औरंगाबाद (Aurangabad) : जगप्रसिद्ध टाउनहाॅलकडून, मकई गेट, बीबी का मकबरा, तसेच सोनेहीमहल, औरंगाबाद लेणी या ऐतिहासिक वारसास्थळांसह विद्यापीठ व घाटीकडे जाणाऱ्या या रस्त्याचे काम गेल्या अकरा वर्षांपासून रखडले होते. याबाबत 'टेंडरनामा'ने वृत्त प्रकाशित करताच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या रस्त्याचा समावेश केला. ८० फुट रूंद आणि सहाशे मीटर लांबी असलेल्या या रस्त्यासाठी अडीच कोटी रूपये देखील मंजूर केले.
मात्र, रस्त्याचे काम सुरू झाल्यावर मनपा व स्मार्ट सिटीतील कारभाऱ्यांना रस्त्यात ड्रेनेजलाईन व नवी पाईपलाईन तसेच जुन्या पाईपलाईन टाकण्याची व रस्त्याच्या मधोमध एक खांब हटवण्याची बुद्धी सुचली. एकीकडे कंत्राटदाराने अनेक महिने रखडलेले हे काम कामाची मुदत संपल्यावर कसेबसे सुरू केले, पण कारभाऱ्यांना त्यानंतर उशिरा शहानपण सुचल्याने रखडलेल्या याकामामुळे गेल्या महिन्यांपासून औरंगाबादकरांसह देशी-विदेशी पर्यटक आणि विद्यापीठाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अंगठेफोड सोसावी लागत आहे.
२०११ मध्ये तत्कालीन मनपा आयुक्त डाॅ. पुरूषोत्तम भापकर यांच्या काळात रस्ता रुंदीकरण मोहिमेत या रस्त्याचा समावेश करण्यात आला होता. मनपाने टाउनहाॅल ते मकई गेट ते विद्यापीठ गेट रस्त्यालगतची शेकडो अतिक्रमण पाडून रस्ता ८० फुट रुंद केला. त्यानंतर रस्ता दुरूस्तीचे टेंडर काढून तब्बल १२ कोटी ४५ लाखात औरंगाबाद एकात्मिक रस्ते विकास योजनेच्या माध्यमातून मिल क्वार्नर ते बारापुल्ला गेट लिटल फ्लॉवर हायस्कूल ते विद्यापीठ, मकई गेट ते टाऊन हॉल या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मनपाने केले होते. याकामासाठी खाजा आमीन यांच्या मस्कट कन्सट्रक्शन कंपनीची नियुक्ती केली होती.
दोष निवारण कालावधीकडे पाठ
मात्र, यानंतर दोष निवारण कालावधीत देखील कंत्राटदाराने रस्ता दुरूस्तीची तसदी घेतली नाही. असे असताना मनपातील कारभाऱ्यांनी मात्र सुरक्षा ठेव 'सोय' करून परत केल्याची येथील नागरिक चर्चा करतात. त्यात मस्कटने अत्यंत निकृष्टपणे काम केल्याने अकरावर्षापूर्वी केलेल्या या रस्त्याच्या दोन वर्षातच ठिकऱ्या उडाल्या.
साडेसहा कोटीतून रस्ता वगळला
त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रयत्नाने सरकारी निधीतून मंजूर झालेल्या साडेसहा कोटीतून मिलक्वार्नर ते बारापुल्ला ते विद्यापीठ गेटपर्यंत रस्त्याचे नशीब उजळले. यात अनेक वर्षापासून रखडलेले बारापूल्ला गेटचे देखील रूंदीकरण झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला. मात्र याच रस्त्याला जोडणारा मकई गेट ते टाउन हाॅल रस्त्याचे भिजत घोंगडे कायम राहीले.
'टेंडरनामा'चा प्रहार, औरंगाबादकरांचा पाठपुरावा G 20 चे पाहूणे पावले
गेल्या नऊ वर्षापासून अर्थात २०१४-१५ पासून रखडलेल्या या रस्त्याची बीकट अवस्था पाहूण जगप्रसिद्ध वारसास्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांनी सातत्याने केलेली टिका, औरंगाबादकरांच्या वाढत्या तक्रारी आणि त्यात 'टेंडरनामा'चा प्रहार या सगळ्या बाबींचा विचार करून तत्कालीन मनपा प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तीककुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या रस्त्याचे काम हाती घेतले. कंत्राटदार ए. जी. कन्सट्रक्शन कंपनीचे असलम राजस्थानी याच्याकडेच प्रकल्पातील अनेक रस्ते असल्याने या महत्त्वाच्या रस्त्याचे काम रखडले होते. मात्र G-20 परिषदेनिमित्त विदेशी शिष्टमंडळ शहरातील पर्यटन स्थळांना भेटी देणार असल्याने टाउन हाॅल ते मकई गेट या रस्त्याचे काम मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
कंत्राटदार एक, रस्ते अनेक
ए. जी. कन्सट्रक्शन कंपनीकडून गेल्या महिन्याभरापूर्वी काँक्रिटीकरणासाठी पहिल्या टप्प्यात टाउन हाॅल ते घाटी क्वार्टरपर्यंत संपूर्ण रस्ता खोदून त्यावर मुरूम आणि खडीचे ढिग पसरण्यात आले. त्यानंतर कारभाऱ्यांना जलवाहिन्या आणि ड्रेनेजलाईन टाकण्याचे उशिरा शहाणपण सुचले. परिणामी कंत्राटदाराने कामाची गती मंदावली. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यापीठ गेट ते जयसिंगपुरा, मकई गेट, टाउनहाॅल हा रस्ता ऐतिहासिक बीबी का मकबर्याकडे जातो. जगभरातील पर्यटक आणि विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी दररोज या रस्त्याने ये-जा करतात. मात्र, रस्त्याचे काम रखडल्याने त्यांची गैरसोय होत आहे. या संदर्भात येथील असंख्य नागरिकांच्या तक्रारी आल्या. प्रतिनिधीने धाव घेत रस्त्याचे छायाचित्र कॅमेऱ्याद कैद करताच वाहनचालकांनी सुरात सुर एकत्रित करत झोपलेल्या मनपा प्रशासनाला जागे करा पत्रकार साहेब, विदेशी पाहूणे येईपर्यंत रस्त्याचे काम कंत्राटदार पूर्ण करणार काय? त्यांना अशा रस्त्यातून नेत रस्त्याची शोभा घालवणार काय? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करत खड्डे आणि खडीतून वाट काढली.
नागरिक मारतात पाणी
विशेष म्हणजे शनिवारी १४ जानेवारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठाकडे जाणारा छावनी रस्त्याकडून वाहतूक बंद केल्याने टाउन हाॅलकडून विद्यापीठाकडे हा एकच रस्ता खुला ठेवण्यात आला होता. त्यामुळे वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्यावर धुळीचे लोट पसरले होते. मनपा आणि स्मार्ट सिटीतील कारभाऱ्यांना माहित असताना त्यांनी कंत्राटदाराला रस्त्यावर धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी पाणी मारण्याच्या किंवा रस्त्यावर दबाई करण्याच्या सूचना केल्या नाहीत. शेवटी या रस्त्याशेजारी राहणाऱ्या सुजान नागरिकांना वाहनधारकांची दया आली आणि त्यांनी अखेर रस्त्यावर पाणी मारणे सुरू करत वाहनधारकांना दिलासा दिला.