छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : बीड बायपासवरील नवीन छोट्या पुलांचे काम अद्याप अपुर्ण आहे. नव्यापुलांना जुनेच कठडे आहेत. ते देखील धारातीर्थी पडले असल्याने पुलाखाली वाहने कोसळ्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे. मात्र अद्याप छोट्या पुलांसह देवळाई चौक आणि एमआयटी उड्डाणपुल व सर्व्हिस रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यात अती उंचीचा दुभाजक कमी, उंचीचे अंडरपास आणि पुलाच्या चढ-उतारासमोरच दुभाजक अपघाताला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे ३०० कोटी खर्चूनही पूल अद्याप धोकादायकच असल्याचे दिसत आहे.
बीड बायपास काँक्रिट रस्ता झाल्याने वाहनांची वेग मर्यादा वाढली आहे. त्यामुळे छोट्या पुलांचे जुने जखमी कठडे काढुन तातडीने नव्याने कठडे उभारण्याची गरज असल्याचे टेंडरनामा पाहणीत समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे ठेकेदाराने ज्या नाल्यांवर नवीन पुलांची उभारणी केली आहे. तेथे रस्त्याच्या कडेलाच मोठा गॅप ठेवल्याने अपघाताचा दुहेरी धोका वाढला आहे. बीड बायपासच्या सदोष संग्रामनगर उड्डाणपुलांसह चार फुट अती उंचीच्या दुभाजकाबाबत टेंडरनामाने वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. दरम्यान विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी दिलेल्या सुचना ठेकेदाराकडून अद्यापही पाळल्या गेल्या नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दुसरीकडे आमदार अबु आझमी यांनी देखील सदोष कामाबाबत लक्षवेधी केली असता बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी काम बरोबर असल्याचे सांगितले होते. मात्र आता त्यांनी खरोखर या राष्ट्रीय मृत्युच्या महामार्गाची पाहणी करून ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई का करू नये, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नव्या छोट्यापुलांसह सुंदरवाडी उड्डाणपुलावर काँक्रिट टाकल्याने रस्त्याची उंची वाढुन कठड्याची उंची कमी झाल्याने हा पुल देखील गैरसोयीचा ठरत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. विशेष म्हणजे सर्व्हिस रोडचे काम देखील अर्धवट असून कुठल्याही कामादरम्यान सुरक्षाफलक आणि रेडियम पट्ट्यांचा अभाव असल्याने अपघाताची मालिका सुरूच आहे.
गेल्या दोन वर्षापासून बीड बायपास रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, यावरील देवळाई चौक, संग्रामनगर आणि एमआयटी पुलांची लांबी-रुंदी व अंडरपासची उंची देखील कमी ठेवण्यात आली आहे. पुलाच्या चढ-उतारासमोरच उंच दुभाजकाला वाहने धडकुन अपघाताची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक भेडसावत आहे. बीड बायपास रोडवरील अरुंद रस्ता, दोन्ही बाजुने मोठी दाट वसाहत, वाणिज्य प्रतिष्ठाने आणि कार्यालये यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. सातारा-देवळाईतील जनसेवा नागरी कृती समिती, सातारा-देवळाई विकास समिती, सातारा संघर्ष कृती समिती, राजेशनगर कृती समिती, राजे शिवछत्रपती क्रीडामंडळ, जनसेवा महिला समिती आदी सेवाभावी संस्थांनी आवाज उठवला. मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. शेवटी कित्येक वर्षांपासून रेंगाळून पडलेला प्रश्न अखेर निकाली निघाला.
यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, प्रभारी तत्कालीन मनपा आयुक्त सुनिल केंद्रेकर तत्कालीन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी योग्य निर्णय घेतला. त्यानुसार सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करत रस्त्यात अडसर ठरणारी विविध बांधकामे काढली, तर अनेक बांधकामे नागरिकांनीही काढून घेतल्याने १५ मीटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाला मोकळा करून दिलेला आहे. त्यावर ६ मीटरच्या ६ पदरी रस्त्याचे काम सुरू करण्यात येणे अपेक्षित होते. मात्र महापालिका हद्दीतील सर्व्हिस रस्त्याकडे दुर्लक्ष करत सार्वजनिक बांधकाम विभागाने ३० मीटर रस्त्यातच कमी रूंदीच्या लेअर टाकुन सहापदरी रस्त्याचे अंदाजपत्रक तयार केले. संग्रामनगर सदोष उड्डाणपुलावर आवाज उठवताच विभागाने झाकलेली मुठ सव्वालाखाची म्हणत आधी हा पुल वाहतुकीस खुला केला. आता देवळाई, एमआयटी पुलाचे काम ३१ मेअखेर पूर्ण करण्याची ग्वाही जागतीक बॅक प्रकल्प शाखेतील अधिकारी देत आहेत. या दोन्ही पुलांवरील मुख्य काम अद्याप बाकी असून, ते काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागलेली दिसत आहे. तसेच सर्व्हिस रोडचे देखील काम अर्धवट आहे.