छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जिल्ह्याला स्वातंत्र्यानंतर प्रथमच तीन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत ; तर केंद्रात दोन, राज्यात तीन मंत्री असताना मात्र मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरातील मध्यवर्ती बसस्थानकाची पडझड अवस्था "जैसे थे" आहे. हे बसस्थानक कधी कोसळेल सांगता येत नाही. प्रवाशांना जीव मुठीत धरून निवार्याखाली बसेसची प्रतिक्षा करत बसावे लागत आहे. धक्कादायक म्हणजे रस्त्यांचीही बिकट अवस्था आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास मंत्रिपदासाठी अच्छे दिन आले. दोन केंद्रीय राज्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळात तीन कॅबिनेट मंत्री मिळाले पाच मंत्री अशी मोठी 'पॉलिटीकल पॉवर' मिळाल्याने मराठवाड्याची ऐतिहासिक जागतिक पर्यटननगरी आणि आठ जिल्ह्यांचे विभागीय राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील मंध्यवर्ती बसस्थानकाच्या विकासाच्या वाटा मोकळ्या होऊन तेथे अद्ययावत बसपोर्ट अथवा माॅडेल बसस्थानक उभे होईल , अशा छत्रपती संभाजीनगर जिल्हावासीयांच्या अपेक्षा मात्र फोल ठरल्या. एरव्ही एखादे मंत्रिपद जिल्ह्यात मिळाले तर भाग्य फळफळल्यासारखे वाटत असे; परंतु केंद्र सरकारचे दोन केंद्रीय राज्यमंत्री आणि राज्य सरकारमध्ये तीन कॅबिनेट मंत्री एकुणच असून केंद्र व राज्याच्या सत्तापदांमुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची बिकट अवस्था सुधारेल आणि शहराच्या वैभवात भर पडेल,अशी माफक अपेक्षा होती.
पर्यटनाची राजधानी, मराठवाड्याची राजधानी, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या हबपाठोपाठ आता शिक्षणाची आळंदी होत असलेल्या छत्रपती संभाजीनगरातील मध्यवर्ती बसस्थानकाची जुनी इमारत पाडून नवीन मॉडर्न इमारत उभी राहणार असल्याच्या बाता गेल्या २० वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळ मारत आहे. येथे २८ प्लॅटफार्मपासून ते खुले उपाहारगृह, चित्रपटगृहापर्यंत सर्व सोयी-सुविधा असतील असे आश्वासनांचे गाजर महामंडळाकडुन दिले गेले. प्रत्यक्षात हा विकास आराखडा कागदावरच राहीला. त्यामुळे प्रत्येक छत्रपती संभाजीनगरकरांना अभिमान वाटावा, असे बसस्थानक कधी निर्माण होणार याचीच किती वर्ष प्रतिक्षा करावी लागणार, असे प्रत्येकालाच आता वाटत आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक फार जुने झाले आहे. माजी मुख्यमंत्री शरद पवार तसेच माजी केंद्रिय रेल्वेमंत्री मधू दंडवते यांच्या हस्ते काही वर्षांपुर्वी या बसस्थानकाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. गेल्या ५० वर्षाच्या काळात येथील बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मोडकळीस आलेली जुनी इमारत पांडुन नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ४.६ एकर जागेवर नवीन मध्यवर्ती बसस्थानक उभारले जाणार होते.
