Ch. Sambhajianagar Tendernama
मराठवाडा

Ch. Sambhajinagar : जुन्या मोंढ्यात खड्ड्यांचा 'बाजार'; रस्त्यांची लागली वाट अन् फुटलेल्या मलनिःसारण वाहिनीचे वाहतात पाट!

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर या स्मार्ट शहरातील व नुकतेच कचरामुक्ती आणि स्वच्छ शहरासाठी केंद्र सरकारकडून 'स्टार वन'चे मानांकन मिळाल्याचे बिरूद मिरवणाऱ्या महानगरपालिकेच्या हद्दीतील जुन्या मोंढ्यातील रस्त्यांची अक्षरक्ष: वाट लागली आहे. संपूर्ण रस्त्यांवर खड्ड्यांचा 'बाजार' भरला आहे. हे कमी म्हणून की काय, वाट लागलेल्या रस्त्यांवर फुटलेल्या मलनिःसारण वाहिनीचे पाट वाहत आहेत. यामुळे येथील व्यापाऱ्यांसह येथे खरेदीसाठी येणाऱ्या शहर व जिल्ह्यातील व्यापारी - ग्राहकांची किराणा व धान्य बाजारात मोठी दैना पाहावयास मिळते आहे.

जुन्या मोंढ्यातील रस्त्यांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. तसेच येथील मलनिःसारण वाहिनी देखील नव्याने टाकण्याची गरज असल्याची व्यथा येथील व्यापारी व ग्राहकांनी मांडली. किराणा व धान्याची सर्वांत जुन्या व मोठ्या बाजारपेठेत सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याची देखील यावेळी मागणी करण्यात आली.

किराणा व धान्याची होलसेल व मोठी प्रमुख बाजारपेठ असलेल्या जुन्या मोंढ्यातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, मलनिःसारण वाहिनीचे ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि गटारी तुंबून रस्त्यावर पसरलेले सांडपाणी असे चित्र या ठिकाणी दिसते. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे मोंढ्यातील अंतर्गत रस्त्यांची गत चाळीस वर्षांपासून अक्षरशः चाळणी झाली असून रस्ते पूर्णत: उखडले आहेत.

मोंढ्यातील खड्डेमय आणि मलनिःसारणमय रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. आधीच अरूंद रस्ते त्यात बाजारात हजारो क्विंटल अन्नधान्य, किराणा, मसाल्यांच्या व नारळांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो. वाहनांच्या गर्दीमुळे हजारो नागरिकांना मोंढ्यातील रस्त्यांचा वापर करता येत नाही. जुना मोंढा येथे येणारे परप्रांतीय मालट्रक व इतर वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे अनेकदा भांडणे होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. धान्याची ने-आण करणारी वाहने, मोंढ्यातील विक्रेत्यांची लगबग, किराणा दुकानदार, स्टेशनरी साहित्य विक्रीची लहानमोठी दुकाने या मार्गावर आहेत. मात्र गत चाळीस वर्षांपासून रस्त्यांना खड्ड्यांचे स्वरुप लाभले आहे.

या मार्गावर गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर पसरले आहे. उंच-सखल भागामुळे पाण्याचा निचरा होत नाही. अवकाळी पावसाचे व सांडपाण्याचे पाणी रस्त्यावर पसरल्यामुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. जुन्या मोंढ्यातील रस्त्यांची डागडुजी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. अंतर्गत रस्त्यांची डागडुजी, पॅचवर्कची गरज निर्माण झाली आहे. सगळेच रस्ते उसवले आहेत. येथील रस्ते मुळातच अरुंद आहेत. सालाबादप्रमाणे येणाऱ्या पावसामुळे डांबराचे थर मुळापासून वाहून गेल्यामुळे खडी, दगड, मुरूम व मातीवर आली आहे. सगळ्याच रस्त्यांची अवस्था बिकट आहे.

मालट्रक व इतर वाहने रस्त्याच्याकडेला तर कुठे रस्त्यांवरच उभी केली जात आहेत.आधीच अरुंद रस्ते, त्यात अवकाळी पावसाचे व फुटलेल्या मलनिःसारण वाहिनीतून वाहून येणाऱ्या पाण्याचे खड्ड्यात साचलेले तळे, त्यामधून वाट काढत वाहने हाकण्याची कसरत करावी लागत आहे. रस्त्याकडेला व रस्त्यांवरच उभ्या मालट्रकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तर अनेक व्यापाऱ्यांनी पत्र्याचे शेड, ओटे तयार करून रस्ते अडविले अडविले आहेत, अशांवर बुलडोझर चालविण्यासाठी महानगरपालिका प्रशासक कधी पुढाकार घेणार, असा सवाल येथील ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत नको ती कामे करून कंत्राटदारांची बिले काढली जात आहेत. मात्र जुन्या मोंढ्यात सुलभ स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली नाही. त्यामुळे  व्यापारी, महिला आणि येथे खरेदीसाठी येणाऱ्या महिलांसह पुरुषांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: स्वच्छतागृह नसल्याने महिलांना कुचंबना सोसावी लागत आहे.