औरंगाबाद (Aurangabad) : केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने पैठण (Paithan) शहरातील जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) शेतकऱ्यांच्या हितासाठी 'उजनी'च्या धर्तीवर आठ हजार कोटींचा तरंगता सौर उर्जा प्रकल्प (Solar Power Project) उभारणार असल्याची घोषणा ११ महिन्यांपूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी केली होती. मात्र या प्रकल्पासाठी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत कडा कार्यालयाचे अधिक्षक अभियंताच अनभिज्ञ असून, अद्याप या प्रकल्पाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) तयार केला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प होईल किंवा नाही, याबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अकरा महिन्याचा काळ लोटला गेल्यानंतर देखील यावर अद्याप कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. यासंदर्भात गोदावरी पाटबंधारे महामंडळांतर्गत कडा कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता केंद्र व राज्य सरकारकडे यासंदर्भात पत्रव्यवहार झाला होता. पण पुढे काय झाले हे सांगता येणार नसल्याचे धक्कादायक उत्तर त्यांनी दिले. यासंदर्भात खासदार तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
वातावरण बदलाची मोठी समस्या सध्या जगाला भेडसावत आहे. त्यामुळे हरित ऊर्जा निर्मितीवर (Green Energy) विविध देश भर देत आहेत. भारताने देखील पाश्चिमात्य देशांबरोबर ग्रीन एनर्जीच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरवात केली आहे. देशातील वीजेचे उत्पादन आणि त्या मानाने तिची मागणी आणि पुरवठ्याचे गणित कधीच जुळत नाही. उन्हाळ्यात मोठ्याप्रमाणात वीजेची तूट निर्माण होते. आर्थिक बाबतीत विचार केल्यास, सद्यस्थितीत १२ रुपये प्रति युनिट वीज विकत घ्यावी लागते.
वीजेच्या तीव्र समस्येवर मात करण्यासाठी भागवत कराड यांनी उजनीच्या धर्तीवर पैठणच्या प्रसिद्ध जायकवाडी धरणावर फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट उभारण्याचा निर्णय अकरा महिन्यांपूर्वी घेतला होता. मात्र ही घोषणा फक्त प्रसिध्दीसाठीच होती का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांर्गत या प्रकल्पासाठी केवळ काही महिने कागदी घोडे नाचवले गेले. प्रत्यक्षात यासाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) तयार केला नसल्याचे टेंडरनामाच्या तपासात उघड झाले आहे. प्रकल्प अहवालासाठी कोणती एजन्सी नेमली आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील माहिती नाही.
आशिया खंडातील सर्वांत मोठे मातीचे धरण असलेल्या जायकवाडी धरणावर (Jayakwadi Dam) तरंगणारा सौर प्रकल्प उभारण्याविषयी केंद्र आणि राज्यांतील संबंधित मंत्र्यांची लवकरच बैठक होईल, असा दावा कराड यांनी १० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता. मात्र अकरा महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप एकही बैठक झालेली नाही.
सौर ऊर्जा प्रकल्प तयार झाल्यानंतर ती वीज ३ रुपये प्रति युनिटने मिलूळू शकेल, असा दावा करत त्यांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांना केवळ रात्रीच वीज उपलब्ध असते. मात्र या प्रकल्पामुळे दिवसादेखील वीज उपलब्ध होण्याची शक्यताही कराड यांनी व्यक्त केली होती.
जगभर नैसर्गिक संपत्तीचे ज्वलन सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ऊर्जेबाबत योग्य नियोजन असले तर बरेच विषय निकाली निघतील, असे म्हणत त्यांनी जायकवाडी धरणाच्या भव्यतेचा विचार करता याठिकाणी सुमारे दोन हजार एकर भागावर तरंगणारा सौरऊर्जा प्रकल्प उभारता येऊ शकतो. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांच्याशी या प्रकल्पाविषयी बोलणे झाल्याची माहितीही मंत्री कराड यांनी दिली होती. तसेच महाराष्ट्राचे माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील व माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी देखील दिल्लीत लवकरच या विषयावर बैठक होईल, अशी माहिती त्यांनी दिली होती. मात्र यासंदर्भात पुढे काहीही झाले नसल्याचे टेंडरनामा तपासात समोर आले आहे.
जायकवाडी वरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा खर्च कराडांनी अपेक्षित केला होता. एक इंच देखील जमीनीची गरज नसलेल्या या प्रकल्पातून तयार झालेल्या वीजेचा शेतकरी आणि उद्योगांना फायदा व्हावा यासाठी हा प्रकल्प उभा करणार असल्याचा मनसुभा त्यांनी आखला होता. चार एकर भागांतून एक मेगावॅट वीजनिर्मिती होईल. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी प्रत्यक्ष जमिनीची गरज नसेल. उलट या प्रकल्पातून तयार झालेल्या वीजेचा शेतकरी आणि उद्योगांना फायदा होईल, असे त्यांनी दाखवलेले स्वप्न मात्र हवेतच विरले.