Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

भुमरे साहेब, 'या' प्रमुख जिल्हा मार्गांची साडेसाती कधी मिटणार?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री आणि आमदार संजय शिरसाट यांच्या पश्चिम मतदार संघात असणाऱ्या सीमेवरील जुना बीडबायपास आणि धुळे - सोलापूर हायवेला जोडणारे प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ७५ आणि क्र. ३५ हे रस्ते पालकमंत्री भुमरे यांना एकदम 'ओके' दिसत आहेत काय? कारण त्यांना राष्ट्रीय महामार्ग धुळे - सोलापूर आणि जुन्या बीड बायपासवरून आलीशान गाडीतून प्रवास करताना कुठेच ठेच लागत नाही की, त्यांच्या पोटातील पाणी हालत नाही. परिणामी त्यांना या मार्गांवरील खड्डे दिसणार कसे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

गावकऱ्यांना मात्र नावालाच प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या आपल्या गावखेड्यातील रस्त्यावरून  दररोज अंगठेफोड सहन करत प्रवास करावा लागतो आहे. जिल्हा परिषदेची वार्षिक योजना, नाबार्ड आणि मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशिष्ट हेडखाली तसेच पंचायत समित्यांच्या ग्रामीण रस्ते विकास योजनेअंतर्गत गावात उद्घाटनाच्या कोनशीला झळकविण्यात येतात, पण रस्त्यांच्या नशिबी मात्र खड्ड्यांची साडेसाती कायम आहे. याचे बोलके उदाहरण असणारा फलक देखील आमदार संजय शिरसाट यांच्या मतदार संघातील गांधेली गावात नजरेस पडतो . मात्र रस्त्यांवर डांबर देखील शिल्लक राहीलेले दिसत नाही. मग हा निधी कोणाच्या खिशात गेला, असा प्रश्न उपस्थित होतो.

औरंगाबाद तालुक्यातील आमदार हरिभाऊ बागडे यांच्या मतदार संघातील औरंगाबाद - पिसादेवी - नारेगाव, नारेगाव जुना कचरा डेपो - गोपाळपूर, जालनारोड - वरूड, जालनारोड - टाकळी शिंपी - टाकळी वैद्य - भालगाव - चितेगाव, जालनारोड जुना जकात नाका - जुना बीड बायपास शनीमंदीर - नवा बीड बायपास, तसेच आमदार संजय शिरसाट यांच्या पश्चिम मतदार संघातील विटखेडा - सातारा - देवळाई - बाळापुर - गांधेली - आडगाव - या सोलापूर - धुळे हायवे आणी बीड बायपासला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यात अनेक वाहनांचे छोटे-मोठे अपघात झाले असून जीवित वा वित्त हानी टाळण्यासाठी रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून होत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहराच्या हद्दीपासून अगदी जवळ असलेल्या या गावखेड्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे येथील ग्रामस्थ गेल्या २५ ते ३० वर्षांपासून हैराण आहेत. गांधेली गावात सन २०१९ मध्ये सातारा - देवळाई - बाळापुर - गांधेली - आडगाव या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष दुरूस्ती अंतर्गत हेडखाली रस्ता दुरूस्तीच्या उद्घाटनाचा फलक लावला आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याची कामे सुरू करण्यात आली नाहीत.

ज्यावेळी एखाद्या रस्ता दुरूस्तीचा अंदाजपत्रकासह प्रस्ताव सरकारकडे पाठवला जातो, त्यावेळी सरकार प्रस्ताव मंजूर करताना विशेष दुरूस्ती अंतर्गत हेडखाली विशिष्ट क्रमांक देतो. त्यानंतर कामाला मंजुरी मिळाल्यावर टेंडर काढले जाते. कामाची यादी जिल्हा निबंधक कार्यालयाकडे पाठवली जाते. टेंडर काढल्यानंतर एजन्सी फिक्स केली जाते. येथील रस्ता दुरूस्तीच्या उद्घाटन फलकावर सारे काही स्पष्ट असताना दुरूस्तीचा निधी नेमका कुठे गेला, हा संशोधनाचा विषय आहे.

टेंडरनामाने सलग आठ दिवस या दोन्ही मतदार संघातील रस्त्यांची निवड करत प्रत्यक्ष दुचाकीवरून पाहणी केली. दरम्यान कुठेही डांबर शिल्लक नसलेल्या रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीचे प्रमाण वाढल्याचे दिसले. खड्डेमय झालेले रस्ते अजुनही ३० ते ३५ वर्षापासून चांगले होण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नागरिक या खड्डेयुक्त रस्त्यांना व धुळीला वैतागले आहेत. येथील कुठल्याही रस्त्यावरून धुळे - सोलापुर, जुना बीड बायपास आणि औरंगाबाद - जालनारोडवर यायचे असेल, तर या रस्त्यांचा आधार घ्यावाच लागतो. या भागातील धार्मिक आणि ऐतिहासीक स्थळांना भेटी देण्यासाठीच तसेच सरकारी - निमसरकारी कामकाजानिमित्त अनेक  काही भागातून नागरिक वाहनांनी येत असतात. या रस्त्यांच्या दुरावस्थेचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.

ऐतिहासिक पर्यटननगरी असे बिरूद मिरवणाऱ्या छत्रपती संभाजीनगरातील देवळाई चौक ते साई टेकडी ते गाडीवाट - परदरी - कचनेरकडे  जाणाऱ्या रस्त्याचे काम तीन वर्षांपूर्वीच झाले होते. मात्र दोन कोटीच्या या रस्त्याची आज वाट लागली आहे. दरम्यान प्रतिनिधीने यासंदर्भात माहिती घेतली असता बीड बायपास ते देवळाई गावापर्यंत काॅंक्रिट रस्त्यासाठी १८ कोटी मंजूर असल्याची सुखद वार्ता कळाली. रस्ता दुरूस्तीसाठी टेंडर प्रसिध्द करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. झाल्टाफाटा ते सुंदरवाडी ते टाकळीवैद्य फाटा या रस्त्याचे तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काम झाल्याने रस्ता टकाटक आहे. मात्र टाकळी शिंपी ते टाकळी वैद्य ते राष्ट्रीय महामार्ग जालनारोड, टाकळी शिंपी ते भालगाव - चितेगाव सोलापूर - धुळे हायवेला जोडणाऱ्या या रस्त्याची व्यथा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, अशीच झाली आहे.

या दरम्यानचा विटखेडा - सुधाकरनगर -  सातारा - देवळाई - बाळापुर - गांधेली    पर्यंतचा रस्त्यावर  वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे  तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. परंतु या दुरुस्तीकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे.

रेणूकामाता मंदिरापासून सातारा गावातून जाणाऱ्या अहिल्याबाई होळकर चौकापासून पुढे सोलापूर - धुळे हायवेला जुळणाऱ्या या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. यावरन प्रवास करायचा विचार केला तरी वाहनचालकांच्या अंगावर काटा येतो. या रस्त्यांवरुन नियमित प्रवास करणाऱ्या वाहनांचा दुरुस्तीचा खर्च वाढल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. अनेकांना मानेचे-मणक्याचे त्रास सहन करावे लागत आहेत. या अनेक रस्त्यांवरुन प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. या रस्त्यांची दुरुस्ती किंवा नुतनीकरण लवकर करावे, अशी मागणी होत आहे.

जुना बीड बायपास गांधेली ते सोलापूर - धुळे हायवे क्राॅस करून बाग तलाव या निजामकालीन पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करताना पाठिचे व मणक्यांचे विकार अनेकांना उद्भवले आहेत. हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.