औरंगाबाद (Aurangabad) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालेल्या १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश कुलपतीनी दिल्यानंतर आता विद्यापीठ प्रशासनाने १२५ अधिकारी - कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कोट्यवधी रुपयांच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी नसल्याबाबत २०१५ मध्ये हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
यानंतर याप्रकरणी तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी यासंदर्भात चौकशी करून अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकरणाची सत्यता पडताळून अपेक्षित बाबींचा सखोल अहवाल समितीमार्फत शासनास सादर करण्यासाठी डॉ. आर. एस. धामणस्कर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीने शासनास प्राथमिक चौकशी अहवालही सादर केला होता.
चौकशी अहवालात शैक्षणिक विभागाकडील संलग्नीकरण, शुल्क वसुलीची नोंदवही अद्ययावत नसणे, विना टेंडर करण्यात आलेली खरेदी, अतिरिक्त रक्कम विभागांना प्रदान करणे, विद्यापीठातील विविध विभागांनी खरेदीप्रक्रियेमध्ये किमान टेंडर दरपत्रके प्राप्त नसताना कोट्यवधीची खरेदी केली आदींसह इतर अभिप्राय चौकशी समितीने दिले होते.
विद्यापीठात झालेल्या १२७ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी कुलपती कार्यालयाच्या आदेशाप्रमाणे आता कारवाई सुरू करण्यात येणार आहे. आर्थिक घोटाळ्यात दोषी आढळलेल्या अधिकारी आणि विविध प्राधिकरणाच्या सदस्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.