वास्तुविशारदाने दिलेला नवीन नकाशा व प्राथमिक अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. नव्या इमारतीचे सविस्तर अंदाजपत्रकाचे कामही अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले होते. अद्ययावत बसस्थानकाची नवीन इमारत इंग्रजी ‘वाय’ या आकारात असल्याचा गवगवा करण्यात आला होता. नव्या विकास आराखड्यात बसस्थानकाचे प्रवेशद्वार पूर्वेस दर्शविण्यात आले होते. ते प्रशस्त व देखणे असेल. ऐतिहासिक शहराची ओळख जपत या प्रवेशगृहाच्या दक्षिण व उत्तर बाजूला येथील बीबी का मकबरा, पाणचक्की, शहरातील दरवाजे, देवगिरी किल्ला, जागतिक वारसा असलेले वेरूळ व अजिंठा लेणी याचे सर्वांना दर्शन होईल. फायबर म्युरलमध्ये या प्रतिकृती बनविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.येथून आत गेल्यावर भव्य ‘क्रश हॉल’ असेल. त्यात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ असेल. पुढे उजव्या व डाव्या बाजूस जेनेरिक मेडिकल स्टोअर्स असतील. याशिवाय तिकीट आरक्षण कार्यालय, वाहतूक नियंत्रण कार्यालय, पार्सल रूम, महिलांसाठी हिरकणी कक्षही तसेच शिवशाही, शिवनेरीमध्ये बसणाऱ्या प्रवाशांसाठी वातानुकूलित कक्ष असतील, असा विकास आराखडा बसस्थानकात लावण्यात आला होता.
सध्याच्या बसस्थानकात १७ प्लॅटफार्म आहेत. मात्र, नवीन बसस्थानकात २८ प्लॅटफार्म असतील. प्रथम दोन्ही बाजूसस प्रत्येकी ८-८ प्लॅटफार्म, त्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच पुढील बाजूस प्रत्येकी ६-६ प्लॅटफार्म व त्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असतील. मध्यभागी मुख्य नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) असेल. येथून सर्व २८ प्लॅटफार्म दिसू शकतात, अशी रचना या कक्षाची करण्यात आली होती.आसपास १२ छोटी दुकाने उभारण्यात येणार होती.तसेच विनावाहक गाड्यांच्या तिकिटासाठी ४ स्वतंत्र खिडक्यांची व्यवस्था दर्शविल्याचे आली होती. हे सर्व प्लॅटफार्म छताने अच्छादित असतील. या मॉडर्न मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रस्तावित इमारतीसाठी १८ कोटी २९ लाखांची मंजुरी राज्य शासनाने मंजुर केले होते. बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांसाठी दोन ठिकाणी सुमारे सव्वा एकर जागेवर वाहनतळे, आप्तेष्टांना बसमध्ये बसवून त्वरित निघून जाणाऱ्या वाहनधारकांच्या दुचाकी व चारचाकीसाठी बसस्थानकाच्या समोरील बाजूस वाहतळ , वाहन उभे करून गावाला जायचे आहे, अशांसाठी बसस्थानकाच्या उत्तरेस (जिथे निवासस्थाने होती) वाहनतळ, त्याच ठिकाणी समोरील बाजूस रिक्षास्टँडसाठी जागा ठेवण्यात आली होती. बसस्थानकामधून उत्तर बाजूस वाहनतळामध्ये वाहन घेण्यासाठी प्रवाशांना जाण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात येणार होते.
संपूर्ण बसस्थानकाचे पाणी फेरभरण करण्यात येणार होते. अंडरग्राऊंड वॉटर टँक करण्यात येणार होते. पावसाळ्यात जमा झालेल्या पाण्यावरच वर्षभर बसस्थानकात पाणी पुरविले जाणार होते. याशिवाय बसस्थानकाला ग्रीन बिल्डिंगची संकल्पना येथे राबविण्यात येणार होती. पहिल्या मजल्यावर उत्तर दिशेला १०० ते १२० आसनक्षमतेचे चित्रपटगृह संकल्पीत केले होते. तर दक्षिण बाजूस वाहक व चालकांना राहण्यासाठी प्रशस्त हॉल, अकाऊंट कार्यालय असेल. तसेच वाहक-चालकांच्या खुली व्यायामशाळा, इनडोअर गेम्स, तसेच पहिल्यावर खुले उपहारगृह असेल, अशी टिमकी वास्तुविशारदाने मारली होती. प्रत्यक्षात महानगरपालिका आणि एसटी महामंडळाच्या बांधकाम परवानगी क्षुल्कावरून वाद झाला. दोघांच्या भांडणात विलंब झाल्याने बांधकामाचे भाव वाढले, यात कंत्राटदाराने भाव वाढीचा तगादा एसटी महामंडळाच्या अधिकार्यांनी धुडकावून लावला. शेवटी कंत्राटदाराने माघार घेत काम करण्यास नकार दिला .