औरंगाबाद (Aurangabad) : पाऊस सुरू झाल्यानंतर तर सोडाच मॉन्सूमपूर्व पावसातच महापालिकेतील नालेसफाईत नेहमीप्रमाणे बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईचे भोग शहरातील नाल्याकाठच्या जनतेला भोगावे लागणार आहेत. गेल्या आठवड्यात महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ८० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. यानंतर टेंडरनामा प्रतिनिधीने सलग चार दिवस शहरातील सर्वच नाल्यांची पाहणी केली. त्यात थर्माकोल, गाळ आणि कचऱ्यांनी नाले तुडुंब भरले आहेत.
विशेषतः शहरातील नालेसफाईबाबत टेंडरनामाने महापालिका प्रशासनाला जागे करताच प्रशासकांच्या आदेशाने मार्चमध्येच नालेसफाईला सुरुवात केली होती. यावर्षी शहरातील नाल्यांची सफाई सर्वस्वी 'कंत्राटदार भरोसे' न करता महापालिकेच्या यंत्रणेमार्फतच करत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी थांबवण्याचा गवगवाही प्रशासकांनी केला होता.
प्रशासकांच्या प्रयत्नांना खिळ
पाण्डेय यांचा प्रयत्न चांगलाही असु शकतो. पण याही कामाचे नेतृत्व करणारे कार्यकारी अभियंता बी.डी.फड यांची यंत्रणा कुचकामी असल्याचे वास्तव 'टेंडरनामा'च्या शनिवार ते मंगळवार असे सलग चार दिवस केलेल्या पाहणीत उघड झाले. विशेष म्हणजे उपअभियंता असलेले फड हे प्रभारी असताना या कामचुकार अधिकाऱ्याला निवृत्तीच्या उंबरठ्यावर कार्यकारी अभियंतापदी बक्षिस देण्यात आले आहे.
मॉन्सूमपूर्व पावसातच औरंगाबाद तुंबणार
नालेसफाईची जबाबदारी दिलेल्या बी. डी. फड यांच्या अशा बेजबाबदार कारभारामुळे आणि बेपर्वाईमुळे औरंगाबादकरांना विशेषतः नाल्याकाठी राहणाऱ्यांना सालाबादप्रमाणे याही वर्षी अशरक्ष: जीव मुठीत घेऊन जगावे लागणार आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईमुळे जसे पाण्डेय यांना संतापलेल्या औरंगाबादकरांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, तसे पावसाळ्यात नालेसफाई कामाबाबत विचारणा करणाऱ्या औरंगाबादकरांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्यावर्षी काय झाले होते?
गेल्यावर्षी दोन कोटी रूपये खर्च करून अर्धवट नाले सफाई झाली होती. त्यातही नाल्याच्या काठावरच गाळ टाकण्यात आला होता. त्यामुळे पावसात नाले तुंबल्याने महापालिकेतील बी.डी.फड याच कार्यकारी अभियंता व त्यांच्या यंत्रणेचे 'टेंडरनामा'ने पितळ उघड केले होते. विशेष म्हणजे चारशे कोटीची भूमिगत गटार योजना साकार केलेली असताना बाराही महिने शहरातील अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी तुंबल्याचा पर्दाफाश 'टेंडरनामा'ने केला होता. पावसाळ्यात हेच पाणी पावसाच्या पाण्यासोबत वाहून येत असल्याने नाल्यांकडेच्या घरांमध्ये चक्क ड्रेनेजचे पाणी शिरते. गत पावसाळ्यात सुखना आणि खामनदीतील वसाहती पाण्याखाली आल्या होत्या.
प्रशासकांच्या आशेवर पाणी
नुकतेच महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांनी ८० टक्के नालेसफाई झाल्याचे जाहिर केले. मात्र 'टेंडरनामा'च्या पाहणीत नेहमीप्रमाणे महापालिकेकडून होणारी नालेसफाई केवळ फार्स असल्याचे उघड झाले. टेंडरनामाने शनिवार ते मंगळवारपर्यंत सलग चार दिवस शहरातील सर्वच नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. पाहणी केलेल्या ठिकाणी बोटावर मोजणाऱ्या नाल्यांवर केलेल्या सफाई दरम्यान काठावरच गाळाचे डोंगर मोठ्या प्रमाणावर ठेवलेले दिसून आले. त्यामुळे उलट नाल्यांची लांबी-रुंदीच गायब झालेली आहे. थातूरमातूर पद्धतीने केलेल्या नालेसफाई दरम्यान अनेक ठिकाणी त्यातून काढलेला गाळ, कचरा पूर्णपणे उचलला गेला नाही. त्यामुळे मान्सूमपूर्व पावसात हा गाळ व कचरा थेट नाल्यात जाऊन ते पुन्हा एकदा गाळाने भरतील असे दिसते.
कुठे काय स्थिती
गारखेडा, मुकुंदवाडी, चिकलठाणा, पद्मपुरा, उस्माणपुरा, बेगमपूरा, जवाहर काॅलनी, नारेगाव, हर्सूल, पडेगाव, मिटमिटा, सातारा-देवळाई, बीडबायपास व अन्यभागात येथील नाले प्लास्टिक व कचऱ्यामुळे बुजून गेले आहेत. याभागात केवळ सहज दृष्टीला पडतील असेच नाले केवळ थातूरमातूर पद्धतीने साफ केले आहेत. पीरबाजार येथील नाला, सुतगिरणी चौक नाल्यांचीही अवस्था वेगळी नाही. गजानन महाराज मंदिर चौकातून जाणारा नाला वरवर साफ केला असला तरी, त्याचे पाइप गाळात रुतले आहेत. त्यामुळे थोडाही पाऊस पडला की पाणी रस्त्यावर येईल. जयभवानीनगरात देखील वेगळी स्थिती नाही.
