Aurangabad

 

Tendernama

मराठवाडा

औरंगाबाद 'कर'दात्यांवर दिवसा धूळफेक

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : शहरात धुळीमुळे रस्ते माखलेले आहेत, सर्वत्र धुळीचे लोट वाहत आहेत, त्यामुळे औरंगाबादची ओळख धुळीचे शहर म्हणून होत आहे. तर, दुसरीकडे महापालिका दिवसा स्विपिंग मशीनने रस्त्याची झाडलोट करत आहे. त्याचा फायदा तर काही होत नाही याऊलट औरंगाबाद 'कर' दात्यांवर धूळफेक करण्याचे काम करून त्यात भर घालत आहे. त्याचा परिणाम औरंगाबादकरांच्या आरोग्यावर होत आहे. दुसरीकडे मात्र औरंगाबाद महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या दालनात लाखो रूपये खर्च करून शुध्द हवेचे यंत्र बसवण्याचा उद्योग केला गेला आहे.

एक कोटीचा खर्च

गेल्या काही वर्षांच्यानंतर शहरातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. रस्तेदेखील गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे हे रस्ते धूळ विरहित असावेत त्यामुळे लहान आकाराच्या स्विपींग मशीन खरेदी करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ९८ लाख ८५ हजार रुपये खर्च करण्यात आले. यात एका मशीनची किंमत ३२ लाख ७५ हजार रुपये इतकी आहे.

दिवसा धूळफेक; वाहतूकीला अडथळा

खरेदी केलेल्या तिन्हीही मशीनद्वारे प्रामुख्याने रात्रीच्या वेळी रस्ते स्वच्छ करणे अपेक्षित असताना, भर दिवसा हे काम केले जात आहे. आधीच शहरात धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यात महापालिकेच्या नियोजन शुन्य कारभारामुळे औरंगाबाद 'कर' दात्यांवर दिवसा धुळफेक करत आहे.

दिवसा झाडलोटचा दिखावा कशासाठी ?

दिवसा रस्ते स्वच्छ करण्याच्या कामाचा दिखावा महापालिका करते की काय असा प्रश्न औरंगाबादकर उपस्थित करत आहेत. कोरोना सारख्या जागतिक विषाणूजन्य आजाराची साखळी अद्याप नष्ट न तूटल्याने आधीच औरंगाबादकर भयभीत आहेत. त्यात भर घालण्याचे काम महापालिका करत आहे.

सतरा लाख औरंगाबादकरांचे आरोग्य धोक्यात

एकीकडे कोरोनाचे भुत मानगुटीवर बसले असताना दुसरीकडे धुळीमुळे होत असलेल्या त्रासामुळे औरंगाबादकरांच्या आरोग्याचा प्रश्न वाढला आहे. सरकारी आणि खाजगी दवाखान्यात रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. धूळ श्वासावाटे शरीरात जाते. धुलीकरण श्वसनात जमा होतात. अँलर्जीचा त्रास होणार्‍यांना सर्दी, खोकला, कफ होणे, धाप लागणे असे त्रास होतात, तर सर्वसामान्यांना सर्दी, खोकला आणि घशात दुखणे, असे त्रास होत आहेत. या धुलीकरणाचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे श्वसनाची क्षमता कमी होत आहे. प्रचंड धुळीमुळे श्वसनाचे विकार वाढीस लागले आहेत. हवेतील धुळीचे प्रमाण सरासरीपेक्षा वाढल्याने सर्दी खोकल्यापासून दम्यापर्यंत अनेक तक्रारी वाढल्या आहेत.

फायदा शुन्य; तोटा अधीक

आधीच शहरातील खड्डेमय रस्ते, त्यात होणारे रस्ते, इमारतींचे बांधकाम आणि जुन्या वास्तु पाडणे.त्यामुळे प्रचंड प्रमाणात वातावरणात धूळ मिसळत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने शहरातील खड्डेमय रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारणे गरजेचे आहे. मात्र याची काळजी न घेता महापालिकेचा घनकचरा विभाग दिवसा रस्ते झाडत ' कर' दात्यांवर दिवसा धूळफेक करत आहे.याचा कुठलाही फायदा नागरिकांना होत तर नाही याऊलट धुळीमुळे श्वसनाचे आजार आणि दम्यासारखे कायमस्वरूपी गंभीर आजाराचा सामना औरंगाबादकरांना करावा लागत आहे. विशेषतः धुळीच्या आजाराने अनेक लोक दूरगामी गंभीर परिणामसुद्धा भोगत आहेत. उपचारासाठी पदरमोड करावी लागत आहे.

प्रशासक की दुशासक

एकीकडे शहभरातील रस्ते धुळीने माखलेले आहेत. दुसरीकडे कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरलेली आहे. असे असतापा औरंगाबादकरांवर दिवसा धूळफेक करणार्या महापालिकेने अधिकारी कक्षात हवा शुद्ध करण्यासाठी आयन डोम नावाचे तीनशे मशीन खरेदी केले आहेत. यासाठी धूळीने माखलेल्या औरंगाबाद करांच्या खिशातून २५ लाखाला चुना लावला आहे.यावरून औरंगाबादचे प्रशासक दुशासक असल्याची भावना निर्माण होत आहे.