Ravindra Nikam Tendernama
मराठवाडा

औरंगाबाद महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर गुन्हा दाखल; कारण...

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम (Ravindra Nikam) यांना मुस्लिम समाजाबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका भागातील अतिक्रमण काढण्यासाठी काही मुस्लीम नागरिक पोलिस बंदोबस्त मागत असताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिरोज खान गफ्फार खान (रा. सजयनगर, बायजीपुरा, औरंगाबाद) असे तक्रारदाराचे नाव आहे. खान हे अपंग जनता दल या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. कुरीअर सेवेत काम करून ते कुटुंब निर्वाह करतात. त्यांनी दिलेली माहिती अशी की, मनपा हद्दीतील बारुदगर नाला येथील एम. के. इस्टेट कॉम्प्लेक्समधील पार्किंगच्या जागेत बांधलेले अतिक्रमण काढण्यासाठी अपंग जनतादल संघटनेमार्फत महापालिकेत अर्ज दिला होता.

काहीच कारवाई होत नसल्याने त्यावर पुन्हा खान यांनी संघटनेमार्फत २९ मार्च रोजी महापालिकेसमोर ढोल बजाव अंदोलन केले होते. त्यात सहभागी झालेल्या संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जमलेल्या खान यांना महापालिका पोलिस पथकाने अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांचेकडे शिष्टमंडळ घेवून जाण्यास सांगितले. त्यानुसार खान यांनी शिष्टमंडळासह निकम यांची भेट घेतली. त्यात अतिक्रमण काढण्यासाठी सिटीचौक पोलिस स्टैशनला पत्र दिलेले आहे. पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे सांगत शिष्टमंडळाला रवाना केले होते.

मात्र पंधरा दिवसानंतरही कोणतीच कारवाई होत नसल्याने फिरोज खान यांनी संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यासह १३ एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास निकम यांची भेट घेतली व कार्यवाही बाबत प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी सिटीचौक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना दुरध्वनीवर संपर्क करत मी पोलिस बंदोबस्तासाठी दिलेल्या पत्रावर काय निर्णय घेण्यात आला, असा सवाल करताना समोर बसलेल्या खान यांना मुस्लीम समाजात द्वेष निर्माण होईल, असे आक्षेपार्ह शिविगाळ केल्याचा आरोप खान यांनी केला आहे. एकदा नव्हेतर दोनदा शिविगाळ केल्याचे व्हिडियो चित्रण खान यांनी केले आहे. त्यांच्या तक्रारीवरून निकम यांच्यावर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.