औरंगाबाद (Aurangabad) : बीड बायपास (Beed Bypass) रस्त्यावरील संग्रामनगर चौकातील अंडरपासची (Sangramagar Underpass) उंची वाढवावी यासाठी सातारा - देवळाईतील रहिवाशांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांना निवेदन दिले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.
अखेर येथील रहिवाशांनी माजी आमदार व शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख, माजी महापौर किशनचंद तनवाणी यांना पुलाची उंची वाढविण्याबाबत कैफीयत मांडली. गुरूवारी ९ फेब्रुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास जागतिक बॅंक प्रकल्पातील नियोजन शून्य कारभाऱ्यांचा ते खरपूस समाचार घेणार असल्याचे एका विश्वसनीय सूत्राकडून समजते.
विरोधी पक्षनेते दौऱ्यात व्यस्त
यापुर्वी शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार तथा विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी पाहणी दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन सातारा - देवळाईकरांना दिले होते. मात्र ते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात व्यस्त असल्याने बैठक लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे.
न्यायालयात तारीख पे तारीख
दुसरीकडे सदोष उड्डाणपुलाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाकर्ता ॲड. रूपेश जैस्वाल यांनी अंडरपासची उंची कमी असल्याने वाहतुकीला अडथळा येत असल्याचे सचित्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे स्वतः जाऊन पुलाची पाहणी केली. मात्र त्यावर सुनावणीसाठी न्यायालयात तारीख पे तारीख सुरू आहे. दुसरीकडे प्रकरण न्यायालयात जाताच अधिकाऱ्यांनी नकाशे बदल्याची चर्चा आता औरंगाबादेत जोर धरू लागली आहे. तत्कालीन मुख्य अभियंता खंडू पाटील यांनी बीड बायपास हायब्रीड ॲन्यूईटी प्रकल्पाला मंजुरी दिली होती.
काय आहेत नागरिकांच्या मागण्या
पुलाची उंची मुख्य रस्त्यापासून सहा ते साडेसहा मीटर वाढवा, आमदाररोड ते बीडबायपास दरम्यान अंडरपास करा, संग्रामनगर चौकातील अंडरपासची लांबी वाढवा, पुलाखालचे रस्ते न खोदता ते रूंद करा, या प्रमुख मागण्या सातारा - देवळाईकरांच्या आहेत.
पुन्हा बीड बायपास 'राष्ट्रीय मृत्युचा महामार्ग'
बीड बायपास येथील संग्रामनगर चौकातील उड्डाणपुलाखाली अंडरपासची उंची कमीतर केलीच, शिवाय महामार्गाला ॲप्रोच असणार्या आमदाररोडचा लचका तोडून तो धडावेगळा केला. पुलाचे बांधकाम झाल्यावर वाहतुकीला अडथळा येत असल्याचे लक्षात आल्यावर अधिकाऱ्यांनी अंडरपास खड्ड्यात घालत तिथे भुयारी मार्ग असल्याचा दावा करत खोदकाम सुरू केले व पुलापर्यंत अंडरपासची उंची वाढवली जात आहे. नुकत्याच खोदकामामुळे सातारा - देवळाईकरांची कोंडी वाढली आहे.
रस्त्यावरील वाहतूक तब्बल आठ-आठ तास खोळंबली जात आहे. यात विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तेथे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पुलाची उंची वाढविणे गरजेचे असल्याचे नागरिक वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहेत. मात्र धन्नाशेटजींनी भरपेट हात ओले केले असल्याने नागरिकांच्या मागणीकडे कानाडोळा केला जात आहे. परिणामी २८६ कोटींच्या या रस्त्याची पुन्हा 'मृत्युचा राष्ट्रीय महामार्ग' ही ओळख देशभरात कायम राहणार अशी स्थिती आहे.
शहराच्या रस्त्यांची वाट लावणारा कंत्राटदार?
औरंगाबादच्या रस्त्याची वाट लावणारा कंत्राटदार जी.एन.आय इन्फ्रास्ट्रक्चर हा या कोट्यावधीच्या महामार्गाचे काम करत आहे. अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या डिझाईननुसार मी काम करत असल्याचे म्हणत तो नातेवाईकांसाठी खोदकामाचे घोडे दामटवत आहे. मात्र अंडरपास ते उड्डाणपुलापर्यंत पुलाची उंची वाढविण्याकडे कानाडोळा करत आहे. त्यासाठी गुरूवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तनवाणी अंडरपासची पाहणी करणार आहेत.
लोकप्रतिनिधी कोमात
गत दोन महिन्यापासून सदोष पुलाबाबत खल चालू आहे. सदोष उड्डाणपुलामुळे गत आठ दिवसापासून या भागातील कोंडी फुटत नाही. मात्र शिंदे गटाचे व याच पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट जराही नागरिकांच्या समंस्या जाणून घेत नाहीत, असा आरोप या भागातील नागरिक करत आहेत, मात्र अंडरपासचे काम योग्य असल्याचे म्हणत ते अधिकारी आणि कंत्राटदार आणि धन्नाशाटजींचे पाठबळ वाढवत आहेत. यामाघे कोणते अर्थकारण आहे, हा संषोधनाचा विषय आहे.
दुसरीकडे कोंडीतूनही सायरन आणि पोलिसांच्या मदतीने उड्डाणपुलावरून सुसाट धावणारे पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, केंद्रीय राज्य वित्तमंत्री डाॅ. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे , राज्यमंत्री अब्दुल सत्तार जराही सदोष उड्डाणपुलाबाबत प्रशासनाला जाब विचारायला तयार नाहीत.
भाजप आमदार प्रशांत बंब का झाले शांत?
गंगापूर विधानसभाचे आमदार प्रशांत बंब हे तर अंडरपासचा नव्हे, संपूर्ण बीड बायपासच सदोष असल्याचे म्हणत अनेक दिवसापासून माहिती काढत आहेत. पण अद्याप याकामाकडे त्यांनी ठोसपणेकाहीही केले नाही. ते कुणाच्या दबाबाला घाबरून शांत झालेत, असा सवाल येथील नागरिक करत आहेत.
आय. एस. एस. अधिकाऱ्यांची नो इन्कमिंग
वाढत्या कोंडीवर आणि माती - मुरूमाचे ढिगारे टाकुन रस्ते बंद करणार्या मुजोर प्रशासनाविरोधात इकडे सामान्य नागरिक बेंबीच्या देठापासून ओरडतोय, पण जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष आस्तिककुमार पांण्डेय, समिती सदस्य तथा मनपा आयुक्त डाॅ. अभिजित चौधरी, बीड बायपाससाठी मीच पाठपुरावा केला, असा गावभर गाजावाजा करणारे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर जराही लोकांसाठी धावताना दिसून येत नाहीत.
धक्कादायक म्हणजे चुकीचे काम लपविण्यासाठी रस्ते खोदकामासाठी निम्मा बीड बायपास बंद ठेवण्याची अधिसूचना थेट सुटीच्या दिवशी पोलिस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांनी काढली. याचाच अर्थ 'हम करे सो कायदा' या तत्वापुढे सगळ्यांनी नांग्या टाकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
दुसरीकडे कोंडीतूनही सायरन वाजवत आणि पोलिसांच्या मदतीने उड्डाणपुलावरून सुसाट धावणारे पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, केंद्रीय राज्य वित्तमंत्री डाॅ. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार जराही सदोष उड्डाणपुलाबाबत प्रशासनाला जाब विचारायला तयार नाहीत हे विशेष!