Aurangabad Tendernama
मराठवाडा

टेंडरनामा इम्पॅक्ट;निकृष्ट दुभाजकाच्या बांधकामावर अधिकाऱ्यांचे पथक

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेतील सिडको एक-दोन एसटी काॅलनी प्रभागातील हाॅटेल दिपाली ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन मार्गाचे व्हाइट टाॅपिंग, फुटपाथ आणि पावसाळी भूमिगत गटारीसह दुभाजकाचे काम सरकारच्या अनुदानांतर्गत होत आहे. दरम्यान होत असलेल्या दुभाजकाचे बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याबाबत वृत्त 'टेंडरनामा'ने प्रसिद्ध केले होते. या प्रकरणात प्रशासकांनी लक्ष घालावे, अशी ठोस भूमिका 'टेंडरनामा' ने घेतल्यानंतर त्यांच्या आदेशाने अधिकाऱ्यांनी भेटी देऊन गुरूवारी कामाची पाहणी केली. यावेळी होत असलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे दिसून आले. यामुळे अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला चांगलेच फैलावर घेत दर्जेदार काम करण्याची तंबी दिली.

अधिकाऱ्यांची भेट; निकृष्ट कामाचे वृत्त ठरले खरे

औरंगाबाद महापालिकेच्या माध्यमातून सरकारी अनुदानांतर्गत सिडको एन-२ व सिडको एन-३ व एन-४ या दोन वार्डाच्या मध्यभागातून जाणारा अत्यंत वर्दळीचा असलेला हाॅटेल दिपाली ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन या एकुण १६०० मीटर लांबी व १४ मीटर रूंदीच्या रस्त्याचे व्हाइट टाॅपिंग करणे, त्यालगत दोन्ही बाजुने एक ते दिड मीटरचे फुटपाथ तयार करणे, रस्त्याच्या दोन्ही बाजुला पावसाळी भूमिगत गटार तयार करणे तसेच दिशादर्शक फलक, रस्त्यावर थर्मापेस्ट पांढरे पट्टे व रेडियम कॅट ऑईज बसवने याशिवाय रस्त्याच्या मधोमध ३ फुट उंच १६०० मीटर लांबी आणि १२ इंच लांबीचा दुभाजक तयार करून त्यात काळी माती टाकून सुशोभिकरण करणे आदी कामासाठी महापालिका तब्बल दहा ते बारा कोटी रूपये खर्च करत आहे. या कामाचे टेंडर काढुन शहरातील अनेक रस्त्यांची वाट लावणाऱ्या जीएनआय कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

कामाची संथगती; दर्जा निकृष्ट

मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यात दोन दिवसापूर्वीच कंत्राटदाराकडुन आरसीसी दुभाजकाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे वृत्त 'टेंडरनामा'ने बुधवारी (२७ एप्रिल) प्रसिद्ध होताच महापालिकेचे प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांनी वृत्ताची दखल घेऊन शहर अभियंत्यांना चौकशीचे आदेश दिले होते. प्रसंगी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता बी. डी. फड, उपअभियंता राजीव संधा, शाखा अभियंता एस. एस. पाटील यांनी बांधकामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी पीएमसी (प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम) यश इनोव्हेटीव्ह सोल्युशनचे संचालक समीर जोशी, झेड. ए. फारूकी, बीपीन हटकर, तसेच जीएनआय कन्सट्रक्शनचे अभियंता किरण सोनवने व सिंग तसेच जान्हवी कन्स्ट्रक्शन कंपनीचे सब कंत्राटदार दत्ता पोखरकर उपस्थित होते.

तपासणी अहवाल येण्याआधीच कंत्राटदाराची वकिली

यावेळी अधिकाऱ्यांनी बांधकामासाठी वापरण्यात येत असलेल्या रेडिमिक्स काँक्रिटचा नमुना तपासण्यासाठी घेतला. कामात निकृष्ट दर्जा असल्यानेच भुंगा लागल्याचे स्पष्ट असताना मात्र अधिकाऱ्यांनी संबंधित प्रयोग शाळेत महापालिकेच्या दक्षता पथकामार्फत बांधकाम साहित्याचा दर्जा तपासणीचा अहवाल येण्याआधीच दर्जा चांगला असल्याचे म्हणत कंत्राटदाराची वकिली सुरू केली. यापुढे दर्जेदार काम करा अन्यथा कामाचे देयक मिळणार नाही अशी तंबी कंत्राटदाराला दिली.

काय म्हणाले अधिकारी

कंत्राटदाराने वापरलेल्या बांधकाम साहित्याचा दर्जा आम्ही आता वेळोवेळी तपासुन त्याची नोंद घेणार आहोत. दुभाजक कामादरम्यान त्याने प्लेटांना ऑईल आणि ग्रीसींग करायला हवे होते, तसे न केल्याने प्लेट काढताना काँक्रिटचा थर प्लेट काढताना निघाला आणि भुंगा लागल्याचे आमच्या निदर्शनास आले. कंत्राटदाराने बांधणी झाल्यानंतर त्यावर व्हायब्रेटींग मशीनने जोरदार दबाई करणे आवश्यक होते. सदर कामात स्टिल डिझाईनप्रमाणे १२ एमएम आणि ८ एमएमचा वापर करत आहे. रेडिमिक्स काँक्रिट देखील एम ३० ग्रेडचेच आहे. त्याने यापुढे दिलेल्या सुचनांची दखल घेतली नाहीतर त्याला एक छदाम देखील आम्ही देणार नाहीत.

- राजीव संधा, उपअभियंता, महापालिका