औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेतील पाणीप्रश्न 'टेंडरनामा'ने चव्हाट्यावर आणला आहे. गेल्या खासदारकीच्या निवडणुकीत शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला असलेला औरंगाबाद जिल्हा एमआयएमच्या (AIMIM) ताब्यात गेला याची जाणीव होताच ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सरकारने पालकमंत्र्यासह प्रशासनाचे कान टोचून पाणीपट्टी निम्म्यावर आणली. दुसरीकडे ५० टक्के पाणी कपातीचा निर्णयावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल (Imtiaz Jalil)) यांनी औरंगाबादकरांना मुबलक पाणी पुरवठा न करताही आजपर्यंत वसूल केलेली कोट्यवधींची पाणी पट्टीची रक्कम व्याजासह परत करून, सध्या थकीत पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्याची मागणी केली आहे. ही वार्ता शहरभर पसरत असताना आता भाजपने पाणीपट्टी कपात ही जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप करत २३ मे रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली.
उन्हाळ्यात झोपा काढल्या...
राजकीय पक्ष काहीही म्हणत असले तरी औरंगाबादकरांच्या घरांमधील माठात ठणठणाट असल्याने पाणीप्रश्न हा केवळ निवडणुकीच्या तोंडावर करण्यात येत असलेल्या स्टंट असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात या नेत्यांनी झोपा काढल्या, आता पावसाळ्याच्या तोंडावर आक्रोश मोर्चा काढून काय फायदा, असा टोला औरंगाबादकर मारताना दिसत आहेत.
भागवत कराडांची पत्रकार परिषद
शहरातील पाणी प्रश्न आणि मोर्चाची माहिती देण्यासाठी आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ. अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, माजी महापौर बापू घडामोडे आदी उपस्थित होते. या वेळी कराड यांनी जोरदार फटकेबादी केली, पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांची फरपट होत आहे. शहरात पाण्याच्या टाक्या बांधून ठेवलेल्या आहेत पण त्यांची आयुमर्यादा संपल्याने त्या प्रमाणात जलसाठा करता येत नाही. आधी पाणी योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने थातूरमातूर काम केले असा आरोप त्यांनी केला.
अतुल सावे मंत्री असताना १६८० कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर करण्यात आली. त्याच्या केवळ एक टक्का म्हणजे १६.८० कोटी रुपये महापालिकेला भरायचे होते. पण तेवढेही पैसे महापालिकेकडे नव्हते. त्यावरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तोडगा काढला होता. पण सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने ते बदलून एक तृतीयांश पैसे भरण्याची सक्ती महापालिकेला करून तसे आयुक्तांकडून लिहून घेतले. आता राज्य सरकार केंद्राने दिलेले पैसे महापालिकेला देत आहे आणि त्यातून कंत्राटदाराकडून काम करून घेतले जात आहे, असे कराड म्हणाले. तेही काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. दुसरीकडे, शहरात पाण्यासाठी लोकांना मोर्चे काढावे लागत आहेत. आंदोलने करावी लागत आहेत. मात्र, शहर आणि राज्याचे प्रशासन त्याची दखल घ्यायला तयार नाही, असा आरोपही त्यांनी केला.
पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी २३ मे रोजी भाजपच्यावतीने 'आक्रोश हंडा मोर्चा' काढण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चाची सुरवात पैठणगेट येथून सायंकाळी चार वाजता होतील आणि तो नंतर महापालिकेवर धडकेल, असे कराड म्हणाले. नुकत्याच झालेल्या पाणीपट्टी कपातीवर बोलताना डॉ. कराड यांनी ही निवळ धूळफेक आणि फसवणूक असल्याचा आरोप केला. पाणी प्रश्न बाजूला पडावा म्हणून औरंगाबादचा भावनिक मुद्दा पुढे केला जात असून, ते भाजप खपवून घेणार नाही, असे ते म्हणाले.