Imtiaz Jaleel Tendernama
मराठवाडा

'शिवाजीनगरच्या भुयारी मार्गासाठी रेल्वेमंत्र्यांना धारेवर धरणार'

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक ५५ येथील अंडरपासचे काम पीडब्लूडी, महापालिका आणि विशेष भूसंपादन अधिकारी, विशेष घटक यांच्यातील असमन्वय आणि वेळोवेळी काहीतरी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून कागदी घोडे नाचवत असल्याने हे काम रखडले आहे. यामुळे या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण करणार, असा सवाल उपस्थित करत लोकसभेत केंद्रीय रेल्वे मंत्री आणि रेल्वे राज्यमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरणार असल्याचा मनसुभा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल (Imtiaz Jaleel) यांनी आखला असल्याचे खास टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

या कामात चालढकल करणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांवर कडक कारवाई व्हावी. आत्तापर्यंत येथील वाहतूक कोंडीने बळी गेलेल्यांची आकडेवारी तपासून कामचूकार अधिकाऱ्यांवर व तसेच अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर मनुष्यवधाचे खटले भरावेत व कारागृहात रवानगी करावी अशी देखील मागणी करणार असल्याचे जलिल यांनी केली आहे.

शिवाजीनगर अंडरपास रखडला

बीड बायपासच्या पलिकडे आणि अलीकडे महापालिकेच्या हद्दीसह झाल्टा, गांधेली, सुंदरवाडी, चितेगाव आदी ग्रामपंचायतीच्या हद्दीपर्यंत मोठया वसाहती व गावे आहेत. परंतु शहराला जोडण्यासाठी संग्रामनगर उड्डाणपूल हा एकच पर्यायी मार्ग आहे. शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक ५५ येथे अंडरपासचे काम रखडल्याने येथे दर अर्ध्या तासाला वाहतूक कोंडी होते. याऊलट संग्रामनगर येथील उड्डाणपूलाचे काम देखील झाले. त्या पाठोपाठ तेथील भुयारी मार्गाचे कामही झाले. मात्र शिवाजीनगर रेल्वे गेट क्रमांक ५५ येथील प्रस्तावित अंडरपासचे काम गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेले आहे.

अडीच लाख लोकांची तारांबळ

बाळापूर, गांधेली, सातारा, देवळाई, सिंदोन, भिंदोन या शिवाय अनेक गावातील रहिवासी, विद्यार्थी व नागरिक तसेच भाजीपाला, दुध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणारे शेतकरी, छोटे व्यावसायिक तसेच रुग्णवाहिका, अंत्ययात्रा या मार्गाने रोज शहरात येतात. मात्र देवळाई चौक ते शिवाजीनगर दरम्यान अर्थात औरंगाबाद शहर आणि बीडबायपास याला जोडणाऱ्या शिवाजीनगर रेल्वे गेट क्रमांक ५५ येथे यांच्यातून रेल्वेरूळ गेला आहे. त्यामुळे तेथे 'दमरे' (दक्षिण मध्य रेल्वे) ने हा भाग जोडण्यासाठी मनुष्यरहित रेल्वे फाटक तयार केले आहे. या भागातील अडीच लाख लोकांसाठी केवळ शिवाजीनगर किंवा संग्रामनगर हे दोनच मार्ग आहेत.

संग्रामनगर नंतर शिवाजीनगर अंडरबायपासचा लढा कायम

जानेवारी २०१४ मध्ये संग्रामनगर उड्डाणपूल झाल्यानंतर तेथील वाहतूक कोंडी सुटली. त्यानंतर त्या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार २०१८ मध्ये भुयारी मार्गाचे काम देखील झाले. मात्र इकडे शिवाजीनगर येथील अंडरपास रखडलेला आहे. या ठिकाणच्या अडचणी लक्षात घेऊन शहरातील एक विधिज्ञ ॲड. रूपेश जैस्वाल यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने आदेश दिल्यावर संबंधित विभागांनी ३८ कोटी ६० लाखाचे अंदाजपत्रक तयार केलै. भागीदारी तत्वावर तातडीने अंडरपास उभारणीचे नियोजन केले. परंतु, अद्याप भूसंपादनाच्या कामालाच सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अंडरपासचे कामही रखडलेले आहे.

काय म्हणाले जलिल

वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी ही कामे लवकर करावीत, यासाठी जलिल हे येत्या तीन दिवसात लोकसभेत या प्रस्तावित पण रखडलेल्या शिवाजीनगर अंडरपासचा प्रश्न उपस्थित करून केंद्रीय रेल्वे मंत्री व राज्यमंत्री यांची कोंडी करणार आहेत. यासंदर्भात जलील यांनी खास टेंडरनामा प्रतिनिधीशी संपर्क करून ही माहिती दिली. सोबतच औरंगाबाद चिकलठाणा येथील रखडलेल्या पीटलाइनचा देखील मुद्दा उपस्थित करून मंत्रांना धारेवर धरणार असल्याचेही ते म्हणाले.