Aurangabad Tendernama
मराठवाडा

देखण्या उद्यानाचा औरंगाबाद पालिकेने केला उकिरडा; 17 लाख पाण्यात

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहरातील वार्ड क्रमांक २४ एन - १ सिडको ए - सेक्टर येथील ग्रीन बेल्टमधील उद्यानाची दुरावस्था झालेली आहे. जाॅगिंग ट्रॅक व बॅच रानटी झाडाझुडपात गडप झालेले आहेत. ओपन जीम साहित्याची देखभाल होत नसल्याने त्यातून येणाऱ्या आवाजाचा त्रास होत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर 'टेंडरनामा' प्रतिनिधीने प्रत्यक्ष उद्यानाची पाहणी केली. त्यानंतर मनपाचे उद्यान निरीक्षक संतोष नरवडे यांना थेट संपर्क करत कल्पना दिली. त्यावर दोन दिवसांत उद्यानाची साफसफाई करण्यात येईल , अशी ग्वाही त्यांनी दिली.

सिडको एन - १ येथील प्रोझोन माॅलच्या काही अंतरावर चिकलठाणा एमआयडीसी समोर असलेल्या ग्रीन बेल्टचा उकिरडा झाला होता. तेथील अस्वच्छता दूर व्हावी यासाठी या भागाचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती राजू शिंदे यांनी सातत्याने मनपात पाठपुरावा करून येथील उकिरड्याच्या जागी तेथे उद्यान फुलवले आहे. मनपा निधीतून १७ लाख रुपये मंजूर करून जागेचे सपाटीकरण केले. अनेक झाडांना ओटे बांधत जुन्या झाडांचे जीव वाचवले. परिसरातील रहिवाशांना शतपावली करता यावी यासाठी जाॅगिंग ट्रॅक उभारला. जेष्ठांना बसण्यासाठी बाकड्यांची सोय केली आणि या पडीक जागेचा कायापालट केला.

तत्कालीन मनपा आयुक्त डाॅ. हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते २६ नोव्हेंबर २०१३ रोजी या देखण्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला होता. एपीआय क्वार्नर ते कलाग्राम रस्त्याच्या बाजूला असलेल्या या जागेचा वापर होत नसल्याने त्याचा उकिरडा झाला होता. त्यामुळे येथे कचरा आणि अस्वच्छता मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे या जागेकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हते. शिंदे यांच्या प्रयत्नाने या जागेच्या कायापालट झाला.

या ग्रीनबेल्टमधील जागेत पडक्या झाडांच्या संवर्धनासाठी झाडांच्या चारही बाजुने गोलाकार ओटे बांधून झाडांना संजीवनी देण्यात आली. ओट्यांची रंगरंगोटी करून मोकळ्या जागेत हिरवळ फुलविण्यात आली. येथील ओट्यांच्या आकर्षक रंगरंगोटीमुळे व जाॅगिंग ट्रॅकमुळे तसेच बॅचेसमुळे आसपासच्या रहिवाशांची चांगली सोय झाली. येथे 'कचरा टाकू नये', 'स्वच्छ औरंगाबाद, हरित औरंगाबाद' असे संदेश लिहिण्यात आले होते. सुशोभीकरणासाठी नवी रोपे लावण्यात आली होती. सायंकाळी उद्यानात फिरता यावे यासाठी दिवे लावण्यात आले होते. बसण्यासाठी आणि पाय मोकळे करण्यासाठी जागा ठेवण्यात आल्याने मोठ्या कल्पकतेने या जागेचा कायापालट केल्याने शिंदे यांचे सर्वत्र कौतूक देखील करण्यात आले होते. 

मनपा कारभाऱ्यांना कर्तव्याचा विसर

मनपा फंडातून कायापालट झालेल्या या जागेतील जीम साहित्य आणि खेळणी तुटलेली आहेत. ती नियमित दुरूस्त केली जात नाही. बागेत झाडांचा पालापाचोळाही नियमित उचलला जात नाही. पालापाचोळ्यात पाणी साठून डास होत आहेत. परिणामी बागेत येणाऱ्या आबालवृध्दांच्या आरोग्यास यामुळे धोका होऊ शकतो. झाडांच्या वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्याही नियमित छाटल्या नाहीत. शिवाय जेष्ठांना बसण्यासाठी ठेवलेली बाकडे देखील झाडाझुडपात अडकल्याने उद्यान प्रेमींची गैरसोय होत आहे. बकाल झालेल्या उद्यानात नागरिकांनी देखील पाठ फिरवली आहे. पथदिवे देखील नादुरूस्त झाले आहेत. बकाल झालेल्या उद्यानात दुपारच्या वेळी उनाडांची शाळा भरत असल्याने आसपासच्या रहिवाशांच्या त्रासात भर पडली आहे.