औरंगाबाद (Aurangabad) : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले यावर्षी पावसाळा दोन महिन्यांवर असताना तत्कालीन प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांनी महापालिकेच्या यंत्रणेतूनच शहरातील नालेसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू केले होते. यासाठी जवळपास अडीच कोटी रूपये डिझेल आणि मनुष्यबळावर खर्च करण्यात आला. कमी खर्चात नाले सफाई केल्याचा दावा देखील अधिकाऱ्यांनी केला. परंतु औरंगाबादेतील अनेक भागातील नाल्यातून काढण्यात येणारा गाळ नाल्याच्या बाहेरच टाकण्यात आला असल्याचे दिसत आहे.
अडीच महिन्याचा काळ उलटूनही गाळाची योग्य विल्हेवाट न लावल्याने औरंगाबादकरांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यामुळे नाला परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यात पावसाच्या पाण्यात गाळ पुन्हा नाल्यात वाहत असल्याने नाले पुन्हा ब्लाॅक होत आहेत. शिवाय महापालिकेतील अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा पाहून काही महाभाग निष्काळजीपणे गाळावर कचरा टाकत असल्याने दुर्गंधीत भर पडली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्याआधीच औरंगाबाद महापालिकेचे तत्कालीन प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांनी नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. यात नेहमीप्रमाणे हात की सफाई करणाऱ्यांना बगल देत कंत्राटदारांच्या खाबुगिरीला लगाम लावण्यासाठी त्यांनी दोन पैसे वाचावेत म्हणून महापालिकेचे जेसीबी, पोकलॅन्ड, टिप्पर आणि ट्रॅक्टर तसेच इतर यंत्रणेचा वापर करत नालेसफाई सुरू केली होती. पावसाळा काही महिन्यांवर असताना यंदा नालेसफाईचे काम मुदतीत व कमी खर्चात पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेने पुर्ण केल्याचा गवगवा अधिकाऱ्यांनी केला होता. दरम्यान टेंडरनामाने शहरभर महापालिकेच्या सफाईची पाहणी केली असता त्यात जागोजागी कारभाऱ्यांच्या गलथान कारभार समोर आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून काढण्यात आलेला गाळ नाल्याच्या काठावरच टाकण्यात येत असल्याने शहरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील बहूतांश नाल्याच्या कडेला मुख्य आणि अंतर्गत रस्ते असल्याने रस्ता वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे.
एकीकडे नवनियुक्त प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी महापालिकेचा पदभार हाती घेताच भिताडांवरच्या पिचकाऱ्या पाहून संताप व्यक्त केला. दुसरीकडे लेटलतीफ आणि विभाग प्रमुखांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणारे आणि परस्पर रजा घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याची तंबी दिली. याबंद्दल त्यांचे अभिनंदन. दुसरीकडे नाल्याच्या काठावरच रचून ठेवण्यात आलेला ढीगभर गाळ यामुळे नागरिकांना चालताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर महापालिकेचे नवनियुक्त प्रशासक डाॅ.अभिजित चौधरी काय उपचार करणार याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागुन आहे.