aurangabad

 

Tendernama

मराठवाडा

औरंगाबादेतील कोट्यवधींचे सायकल ट्रॅक नेमके कुणासाठी?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन दरम्यान महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपये खर्च करून बनविण्यात आलेले सायकल ट्रॅकवरून इतर वाहने धावत असल्याचे चित्र आहे. तसेच या मार्गावर अतिक्रमणेही झाली असून, यामुळे हा सायकल ट्रॅकचा मार्ग नेमका कुणासाठी, केवळ ठेकेदाराची तुंबडी भरण्यासाठी की चढ्या दराने खरेदी केलेले बोलार्ड्सचा पुरवठा खपवण्यासाठी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सायकलस्वारांचा प्रवास सुरक्षित व्हावा, सायकल वापराला प्रोत्साहन मिळावे आणि इंधनाची बचत व्हावी, हा या प्रकल्पामागील उद्देश होता; परंतु प्रत्यक्षात या मार्गावर सायकलस्वारांना जागोजागी विविध अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन हा रस्ता रुंद आहे म्हणून सायकल मार्ग तयार करण्यात आला आहे. परंतु यामुळे निम्मा रस्ताच बेपत्ता झाला आहे, तसेच काही रस्ताच वाहनांनी जाम झालाय. त्यामुळे या ट्रॅकने या मार्गावर अपघाताचे सावट पसरलेले आहे. विशेषतः अद्यापपर्यंत एकही सायकलस्वार या मार्गाचा वापर करताना दिसत नाहीत. ते रस्त्याच्या कडेने जीव मुठीत धरून मार्गक्रमण करीत असतात. दोन ते अडीच मीटर रुंद असलेल्या या ‘ट्रॅक’चा वापर पार्किंगसाठी आणि अनधिकृत पथारीवालीवाल्यांसाठी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. हा मार्ग पार्किंग, राडारोडा व कचऱ्यांने व्यापलेला दिसत आहे.

अतिक्रमणांचा विळखा

नागरिकांकडून जास्तीत जास्त सायकलचा वापर व्हावा, यासाठी महापालिकेने हा प्रकल्प राबविला; परंतु त्याकडे प्रशासनाचे सध्या दुर्लक्ष होत आहे. शहरातील इतर सायकल मार्गावरील अतिक्रमणे झाली आहेत. हा मार्ग वापरण्यास प्रोत्साहन देणे व जनजागृती होणे आवश्‍यक आहे.

लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष

मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहे. सायकल मार्गावरील अतिक्रमणांवर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे. सायकल ट्रॅकचा वापर हा तर येथील वाहन पार्किंग, फळविक्रेते आणि पथारी व्यावसायिकांसाठीच होताना दिसत आहे, त्यामुळे सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरूनच जावे लागते.

महापालिका प्रशासक, पुरवठाधारकावर गुन्हा दाखल करावा

सायकल ट्रॅकसाठी आवश्यक असणाऱ्या बोलार्डची अव्वा का सव्वा किमतीने खरेदी करून जनतेच्या कोट्यावधी रूपयावर डल्ला मारलेला आहे. स्मार्ट सिटीतील सायकल ट्रॅकच नव्हेतर सर्वच कामांचे ऑडीट होणे गरजेचे आहे. बोलार्ड्स खरेदी घोटाळा प्रकरणी संबंधित पुरवठाधारक व महापालिका प्रशासकांची पोलिसांमार्फत चौकशी करून जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करावी यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.

- अनिरुद्ध गायकवाड, तक्रारदार