Road Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad: सावधान; औरंगाबादकरांना महापालिकेकडून खिळ्यांची शिक्षा

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद : शहरात गत दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात काॅंक्रिट आणि डांबरी रस्त्यांचे बांधकाम केले असून, त्या रस्ते बांधणार्‍या कंपन्यांकडून महापालिकेतील (AMC) कारभारी आणि आजी - माजी लोकप्रतिनिधींना द्यावी लागणारी प्रचलीत ३० ते ४० टक्के टक्केवारी वसूल करण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

शहरातील मुख्य आणि अंतर्गत वर्दळीच्या रस्त्यांवर अपघात होऊ नयेत यासाठी या रस्त्यांवर रस्ते बांधणार्‍या कंत्राटदारांकडून रबलींग स्पीड ब्रेकर मोठ्या प्रमाणात टाकले गेले होते.  दरम्यान, कंत्राटदारांनी हे स्पीड ब्रेकर टाकण्यासाठी लोखंडी खिळे ठोकून बसवण्याचा प्रकार केला असून, प्रत्यक्षात रबलिंग स्पीड ब्रेकरला एका विशिष्ट प्रकारचे गम लाऊन ते रस्त्यांवर चिपकवावे लागतात. मात्र बाजारात त्याची किंमत जास्त असल्याने कंत्राटदारांकडून चक्क खिळ्यांचा जुगाड केला जात आहे.

कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीमुळे औरंगाबादेतील रबलिंग स्पीड ब्रेकर देखील सुमार दर्जाचे टाकले जातात. परिणामी सद्य: स्थितीत हे स्पीड ब्रेकर उखडले गेले असून, त्यांचे खिळे रस्त्यांवर डोके काढत असल्याने पाहाणाऱ्यांचे हृदयाचे ठोके अचानक वाढत आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, या धोकादायक प्रकाराने महापालिका प्रशासनावर  औरंगाबादकर नाराज झाले आहेत.

औरंगाबाद शहरातील कोणत्याही रस्त्यावर गेले तरी खिळे डोके वर काढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कामाच्या सुरूवातीला गुळगुळीत रस्ते होणार, असा गवगवा करणाऱ्या महापालिकेने नंतर रस्त्यांच्या देखभाल - दुरुतीकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. गत दहा वर्षात सरकारी अनुदानातून जवळपास साडेतीनशे कोटीतून रस्त्यांचे काॅंक्रिटीकरण, डांबरीकरण केले गेले. मात्र टेंडरमधील अटी-शर्तींना कंत्राटदारांकडून दुर्लक्ष केले जाते. दोष निवारण कालावधी संपल्याचे सांगत अधिकारी ठरलेल्या बक्षिसानंतर कंत्राटदारांची सुरक्षा ठेव रक्कम सही सलामत परत करतात. 

चांगल्या रस्त्यांचा खराबा अशी ओरड झाल्यानंतर पुन्हा नव्याने टेंडर काढले जाते. पालिकेत हे महादृष्टचक्र सुरूच राहते. त्यात पूर्वी झालेल्या रस्त्यांवरील पडलेले भगदाडं आणि आरपार नाल्या शिवाय नष्ट झालेले थर्मापेस्ट पांढरे पट्टे, रेडियमचा र्‍हास झालेले किटकॅट ऑईज, झेब्रा क्राॅसिंग पट्टे, तोडफोड झालेले दुभाजक, फुटलेले दिवे आणि गंजलेले दिशादर्शक फलक अशा विद्रुपीकरणात मातीत मिसळलेल्या या रस्त्यांवर रबलींक स्पीड ब्रेकर देखील गायब झाले असून, त्यांचे खिळे अपघाताला आमंत्रण देत आहेत.

शहरातील  बहुतेक सर्व रस्त्यांवर रस्त्याच्या मधोमध हे खिळे करदात्या औरंगाबादकरांना शिक्षा देण्यासाठी ठोकण्यात आले आहेत का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. यापुढे रबलींग स्पीड ब्रेकरला खिळे ठोकण्याचे सुरू असलेले प्रकार थांबवण्याची पध्दत बंद करावी, अशी मागणी औरंगाबादकर करत आहेत.

खिळ्यांमुळे शहरांतील रस्ते धोकादायक

स्थापत्य अभियंता डाॅ. प्रांजल सरदेसाई यांनी असे प्रकार औरंगाबाद शहरातील कोणत्याही  रस्त्याच्या मधोमध दिसून येत असल्याची तक्रार केली आहे. रस्त्याच्या मधोमध असलेले खिळे अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. रबलींग स्पीड ब्रेकर रोवण्यासाठी लोखंडी खिळे ठोकून ते फीट केले जात आहेत. त्या खिळ्यांमुळे डांबरी रस्त्यांचे आयुष्य कमी होत असून तांत्रिकदृष्ट्या कंत्राटदारांकडून सुरू असलेला खिळ्याचा वापर धोकादायक असून, रस्ते बांधणार्‍या कंत्राटदार लॉबीने यासाठी शास्त्रोक्त पध्दतीचाच वापर करायला हवा. आता या धक्कादायक सचित्र खिळ्यांच्या वृत्तानंतर महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी बेजबाबदार कारभाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे टेंडरनामाचे लक्ष लागून राहिले आहे.