Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad:'या' खराब रस्त्यांचा पंचनामा करा;दोषींवर कारवाईची मागणी

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे औरंगाबादेतील एसएससी बोर्ड स्टेशनरोड ते चुन्नीलाल पेट्रोलपंप, जुन्या व नव्या शहरासह सातारा, देवळाई, चिकलठाणा, चिकलठाणा औद्योगिक वसाहत, नारेगाव, हर्सुल, ज्योतीनगर, उल्कानगरी, दशमेशनगर, टिळकनगर, जवाहर काॅलनी, सिडको एन-सावरकरनगर, मिलननगर, श्रीनगर, गुलमोहर काॅलनी, जाधववाडी, शहानगर, मसनतपुर, ब्रीजवाडी, पडेगाव, मिटमिटा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, भीमनगर, भावसिंगपुरा, पेठेनगर,  सिडको एन-१ स्माॅल स्केल इंडस्ट्रीज, सिडको-हडको, गारखेडा, मुकुंदवाडी, शहानुरवाडी येथील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, वाहनधारकांना वाहने चालविताना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे.

प्रशासकांना आवाहन

या खराब रस्त्यांचा पंचनामा करा आणि  रस्त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या संबंधित प्रभाग अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांवर गुन्हे दाखल करा अशा संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त होऊ लागल्या आहेत. तसेच खराब रस्त्यांवर स्वतः महापालिका प्रशासकांनी येऊन वाहनधारकांना रस्ते शोधून द्यावेत, अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.

औरंगाबादेतील बहुतांश भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यात गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळनंतर हजेरी लावणाऱ्या अवकाळी पावसामुळे अनेक रस्त्यांवर डाबके साचलेले आहे. वाहनधारकांना वाहने चालविताना खड्ड्यातून रस्ते शोधावे लागत आहेत. या रस्त्यांच्या दुरूस्तीकडे महापालिकेने गेली कित्येक वर्ष दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. खराब रस्त्यांचे पंचनामे करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा महापालिका प्रशासकांनी स्वतः येऊन रस्ते शोधून द्यावेत अशा संतप्त भावना नागरिकातून उमटत आहेत. शहराच्या प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना नीट वाहने चालविता येत नाहीत. त्यात अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय वाहन दुरुस्तीसाठी आणि दवाखान्यात होणारा खर्च परवडेनासाही झाला आहे.

अनेकांना कंबरदुखी व मणक्याचे आजार जडले आहेत. नेहेमी येतो पावसाळा त्यात या रस्त्यांवरची माती देखील पावसात वाहून जाते. या रस्त्यांवरून साधी बैलगाडी नव्हेच, तर पायी सुद्धा चालता येत नाही. खड्डेमय रस्त्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. शहरातील अनेक रस्ते, चौकांमध्ये मोठे खड्डे पडले आहेत. त्यात अवकाळी पाणी साचून ते आणखी मोठे होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे या खड्ड्यांमध्ये वाहन गेल्यानंतर त्याची खोली वाहनधारकाला कळते. त्यामुळे अनेकदा वाहनधारकांचा तोल जाऊन पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील या रस्त्यांचे डांबरीकरण तीस ते चाळीस वर्षांपूर्वी केलेले आहे. त्यावरील डांबर कधीच निघून गेले आहे. त्यामुळे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.