Beed Bypass Road Tendernama
मराठवाडा

Beed Bypass Road : 400 कोटी खर्चूनही 'या' महामार्गाच्या दर्जाला का गेला 'तडा'?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या बीड बाह्यवळण (बायपास) रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम तीन वर्षांपुर्वी हाती घेण्यात आले. मात्र म्हणावा तसा रस्त्याचा दर्जा कंत्राटदाराला राखता आला नाही. पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी या रस्त्यासाठी कोरोना काळात राज्यातच नव्हे तर देशभरातील सर्वच विकासकामांना स्थगिती असताना तब्बल २९२ कोटी रुपयांचा निधी खेचून आणला होता. मात्र कंत्राटदारांने आमदारांच्या प्रयत्नांना तडा दिला.

नव्यानेच केलेला हा रस्ता तीस वर्षांतच ३० वर्षे जुना दिसत आहे. अनेक ठिकाणी उखडलेला सरफेस आणि आरपार पडलेल्या भेगा रस्त्यात निकृष्ट साहित्य वापरल्याचे ओरडून सांगत आहेत. दुसरीकडे छोट्या पुलांसह जोड रस्ते आणि या मार्गावरील तीन पुलांखालच्या सेवा रस्त्यांचे काम देखील अर्धवट आहे. या मार्गावर काही ठिकाणी वाहतूक सिग्नलचे नियोजन देखील कागदावरच असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या बीड बाह्यवळण (बायपास) रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अखेर जून २०२० मध्ये कोरोना काळात सुरू झाले होते. २०२३ संपत आला. त्यात शहरात तीन वर्षांनंतर कोरोना पुन्हा परत आला. मात्र अद्याप या रस्त्याचे काम संपवून वाहनचालकांना मार्ग मोकळा करण्यासाठी कंत्राटदाराची मानसिकता दिसून येत नाही. त्यात रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याने सातारा, देवळाई व बीड बायपास परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी त्रासात भर टाकली आहे.

लाइफ लाइन समजल्या जाणाऱ्या जालनारोडवरील शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीस पर्याय म्हणून बनविलेल्या बीड बाह्यवळण (बायपास) रस्त्याच्या मजबुतीकरणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून रेंगाळत होता. केंद्र व राज्य सरकारने अनेक पर्याय शोधले पण त्यासाठी निधीची उपलब्धतता होत नव्हती. हायब्रीड अन्यूटी उपक्रमातून या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचा ठराव संमत करण्यात आला. इस्टिमेट तयार केले गेले. त्यातअंतर्गत जवळपास चारशे कोटीतून होणाऱ्या या रस्त्यावर देवळाई, एमआयटी व गोदावरी ढाब्यासमोर तीन उड्डाणपूल उभारण्यात आले.

पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज चौक, झाल्टा फाटा ते निपानी फाटा, हाॅटेल अंबिका ढाबा ते सोलापूर हायवेपर्यंत सिमेंटचा रस्ता बनविण्यात आला आहे. विशेषतः करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विभागांच्या खर्चाला कात्री लावली असताना बीड बायपासच्या कामाला त्याचा अडथळा येऊ दिला नाही.

टेंडर प्रक्रियेनंतर 'जीएनआय मनजीत जॉइंट व्हेंचर'ला हे काम मिळाले आहे. एप्रिल २०२० मध्ये बीड बायपासचे काम सुरु झाले होते. पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा  आणि झाल्टा फाटा ते केंब्रीज चौक तसेच झाल्टा फाटा ते निपानी फाटा व अंबिका ढाबा ते सोलापूर हायवे पर्यंत सिमेंटचा रस्ता  करण्यात आला. मात्र अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत.

या मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारणीचे काम झाले. त्यात आधी पुलांची उंची कमी झाल्याचे दिसून येताच नंतर पुलाखालचे सेवा रस्ते खोदून उंची वाढवण्यासाठी खटाटोप करण्यात आला.मात्र अद्याप सेवा रस्त्यांचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे.  वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या मार्गावर सिंग्नल बसविण्यासाठी कंत्राटदाराने नागरिकांना ग्वाही दिली होती. अद्याप सिंग्नल कागदावरच आहेत.

महानुभाव चौक ते झाल्टा फाटा या १३ किलोमीटरच्या  बीड बायपास वर आठ ते नऊ ठिकाणी छोट्या पुलांचे काम देखील धीम्या गतीने सुरू आहे. देवळाई चौकातील पुलाखालून मोठ्या खड्ड्याने चढ उतार असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. विशेषत: महिलांची मोठी दमछाक होत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११चा एक टप्पा शहरातून (जालना रोड) जातो. या रस्त्यावरून जड वाहतूक बंद करून ती शहराबाहेरून वळविण्यासाठी बीड बायपासची निर्मिती केली गेली.

पुढे बीड बायपासच्या दोन्ही बाजूंनी वसाहतींचा आवाका वाढल्याने सोलापूर हायवे सातारा देवळाईतील डोंगरातून काढण्यात आला. त्यामुळे नांदेड, जालना तसेच बीडकडून येणारी वाहने बीड बायपासकडून न जाता बाहेरून पुणे, मुंबई, नाशिककडे जातात, त्या वाहनांमुळे रस्त्यावरून जड वाहनांची फारशी वाहतूक देखील नाही. असे असताना सिमेंट रस्त्यावर भेगा पडल्याने कामाच्या दर्जावर या भागातील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

आमदार शिरसाट यांनी नागरिकांचा त्रास कमी व्हावा यासाठी 'हायब्रीड ॲन्यूटी' प्रकल्पातून हा रस्ता मजबूत केल्याचा निर्धार केला रस्त्याच्या एकूण किंमतीपैकी ६० टक्के रक्कम राज्य सरकारकडून संबंधित कंत्राटदाराला कामाच्या प्रगतीच्या टप्प्यानुसार देण्यात येत आहे. उर्वरित ४० टक्के रक्कम आठ वर्षांत २० टप्पे करून दिली जाणार आहे. असे असताना कंत्राटदाराने या रस्त्याची माती का केली, हा संशोधनाचा विषय आहे. या रस्त्याची राज्य गुणवत्ता निरीक्षक पुणे यांच्यामार्फत तांत्रिक तपासणी केली जावी, अशी मागणी सातारा, देवळाई व बीड बायपासवासीयांमधून होत आहे.