महापालिकेच्या शेजारचाच नाला गाळाने बुजलेला
महापालिकेच्या मुख्य इमारतीशेजारील नुर कॉलनीतील नाल्याची अवस्था भयाण आहे. हा नाला कचऱ्याने आणि गाळाने काठोकाठ भरला आहे. नाल्यातून काढलेला कचरा तेथेच टाकला जात आहे. हा गाळ व कचरा त्वरित न उचलल्यास पावसामुळे पुन्हा नाल्यात जाऊन परिस्थिती 'जैसे थे' होणार आहे. याच नाल्यावर अतिक्रमण करून अनेकांनी घरे बांधली असून नालाच गायब केला आहे.
'औषधी भवन'ला कोण वाचवणार
औषधी भवनचा नाला थर्माकोल, कचरा, गाळाने पूर्ण भरून गेला आहे. या नाल्यावरील औषधी भवन तोडण्यावरून सहा वर्षांपूर्वी वाद झाला होता, परंतु राजकीय आशीर्वादामुळे महापालिकेला हे भवन अद्याप हटविता आले नाही. अनेक दुकानदारांकडून नाल्यात थर्माकोल, कचरा टाकून दिला जातो. गाळ, कचरा, प्लास्टिक व थर्माकोलने नाला अडल्यामुळे थोडाही पाऊस पडला की औषधी भवन मागे पाणी अडते. त्याचा औषदी भवनशेजारच्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती पाहून आता या पाणकळ्यात कोण वाचवणार औषधी भवन असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जेसीबी, पोकलेनची अपुरी संख्या
जेसीबी, पोकलेनची संख्या पुरेशी नसल्याने अनेक ठिकाणी नालेसफाईचे काम ठप्प होत आहे. त्यातही नाल्यांच्या अतिक्रमणाने गटारी झाल्याने वसाहतींच्या दाटीवाटीत असलेले नाले साफ करता येत नाहीत. यामुळे गुंठेवारी व स्लमभागासह अनेक उच्चभ्रू वसाहतीत नाले साफसफाईचे काम थांबलेले दिसले. दुसरीकडे काही ठिकाणी नाल्यातून काढलेला गाळ, कचरा उचलण्यास वाहनेच उपलब्ध नाहीत. शिवाय नाल्यातून काढलेला गाळ कोठे टाकायचा याचे कोणतेही नियोजन महापालिकेकडे नाही. परिणामी, नालेसफाई केवळ फार्स ठरण्याची शक्यता आहे.
पूर आल्यावर लोकप्रतिनिधींची पाहणी
शहरातील बहुतांश मुख्य नाल्यांच्या सुरक्षाभिंती खचल्यामुळे अधिक तुंबलेले आहेत. नेमेची येतो पावसाळा त्याप्रमाणे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येते. दरवर्षी कोट्यावधी रूपयाच्या नालेसफाईत ठेकेदार अधिकारी हात धुऊन घेतात. यामुळे यावर्षी नालेसफाईवर एक रूपयाही खर्च न करता आहे त्या महापालिकेच्याच यंत्रणेकडून नाले सफाई सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे नालेसफाईला तीन महिन्यापूर्वीच सुरूवात केली होती. त्यानंतरही परिस्थितीच फार फरक पडलेला नाही. मात्र नाल्यांचे पाणी घराघरात शिरल्यावर लोकप्रतिनिधींची नालेसफाईची पाहणी म्हणजे जखमेवर मीठ लावून चोळल्यासारखी ठरते.
सतर्कतेचा इशारा देणे गरजेचे
शहर पायाखाली घालुन प्रतिनिधी नालेसफाईची पाहणी करताना किराडपुरा भागासह खाम व सुखना नदी व इतर सर्वेच नाल्यांची कमी झालेली रूंदी, कचराकोंडी, गाळ यामुळे नाल्याशेजारच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा महापालिकेने आत्तापासूनच द्यायला हवा. मान्सूमपूर्व दिवसातच स्थलांतर करण्यात यावे. नारळीबाग, औषधी भवन, किलेअर्क , मुर्गीनाला, सुखना आणि खामनदी काठावरील रहिवाशांना आतापासूनच सतर्कतेचा इशारा द्यायला हवा. कारण या भागातील परिस्थिती भयानक आहे.
काय म्हणाले प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय
यंदा हवामानात होणारे बदल व त्यामुळे निर्माण होऊ शकणारी बिकट परिस्थिती लक्षात घेत आम्ही तीन महिनाअगोदरच नाला सफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. या कामाचे कंत्राट न देता स्वत:ची यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कमी खर्चात आणि चांगल्या पद्धतीने काम होत आहे. या कामासाठी पालिकेच्या यंत्रणेतील तीन जेसेबी, एक पोकलेन, तीन टप्पर या यंत्रसामुग्रीचा वापर केला जात आहे. ही यंत्रसामग्री प्रत्येक झोनसाठी उपलब्ध करून दिली आहे. तुंबणारे नाले स्वच्छ करुन ते प्रवाहित केले जात आहेत.अद्याप कामे पूर्ण झाली नाहीत. ज्या भागात सफाई झाली आहे त्याचे सर्व फोटो आमच्याकडे आहेत. यासंदर्भात मी तातडीने संबंधित अधिकार्यांना याकामात कुठेही कमतरता भासणार नाही याची पूरेपूर काळजी घेत आहोत. मे अखेर पर्यंत कामे पूर्ण होतील. संयुक्त राष्ट्रांच्या रेस टू रेसिलन्स अभियानाच्या अंतर्गत शहराला हवामान बदलाच्या दृष्टीने सज्ज ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.