औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद तालुक्यातील एका रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देऊन बारा महिन्यांचा काळ लोटला तरी काम सुरू करण्यात आलेले नाही. मोरी बांथकामासाठी रस्ता ठिकठिकाणी अर्धवट खोदून ठेवण्यात आला असून, रस्त्याच्या कडेला खडी-मुरूमाचे ढिगारे पडून आहेत. एकूणच रस्त्याच्या दुर्दशेकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अभियंत्यांनी कंत्राटदाराला 'अर्थपूर्ण' अभय देत पूर्णपणे दुर्लक्ष केले. यावर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाच्या तंबूत दिसताच अधिकाऱ्यांनी कुठलिही दिरंगाई न करता यंत्रणा कामाला लावत संबंधित रस्त्याचे काम सुरू केले.
शेतकरी, कामगारांचे हाल
रस्त्याच्या अर्धवट स्थितीमुळे शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांना मरणयातना सोसायची वेळ ओढवली तरी जालनारोड - हिरापूर - सुलतानपूर ते वरूड फाटा रस्ता अद्याप खड्ड्यातच आहे. या प्रकारामुळे नाराज झालेले आमदार व माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील झोपलेल्या यंत्रणेच्या विरोधात भाजपचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शेखर दांडगे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत १५ मे रोजी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. यावेळी बागडे स्वतः ग्रामस्थांसह उपोषणाच्या तंबूत बसले होते.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येणाऱ्या कामांच्या विरोधात औरंगाबाद जिल्ह्यात आंदोलनाचे पीक आले आहे. गावागावांत प्रशासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी आंदोलने थांबवावीत, अशी विनंती करताना कार्यकारी, अधिक्षक आणि मुख्य अभियंता यांच्या नाकीनऊ येत आहेत.
खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील दिरंगाईबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित करताच जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, तसेच विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी या योजनेतील अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली होती. मात्र यानंतरही यंत्रणेत सुधारणा होत नसल्याने आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरलेला नाही.
औरंगाबाद तालुक्यातील फुलंब्री मतदार संघातील प्रमुख जिल्हा मार्ग-१८ जालनारोड - हिरापूर - सुलतानपूर ते वरूड फाटा या चार कि.मी. रस्त्याच्या दर्जाउन्नतीसाठी बागडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर शासनाच्या २०१९ - २० मध्ये ग्रामीण विकास मंत्रालय व एशियन डेव्हलपमेंट बॅकेतर्फे रस्त्यासाठी दोन कोटी १२ लाख रुपये मंजूर झाले होते. या रस्त्यांसाठी ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत काम करणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते.
टेंडर अहमदनगरच्या कंत्राटदाराला
यावर अधिक्षक आणि कार्यकारी अभियंत्यांनी प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी दिल्यानंतर टेंडर प्रक्रियेतील यशस्वी झालेल्या अहमदनगरच्या किरण पागोरे या कंत्राटदाराला काम दिले. १९ मे २०२१ रोजी वर्क ऑर्डर दिल्यानंतर या रस्त्याचे भूमीपूजन स्वतः बागडे, तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मिना शेळके यांच्या हस्ते झाल्यानंतर कंत्राटदाराने रस्त्यावर मुरूम आणि गिट्टीचे ढिग आणून टाकले. टेंडरमधील सातपैकी चार मोऱ्यांचे बांधकाम केले. पण त्यानंतर वर्षभर त्याने निधीची आडकाठी दाखत काम थांबवले होते.
अधिकाऱ्यांची बोबडी वळाली
रस्त्याची अतिशय दयनीय अवस्थता आहे. त्यामुळे रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची तातडीची मागणी बागडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता पी. जी. खडेकर यांच्याकडे केली होती. आतापर्यंत अनेक तांत्रिक कारण देत या योजनेतील उप अभियंता उन्मेश लिंभारे तसेच पंकज चौधरी व कार्यकारी अभियंता पी.जी.खडेकर यांनी जिल्हाभरातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची बोळवण केली. इतरही ठिकाणाची रस्त्याची शेकडो कामे प्रलंबित ठेवली आहे. मात्र बागडे स्वतः उपोषणाच्या तंबूत बसलेले दिसताच अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. ग्रामस्थ, शेतकरी व कामगार यांच्या रागाचा उद्रेक होऊ शकतो, अशी शक्यता वाटल्याने भीतीपोटी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दुसऱ्याच दिवशी, सोमवारी सकाळीच यंत्रणा कामाला लावत रस्त्याचे काम सुरू केले.