औरंगाबाद (Aurangabad) : महानगरपालिकेचे नवनियुक्त प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी पदभार स्वीकारताच महापालिका मुख्यालयाच्या भिताडांवर गुटख्याच्या पिचकाऱ्या पाहून कारभाऱ्यांवर संताप व्यक्त करत रंगरंगोटीच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर थेट लेटलतिफांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, शहरातील रस्ते, पाणी, कचरा याबाबत त्यांनी कसलाही आढावा न घेता फक्त प्रशासकीय कामकाजाकडे लक्ष दिले. यावर टेंडरनामा प्रतिनिधीने नवनियुक्त प्रशासकांचे लक्ष वेधताच त्यांनी शहर स्वच्छतेबाबत कडक पावले उचलली आहेत.
त्यांच्या आदेशानुसार आता प्रभाग अधिकारी वार्डावार्डात फिरताना दिसत आहेत. त्यात झोन क्रमांक नऊमध्ये उपायुक्त तथा घनकचरा विभाग प्रमुख सोमनाथ जाधव सहाय्यक आयुक्त असद उल्लाखान यांनी शुक्रवारी केलेल्या पाहणीत कचरा उचलणे व सफाई करणे या कामात रेड्डी कंपनीकडून बेजबाबदार आणि निष्काळजीपणा आढळून आल्याने कंपनीला ५० हजार रुपये दंड लावला. दरम्यान रेड्डी कंपनीच्या कामात सुधारणा दिसून आली नाही तर दंडाची दुप्पट रक्कम वसूल केली जाईल असेही आदेशात म्हटले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी शहरात स्वच्छतेकडे अधिक लक्ष घातले असून त्यांनी शुक्रवारी झोन क्रमांक नऊ मधील कामाची पाहणी केली.
या पाहणीत एसएससी बोर्ड ते पीर बाजार रोड, पीडब्ल्यूडी क्वाटर रेल्वे स्टेशन रोड उस्मानपुरा, हॉटेल विट्स ते आनंद गाडे चौक देवगिरी महाविद्यालयासमोर, रेल्वे स्टेशन उड्डाणपूल आदी ठिकाणी शंभर टक्के साफसफाई करून कचरा उचलणे गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी साफसफाई व कचरा उचलला नसल्याचे निदर्शनात आले. अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याबद्दल रेड्डी कंपनीला ५० हजार रुपयांचा दंड लावण्याचा तसेच रेड्डी कंपनीच्या कामात सुधारणा दिसून आल्या नाहीत तर दंडाची रक्कम दुप्पट करण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी महापालिका लेखा विभागाला दिले असल्याची माहिती झोन क्रमांक नऊ चे सहाय्यक आयुक्त तथा वॉर्ड अधिकारी असद उल्लाह खान यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना दिली.