BAMU Road Tendernama
मराठवाडा

BAMU: सर्व रस्ते चकाचक; मग एकाच रस्त्यावर घसरगुंडीचा 'खेळ' का?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (BAMU) मुख्य आणि अंतर्गत सगळेच रस्ते चकाचक आहेत. मात्र कुलगुरूंचे निवासस्थान आणि नाट्यगृहाच्या मधून भारतीय खेल प्राधीकरणाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दैना उडाली आहे. या रस्त्यांची अवस्था ग्रामीण भागातील रस्त्याहून वाईट झालेली आहे.

विद्यार्थी, प्राध्यापक अधिकारी, कर्मचारी आणि भारतीय पुरातन सर्वेक्षण विभागातील अधिकारी तसेच पालकांना रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. या रस्त्यांची अक्षरक्षः चाळण झालेली आहे. या खराब रस्त्यावरून पायी चालणाऱ्यांची आणि वाहन चालकांची गाळण उडत आहे. मात्र, विद्यापीठाअंतर्गतच येणाऱ्या या रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचे का दुर्लक्ष आहे, हा खरा संशोधनाचा विषय आहे.

विशेष म्हणजे भारतीय खेल प्राधिकरण ते भारतीय पुरातन सर्वेक्षण विभाग आणि गोपीनाथरावजी राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन केंद्राकडे जाणारा रस्ता देखील टकाटक आहे, मग हा एकच रस्ता का अर्धवट सोडण्यात आला. यावरून भारतीय खेल प्राधिकरण आणी विद्यापीठाचे काही 'राजकारण' आहे का, असा संशय येतो. मात्र या दोघांच्या वादात इतरांना घसरगुंडीचा खेळ खेळावा लागत आहे.

विद्यापीठातील जुने डांबरी रस्ते उखडून नविन काॅंक्रिटचे रस्ते बांधण्यात आले. याचसोबत विद्यापीठातील अंतर्गत रस्त्यांचे देखील बांधकाम करण्यात आले. मात्र, भारतीय खेल प्राधिकरणाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे निर्माण होऊन रस्त्यांची चाळण झाली असून, यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

गत पंधरा वर्षांपासून चाळण झालेल्या या रस्त्याची सुधारणा व्हावी, यासाठी भारतीय खेल प्राधिकरणाने विद्यापीठातील स्थापत्य विभाग आणी कुलगुरूंना अनेकदा पत्र व्यवहार केला. मात्र विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली नाही. याच रस्त्याच्या मागे व पुढे सिमेंटीकरण करण्याचे काम केले. मात्र, या रस्त्यांची अवस्था पूर्णपणे बिकट आहे.

या खराब रस्त्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने विद्यापीठातील सर्वच रस्त्यांची कामे केली. मात्र भारतीय खेल प्राधिकरणाकडे जाणाऱ्या या एक किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाल्याचे माहित असून, दुरूस्तीकडे जाणून बूजून कानाडोळा केला आहे.

विशेष म्हणजे याच मार्गावर विद्यापीठाची आमराई, गेस्ट हाउस, वस्तीगृहे, भारतीय पुरातन सर्वेक्षण केंद्र, गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन केंद्राच्या भव्यवास्तू आहेत.  त्यामुळे या मार्गावरून जाताना खड्डयांचा त्रास सगळ्यांनाच भोगावा लागत आहे. रस्त्यात डांबरच शिल्लक नसल्याने खडी आणि दगडगोटे बाहेर आलेले आहेत. यामुळे वाहनचालक स्लीप होत आहेत. मात्र, तरीही रस्त्याची दुरूस्ती  केली जात नाही.

निधीची कमतरता नाही

विद्यापीठाला निधीची अजिबात कमतरता नाही. विद्यापीठातील सर्व रस्त्याचे एकाच वेळी काम झालेले आहे. अनेक रस्त्यांची काम केली आहेत. मात्र याच खराब रस्त्याला प्राधान्य दिले जात नाही.