Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad: या प्रकल्पाने 10 वर्षांपासून पर्यटकांना का घातली भुरळ?

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : ज्या जागेवर उकिरडा होता आणि जी जागा ‘डंपिंग ग्राउंड’साठीच आणि लघुशंकेसाठीच वापरली जात होती, त्या जागेवर एका महिला उद्योजकाने स्वखर्चाने स्वच्छ-सुंदर मोठी बाग तयार केली आहे. येथे विविध प्रकारच्या १५० झाडांसह बाग फुलवली असून, त्या आनंदात भर घालणारा उंच पाण्याचा धबधबा, काँक्रिटचेच पण लाकडी लुक देणारे बॅच, जाॅगिंग ट्रॅक, छोटे माठ आणि मोठ्या रांजणांवर केलेली नक्षीदार पेंटींग या बागेची शोभा वाढवत आहेत. हीच जागा आता सोसायटीतील नागरिकांसाठी सुंदर विरंगुळा ठरत आहे. याच बागेत आता आसपासचे शाळा-महाविद्यालयाचे पोरं अभ्यासाला येतात. विविध प्रजातीचे पक्षी झाडाझुडपात घरटी तयार करून पिलांना जन्म देतात. घरातल्या लहान लेकराची जशी काळजी घेतली जाते, तशी काळजी या बागेची या महिला उद्योजक घेतात. त्यामुळे गेल्या दहावर्षांपासून दुष्काळातही ही बाग हिरवीगार आहे. औरंगाबादकरांसह पर्यटकांचे मन वळवणाऱ्या या प्रकल्पाचे नाव आहे मनोहर वाटीका. दहा वर्षांपूर्वी तब्बल १५ लाख रूपये खर्च करून हा हिरवागार प्रकल्प ज्यांनी उभा केला आहे, त्या महिला उद्योजकाचे नाव आहे. राजेश्वरी लक्ष्मीकांत कापसीकर. शहानुरवाडीतील विनायक आदर्श हाउसिंग सोसायटीतील तब्बल तीन हजार स्केअरफुट जागेवर त्यांनी हा प्रकल्प उभारला आहे.

महापालिकेकडून निराशा

सोसायटीच्या मोकळ्या जागेत आणि एखादी तरी बाग करून द्यावी, अशी वारंवार केलेली मागणी निधी नसल्याचे कारण पुढे करत महापालिकेकडून पूर्ण न झाल्याने शेवटी राजेश्वरी कापसीकर यांनी स्वतः स्वखर्चाने पुढाकार घेऊन बागेचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला. त्यानुसार बाग विकसित करण्याचा निर्धार केला.

१५ लाखात पूर्ण केला प्रकल्प

प्रकल्प विकसित करण्याच्या हेतुने त्यांनी दहावर्षापूर्वी तब्बल १५ लाख रूपये लावले.पूर्वी वर्षानूवर्ष या परिसराचा वापर कचरा टाकण्यासाठी होत होता. त्यामुळे जिथे-तिथे घाण-कचरा-दुर्गंधी याशिवाय काहीही दिसत नव्हते.त्यात फिरते व्यावसायिक व पादचारी लघुशंका करत होते. त्यामुळे सोसायटीतील महिलांची देखील कुचंबना होत असे. त्यासाठी मोकळ्या जागेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला, लेव्हलिंग करण्यात आले त्यातील मलःजलवाहिन्या शिफ्ट करण्यात आल्या. चेंबर वरती घेण्यात आले. आजूबाजूचा परिसरही स्वच्छ करण्यात आला.

अशी फुलवली बाग

गोकर्ण ,सुपारी,बाभुळ,कर्दळी,बोगनवेल,अलोवेरा, वाॅटर लिली, कडीपत्ता, करंज, हळद, स्नेकप्ल॔ट, जांभुळ, जास्वंद, मोगरा, कदंब, सोनचाफा, पारिजातक, देशीगुलाब, ऑफीस टाईम, दुपारती, पेरू, कॅक्टस, उंबर, केळी, आळु, केवडा , पपई, निशिगंधा, गुलबाक्षी, डाळिंब, खजुर, कन्हेर, एक्झोरा, तुळशी, बिंग्नोनिया, सिताफळ, कडुलिंब, आंबा, नारळ, अशोक, बदाम, केळी, गुलाब, जास्वंद, मोगरा अशी फळा-फुलांची तब्बल १५० हून अधिक झाडे लावण्यात आली.विशेष म्हणजे झाडांच्या पालापाचोळ्यातून सेंद्रीय खत तयार करून वृक्षसंवर्धन व जतन केली जातात.

पहाडी धबधबा

संपूर्ण परिसराला आकर्षक संरक्षण भिंत बांधण्यात आली. आतमध्ये एका कोपर्यात १५ हजार लिटरचा भुमिगत पाण्याचा हौद तयार बांधण्यात आला. पाणबुडीपंपाद्वारे पाण्याची रिसायकलींग होईल , अशी व्यवस्था करण्यात आली आणि पहाडातून पाणी वाहत असल्याचा लुक निर्माण करणारा उंच धबधबा तयार करण्यात आला. आजुबाजुने फिरण्यासाठी मोकळी जागा सोडण्यात आली. त्यात लाकडी लुक देणारा भव्य जाॅगिंग ट्रॅक बांधण्यात आला. बागेमध्ये बसण्याबरोबरच  जॉगिंग ट्रॅकसारखा वापर केला जात आहे.

औरंगाबादेत एकमेव प्रकल्प

एवढेच नव्हे तर बागेतील झाडाफुलांवर बसणाऱ्या पक्षांसाठी अन्नपाण्याची उत्तम सोय करण्यात आली. बागेतील संरक्षणभिंतीच्या कडेलाही वड , पिंपळ, औदुंबराची झाडे लावुन जैवविविधता जोपासण्यात आली. झाडांचे संरक्षण करण्यासाठी व बागेची दैनंदिन निगा राखण्यासाठी दरमहा त्या सात ते आठ हजार रूपये खर्च करत आहेत. यासाठी खास कर्मचार्याची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळी फिरण्यासाठी, अभ्यासासाठी  अनेक महिला-पुरुष कर्मचारी व मुलांची गर्दी उडते, तर औरंगाबादेत खाजगी खर्चातून सार्वजनिक असा सुंदर प्रकल्प कुठेही नसल्याने पर्यटक देखील ही बाग न्याहाळण्यासाठी येतात. मुलांची व युवकांची मने देखील मनोहर वाटीकेकडे वळली आहेत.  प्रत्येक झाडाची ओळख व्हावी, नव्या पिढीला झाडाचे प्रकार कळावेत यासाठी नावासह फलक लावण्यात आले आहेत.  बागेत आकर्षक विद्युतरोषणाईव विद्युत दिवेही लावण्यात आले आहेत.