Aurangabad Tendernama
मराठवाडा

'बीड बायपासच्या भेगांची पाहणी करणार; विधानसभेत जाब विचारणार'

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील बीड बायपास (Beed Bypass) हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे. मात्र अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहे. खराब रस्त्यांमुळे याठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. या नव्याकोऱ्या रस्त्यावर चक्क अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या दिसल्या आणि झालेल्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी ठेकेदाराने चक्क डांबराच्या पट्ट्यामारत त्या भेगा झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. यावर टेंडरनामाने वाचा फोडताच ही बातमी शहरभर पसरली. त्यात केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत उपअभियंता शरद सुर्यवंशी यांनी मी गमतीने बोलल्याचे सांगत झालेल्या चुकीबद्दल क्षमाही मागितली. दुसरीकडे पुढील आठवड्यात या रस्त्याची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारणार असल्याची ग्वाही आमदार अतुल सावे (Atul Save) यांनी सांगितले.

सातारा-देवळाईसह बीड बायपास परिसरातील अनेक संघटना आणि नागरिकांच्या आंदोलनानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून या रस्त्यासाठी शासनाकडून २९१ कोटी रुपये मंजूर करून घेतले. हायब्रिड अ‍ॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून सुरू असलेल्या या चार पदरी रस्त्याच्या कामाची टेंडरनामा प्रतिनिधीने सलग तीन दिवस पाहणी केली होती.

औरंगाबाद शहराची लाईफ लाईन बनलेल्या बीडबायपास रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत पडलेला होता. गेल्या काही वर्षाभरात या बीड बायपासवर झालेले अपघात व त्यामुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबे, अनाथ होणारी मुले यांचा सारासार विचार करुन विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी या बीड बायपास रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न गांभीर्याने मांडला. शासनाकडून निधीही मंजूर झाल्याने बीड बायपासकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठेकेदाराने दिला विश्वासाला तडा
हायब्रिड अ‍ॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून सुरु असलेल्या चार पदरी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या पाहणीत केंब्रिज शाळा ते झाल्टा फाटा व झाल्टा फाटा ते महानुभाव आश्रम असा एकूण १७ किलोमीटर लांबीच्या बायपास पायाखाली घातला. त्यात झाल्टा फाटा ते गांधेली शिवारादरम्यान रस्त्याच्या मध्यभागी अनेक ठिकाणी पडलेल्या भेगा लपवण्यासाठी चक्क डांबर पट्टी मारून झाकण्याचा प्रकार उघडकीस आणला होता.