औरंगाबाद (Aurangabad) : एपीआय कॉर्नर ते प्रोझोन माॅल रस्ता अक्षरशः अति धोकादायक झाला असून, अनेक वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आजपर्यंत अनेक प्रवाशांनी या रस्त्यावर जीव गमावला त्याला जबाबदार कोण? सद्यस्थितीत सहा कोटी रूपये खर्च करून एमआयडीसीने लक्ष्मी कन्स्ट्रक्शन, जळगाव आणि पुण्याच्या आर. जे. बिडकाॅन प्रा. ली. मार्फत काँक्रिटीकरण केले गेले. मात्र दहा दिवसांपूर्वी एमआयडीसीनेच जलवाहिनी दुरुस्तीसाठी वाहतूक बेट विद्रूप केले. दुसरीकडे एपीय कॉर्नर लगत नंदीग्राम सोसायटीच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या फुटपाथवर आता भारत बाजार येथील गॅरेज चालकांनी दुरूस्ती केंद्र सुरू केल्याने जड वाहनांमुळे अंडरग्राऊंड नाल्यावरील अनेक चेंबर फोडून टाकले. मग त्याची दुरूस्ती कोण करणार? असा सवाल 'टेंडरनामा'च्या पाहणीत समोर आला आहे.
या रस्त्यावर केवळ प्रोझोन माॅलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचीच वाहतुक चालत नाही तर चिकलठाणा औद्योगिक वसाहतीकडे आणि रस्त्याला खेटुनच असलेल्या स्माॅल स्केल इंडस्ट्रीज कडे जाणाऱ्या व आसपासची स्थानिक वाहतूक, सरकारी वाहतूक, प्रवासी अशी फार मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. वास्तविक सदर रस्ता हा काही वर्षासाठी प्रोझोन माॅलकडे देखभाल दुरूस्तीसाठी देण्यात आला होता. या बदल्यात त्थांना मालमत्ता करात काही प्रमाणात सुट देण्यात आली होती. मात्र, महापालिकेबरोबर करार संपल्याने गेल्या वर्षभरापूर्वी या रस्त्याचे रूंदीकरण करून काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यामुळे सुरळीत वाहतूकीसाठी रस्ता उपयोगी पडेल असे वाटले होते. पण पादचाऱ्यांसाठी केलेल्या फूटपाथवर आणि निम्म्या रस्त्यावर दुचाकी चारचाकींनी कब्जा केल्याने रस्ता असून अडचण नसुन खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
एमआयडीसीने केले वाहतूक बेट विद्रूप
दहा दिवसापूर्वी एपीआय कॉर्नरलगत वाहतूक बेटाखाली दडलेली जलवाहिनी दुरूस्तीसाठी एमआयडीसीने खोदकाम केले. दुरूस्तीनंतरही वाहतूकबेट तसेच ठेवत या नव्याकोऱ्या रस्त्याचा चेहरा विद्रूप केला गेला.
फुटपाथवरील चेंबरची फोडाफोडी
'टेंडरनामा' वृत्तमालिकेनंतर भारत बाजार समोरील रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या वाहनांची दुरूस्ती थांबली. पण या ठिकाणी लागणारी वाहने आता मेरिडियन कोर्टच्या बाजुला पादचाऱ्यांसाठी नाल्यावर स्लॅब टाकून तयार केलेल्या फूटपाथवर लागतात. वाहनांच्या वजनाने फुटपाथवरील चेंबर फुटल्याने भल्या पहाटे माॅर्निंग वाॅक करणाऱ्या नागरिक तसेच औद्योगिक वसाहतीतील कामगारांना धोका निर्माण झाला आहे. आता या सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान महापालिकेने कुणाकडुन वसूल करायचे आणि या फूटपाथ आणि वाहतूक बेटाची दुरूस्ती कोणी करायची असा सवाल उठत आहे.
वर्षभरापुर्वी सदर रस्ता हा चारपदरी करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजुला फुटपाथ आणि भुमिगत स्ट्राॅम वाॅटर योजना देखील राबवण्यात आली. मात्र सदर फूटपाथ आणि थेट रस्त्यावर भारत बाजार, मेरिडियन्स लाॅन, प्रोझोन माॅल तसेच स्माॅल स्केल इंडस्ट्रीज समोर चारचाकी आणि दूचाकींनी कहर केल्याने पादचारी आणि वाहनधारकांना या मार्गावरून जातांना जीव मुठीत घालुनच प्रवास करावा लागत आहे. एकूण या रस्त्यावरील वर्दळ पाहता या रस्त्याच्या कडेला आणि फूटपाथवर एकही वाहनांचा अडथळा नकोय.
'टेंडरनामा'चा पोलिस आयुक्तांना सवाल
या रस्त्याच्या बाजूला प्रोझोन आणि भारत बाजार समोर नो पार्किंगचे फलक असताना पोलिसांकडुन दुर्लक्ष का? असा सवाल 'टेंडरनामा'ने पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांना उपस्थित केला होता. त्यावर त्यांच्या आदेशाने एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे आणि सिडको वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी भारत बाजार समोर धडाकेबाज कारवाई करत रस्ता मोकळा केला. पण आता येथील वाहनांची दुरूस्ती मेरिडियन कोर्टच्या बाजुला असलेल्या काही खुल्या भुखंडांच्या संरक्षण भिंतीला लागुन असलेल्या फुटपाथवर होत असल्याने पादचार्यांनी पाऊल ठेवावे कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे. हिच स्थिती स्माॅल स्केल इंडस्ट्रीज आणि प्रोझोन माॅल समोर कायम आहे.
दुरूस्तीकडे कानाडोळा
दरम्यान वाहनांमुळे जे ढापे तूटलेत त्याच्या दुरूस्तीचे काम देखील एमआयडीसीकडून होत नाहीए. अशा पध्दतीने दुर्लक्ष राहिले तर सार्वजनीक मालमत्तेच्या या नुकसानीला जबाबदार कोण?
जबाबदारांचे दुर्लक्ष का ?
या रस्त्यावरुन पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांची ये-जा सुरू असते. सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागलेल्या वाहनांनी रस्ताच दिसेनासा होतो. ओव्हरलोड वाहनांनी नाल्यावरील फूटपाथ कधी खाली जाऊन मोठा अपघात होईल सांगता येत नाही. .मग ही ओव्हरलोड वाहने कोणाच्या आशिर्वादाने उभी केली जातात ? संबंधित यंत्रणा का कानाडोळा करत आहेत. सर्वच संबंधित यंत्रनेचे प्रचंड दुर्लक्ष व अनास्था आढळून येत आहे. फूटपाथची दुरूस्ती लक्ष्मी कंन्सट्रक्शन कंपनी व बिडकाॅन कंपनीकडे आहे. मग एमआयडीसी त्यांच्थाकडुन दुरूस्ती का नाही करीत? हे सर्व सुसंवाद नसल्याने घडत आहे. व जीव मात्र स्थानिकांचे जात आहेत. त्रास आणि मनस्ताप फक्त स्थानिकांना होत आहे.