामादरम्यान पर्यायी मार्गासाठी जुन्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून हा जुना रस्ता आणि त्यावरील पूल वाहतुकीसाठी खुले करायला हवे होते. मात्र तसे न करता या रस्त्यावर आणि पुलांवर अनेक ठिकाणी असलेल्या मोठे भगदाडातून प्रवास करावा लागत असल्याने महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या नव्याने होत असलेले काम निकृष्ठ दर्जाचे असून, हा रस्ता वर्षभर देखील तग धरणार नाही, वर्षभरातच त्याची दयनीय अवस्था बघायला मिळेल, असा आरोप पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे (पाटील) यांनी केला आहे.

येथील चौपदरीकरणाचे काम किती निकृष्ट दर्जाचे होत आहे, याचे बघताक्षणी दर्शन घडत असले, तरी याकडे संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार, तालुक्यातील आमदार तथा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे व इतर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची खंतही वाघचौरे यांनी मांडली आहे. 

महामार्गावर एका बाजुने खडीकरण व मजबुतीकरणाचे काम चालू असून दोन्ही बाजूने काही ठराविक अंतरावर मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी रस्त्यालगत खोदकाम चालू असल्याने रस्ता दोन्ही बाजूने खचला आहे. असे असताना ठेकेदाराकडून खोदकामालगत सुरक्षितेसाठी मोठमोठे बॅरिकेट्स न लावता प्लास्टीक पाईप गाडून चिंध्या-चपाट्या बांधून ठेकेदार सावधानतेचे इशारा देत धन्यता मानत आहे. एकीकडे चौपदरीकरणासाठी खोदलेले खड्डे, वाहतुकीसाठी खुल्या ठेवलेल्या जुन्या महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, दुसरीकडे साईडपट्ट्यात मुख्य जलवाहिनीसाठी खोदण्यात आलेला नाला, त्यामुळे दहा ते बारा फुटाचे  खोल खड्डे आणि खचलेल्या रस्त्यामुळे खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकीवरील अनेकजण रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊन काहींचे बळी देखील गेले आहेत. असे असताना अधिकारी आणि रस्त्याचे काम करणारा ठेकेदार तसेच मुख्य जलवाहिनीचे काम करणारा ठेकेदार यांच्याकडून सावधानतेचे फलक लावण्यासाठी कुठलीही काळजी घेतली जात नसल्याचे प्रत्यक्ष प्रतिनिधीच्या पाहणीतूनही स्पष्ट झाले आहे. 

या मार्गावर रात्रंदिवस धावत असलेल्या वाहनांना रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने खड्डे चुकविताना वाहन पलटी होणे, समोरासमोर धडक बसणे, खड्ड्यात वाहन अडकून बंद पडणे आदी कारणाने वारंवार अपघात होत असल्याचे येथील नागरीकांनी सांगितले. त्यामुळे महामार्गावरील अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांसह अन्य प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याकडे अधिकारी, लोकप्रतिनिधींची डोळेझाक असल्याचे ग्रामस्थांनी देखील सांगितले आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामावर नियंत्रण ठेवणारे प्रकल्प अधिकारी इकडे फिरकत नाहीत. त्यामुळे हा रस्ता म्हणजे अधिकारी, ठेकेदारांचे कुरण बनल्याचे बोलले जात आहे. शासनाकडून रस्त्यावर कोट्यवधी रुपयाचा चुराडा होत असताना वरिष्ठ अधिकारी कामाची पाहणी करण्याचे कष्ट घेताना दिसत नाहीत. त्यामुळे रस्ता तयार करताना कामाचा दर्जा, गुणवत्ता, क्षमता यासाठी लागणारे साहित्य कोणते, किती प्रमाणात वापरायचे, याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाटसरूंनी केला आहे.

गेल्या २० वर्षांपासून चर्चेत असलेल्या पैठण-छत्रपती रस्ता चौपदरीकरणाचे काम जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू करण्यात आले आहे. मात्र कासवगतीने होत असलेल्या या कामाबाबत माजी आमदार संजय वाघचौरे यांच्यासह अनेकांनी तीव्र शंब्दात नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता चौपदरीकरणाचे कंत्राट बी. एम. दानवे हे जाॅईंट व्हेंचर असलेल्या ओजेएससी एव्हरस्काॅन या कंपनीला मिळाले आहे. इतर बारा कंपन्यांपेक्षा त्यांनी तब्बल ४१.२ इतक्या कमी टक्के दराने टेंडर भरल्याने हे काम त्यांच्या पदरात पडले आहे. रस्ता बांधकामाच्या एकूण ४९० कोटी एवढे टेंडर रकमेतून केवळ २८९ कोटीतून या रस्त्याचे काम मार्गी लागत आहे.

यासंदर्भात कंत्राटदार सिध्दार्थ शेट्टी तसेच एनएचएआयचे प्रकल्प संचालक रविंद्र इंगोले, अभियंता आशिष देवतकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या रस्त्याचे काम इतक्या कमी टक्के दराने मंजूर करून संबंधित ठेकेदाराला नियुक्त करताच जर हा रस्ता इतक्या कमी रकमेतून होणार असेल तर इतके पाचशे कोटीचे अंदाजपत्रक तयार केले कसे, इतक्या कमी टक्के दराने टेंडर भरले तर कंत्राटदार काम योग्य दर्जाचे काम करणार कसे, तसेच थेट एका राजकीय नेत्याच्याच भावाला कंत्राट मिळालेच कसे, असे अनेक प्रश्न उपस्थित करत पैठण तालुक्याचे माजी आमदार संजय वाघचौरे यांनी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते. त्यांनी या संदर्भात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे चौकशीची मागणी केली होती. मात्र, विभागाने त्यांच्या एकाही पत्राची दखल घेतली नाही. यासंदर्भात वाघचौरेंना कळवले देखील नाही. आता  पुन्हा वाघचौरे यांनी अत्यंत कासवगतीने आणि निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा प्रश्न उपस्थित करत विभागाला पत्र देणार असल्याचे 'टेंडरनामा'शी बोलताना सांगितले.

दरम्यान, प्रतिनिधीने रस्त्याच्या सखल भागात पाणी साचू नये यासाठी होत असलेल्या स्ट्राॅम वाॅटरची उंची रस्त्यापासून उंच असल्याने आसपासचे शेतकरी व व्यावसायिकांची वाट बंद होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे स्ट्राॅम वाॅटर अर्थात आरसीसी नाल्याचे काम भूमिगत स्वरुपाचे करून रस्त्याची लेव्हलपर्यंत ते करायला हवे होते. जेणेकरून ग्रामस्थांना त्याचा फूटपाथ म्हणूनही वापर करता आला असता व वाहने देखील ने - आण करणे सोपे झाले असते, आता आरसीसी गटाराची उंची वाढल्याने वाहने रस्त्यावर पार्क होऊन अपघाताचा धोका वाढवत असल्याचे आसपासच्या शेतकऱ्यांनी व हाॅटेल व्यावसायिकांनी सांगितले.