Chhatrapati Sambhajinaga Tendernama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar: साताऱ्यातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कागदावरच; कारण काय?

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : नऊ वर्षांपूर्वी सातारा - देवळाई नागरिकांसाठी छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी कोट्यवधींचे टेंडर काढण्यात आले. कंत्राटदार देखील निश्चित केला. त्याला कार्यारंभ आदेशही देण्यात आला. मात्र अद्याप येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कागदावरच असल्याचे 'टेंडरनामा'च्या तपासात उघड झाले.

यासंदर्भात साताऱ्यातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डाॅ. बाबासाहेब उनवने यांना संपर्क केला असता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी महसूल विभागाने सोलापूर - धुळे या राष्ट्रीय महामार्गालगत सरकारी जागा दाखविली होती. मात्र एसआरपीने तेथे विरोध केल्याचे त्यांनी सांगितले. देवळाईतील म्हाडा काॅलनीलगत मोठी जागा आहे. तेथील खुल्या जागेचा विचार केला, तर येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधले जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी देखील सातारा परिसरात मोठे सरकारी रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात केली होती. मात्र राज्य सरकार आणि महानगरपालिका प्रशासन कुठलाही विचार करत नसल्याने या भागातील नागरिकांची शोकांतिका कायम आहे.

सातारा, देवळाई, ईटखेडा या वसाहतींची संख्या सुमारे दीड लाखांच्या घरात आहे. या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधीचे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. या भागात राहणारी बहुतेक कुटुंब सर्वसामान्य व मर्यादित उत्पन्न असणारी आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेणे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. सातारा, देवळाई, इटखेडा पासून घाटी रुग्णालय सात ते आठ किलोमीटर आहे. नागरिकांना या ठिकाणी जाणे येणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही.

सातारा - देवळाई भागाचा महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर तत्कालीन ग्रामपंचायतीच्या आवारात एका छोट्याशा खोलीत  महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले होते. मात्र तेही प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ साथरोग निवारण व लसीकरणापुरतेच मर्यादित आहे. तेथेही जागा कमी पडत असल्याने महानगरपालिकेने १८ हजार रुपये महिन्याने एका खाजगी मालमत्तेत रुग्णालय स्थलांतरित केले. मात्र तेथेही मोठी जागेची अडचण असल्याचे टेंडरनामा पहाणीत समोर आले आहे.

त्यामुळे या भागात मोठ्या सरकारी रुग्णालयाची गरज आहे. तशी मागणीदेखील साताऱ्यातील जनसेवा महिला नागरी कृती समितीच्या ॲड. वैशालीकडू पाटील, जनसेवा नागरी कृती समितीचे बद्रिनाथ थोरात, संघर्ष समितीचे अध्यक्ष सोमीनाथराव शिराणे, तसेच शिवसेना शहर उप प्रमुख रमेश बहुले यांनी केली आहे. याभागात रुग्णालय उभारल्यास सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि महानगरपालिकेने सहानुभूतीपूर्वक विचार करून सातारा भागात मोठे सरकारी रुग्णालय उभारणे आवश्यक आहे.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून शहरात चार ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी टेंडर काढण्यात आले होते. त्यात सातारा -  देवळाईकरांसाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी मोठ्या बाता मारण्यात आल्या. शहरात चार ठिकाणी हाॅस्पिटल उभारण्यासाठी ३२ कोटी ६२ लाख १० हजार २५६ रुपये ३२ पैसे इतक्या किमतीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर शहरातील हायटेक इंन्फ्रा कंपनीने कमी टक्के दराने टेंडर भरल्याने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी २८ कोटी ३६ लाख ६७ हजार ४७१ रुपये २३३ पैसे इतक्या निधीचा तरतूद करण्यात आली होती.

यात सातारा भागात महापालिका अथवा सरकार पातळीवर एकही मोठे रुग्णालय नसल्याने व  घाटी रुग्णालयावरील रुग्णसेवेचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याने येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांनी इमारतीच्या बांधकामासाठी जागा निश्चित केली नसताना टेंडर काढले. कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला. मात्र अद्याप दोन वर्षांपासून येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कागदावरच आहे.

सातारा गावात जुन्या ग्रामपंचायतीची जागा आहे. येथील कार्यालयाची इमारत मोडकळीस आली आहे. या जागेवर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे सोडून महानगरपालिकेने भाड्याच्या घरात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले. सातारा - देवळाईची लोकसंख्या पाहाता येथे किमान दोनशे खाटांचे रुग्णालय उभारणे आवश्यक आहे.

- रमेश बहुले, शिवसेना उपशहरप्रमुख