Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad: दुष्काळात तेरावा! 'निकृष्ट' दुभाजकालाच ठोकला पत्रा...

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : जळगाव रोड - अजंता अॅंबेसेटर (Jalgaon Road To Ajanta Ambassador) या सिडकोतील (CIDCO) गजबजलेल्या कॅनाॅट परिसरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकाचे (DIVIDER) काम निकृष्ट झाल्याने औरंगाबादकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. हे काम महिनाभर देखील तग धरू शकले नाही.

हे काम हलक्या वाहनाच्या धडकांनी नेमक्या वळणमार्गावरच तीन ठिकाणी फुटले. त्यावर 'टेंडरनामा'ने प्रहार करताच कंत्राटदार प्रतिनिधींसह प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांसोबत मनपाच्या कारभाऱ्यांनी पाहणी केली. कंत्राटदाराने दुरुस्तीचे आश्वासन दिले. मात्र दुरुस्तीच्या नावाखाली एका ठिकाणी यू आकाराचा पत्रा जोडून यंत्रणा पसार केली. त्याचा हा जुगाडू कारभार आणि दुभाजकाच्या जखमेवर केलेली अर्धवट मलमपट्टी पाहून औरंगाबादकर खेद व्यक्त करताना दिसत आहेत.

सोळा वर्ष प्रतिक्षा

सिडकोचे मनपात हस्तांतर झाल्यानंतर मागील १६  वर्षांपासून या रस्त्याच्या कामाचा रखडपणा चालला होता. कॅनाट मार्केटसारख्या गजबजलेल्या आणि दोन्ही बाजूने आलीशान बहूमजली इमारती तसेच बॅंका, महाविद्यालये, मंगल कार्यालये, मोठमोठे माॅल अशा परिसरातून जाणाऱ्या या रस्त्याच्या खड्डेमय अवस्थेमुळे वाहनांचे अनेक अपघात झालेले आहेत. यात सामान्य नागरिकांचे बळी आणि काहींना कायमचे अपंगत्व आले.

दीड कोटीचा रस्ता

असंख्य नागरीकांच्या तक्रारीनंतर माजी उपमहापौर प्रशांत देसरडा तसेच माजी नगरसेविका राखी देसरडा यांचा पाठपूरावा आणि प्रयत्नांना यश आले. शासन अनुदान अंतर्गत या रस्त्यासाठी एक कोटी ५२ लाख ९५ हजार ३९६ रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला.

निकृष्ट कामात अग्रेसर कंत्राटदाराला काम

रस्त्याच्या कामासाठी शहरातील अनेक रस्त्यांची वाट लावणाऱ्या मनपा असो की, पीडब्लूडी साऱ्यांच्या जवळचा लाडका कंत्राटदार बिंद्रा यांच्या जी.एन.आय. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीला रस्ता बांधकामाचा कंत्राट देण्यात आला. यावर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे. यश एनोव्हेटिव्ह सोल्यूशन एल. एल. पी. या कंपनीची नेमणूक करण्यात आली. मनपाचे कार्यकारी अभियंता बी. डी. फड, उप अभियंता आर. पी. वाघमारे आणि डी. टी. डेंगळे यांच्या निगरानीत रस्त्याचे बांधकाम करण्यात आले.

टेंडरमधील तरतूदींना फाटा

एकूण ४३० मीटर लांबी आणि दोन्ही बाजूने सात मीटर रुंदीत रस्त्यावर ५० एम. एम. जाडीचा बी. एम.चा थर, ८० एम. एम. जाडीचा डी. बी. एम.चा थर आणि ४० एम.एम. बी.सी. चा थर टाकून डांबरीकरण करणे. फुटपाथ व आर.सी.सी. दुभाजकाची टेंडरमध्ये तरतूद करण्यात आली होती. मात्र झालेले काम पाहत तरतुदीला फाटा देत काम झाल्याचा संशय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे रस्ता बांधकाम करताना अनेक ठिकाणी ड्रेनेजचे चेंबर रोड लेव्हलमध्ये न केल्याने चेंबरचे मेनहोल खाली दबल्याने यंत्रणा निर्मित खड्ड्यांची डोकेदूखी वाढून रस्ता असून अडचण, नसून खोळंबा अशी गत झाली आहे.

चार ठिकाणी खोदला रस्ता

रस्ता होऊन वर्ष देखील झाले नाही. त्यात जलवाहिनी आणि ड्रेनेजलाईन दुरूस्तीसाठी चार ठिकाणी रस्ता खोदण्यात आला. गत सहा महिन्यांपासून खोदकामावर डांबराची मलमपट्टी देखील करण्यात आली नाही. त्यामुळे कोट्यावधी रूपये खर्च करून बांधलेल्या डांबरी रस्त्यावर खड्ड्यांची साडेसाती कायम आहे. प्राणघातक चेंबरचे दबलेले मेनहोल आणि शेजारी या खोदकामातील खड्ड्यांची भर अशा दुहेरी संकटातून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यंत्रणानिर्मित खड्डे टाळताना अपघाताचा धोका पत्कारावा लागत आहे.

निकृष्ट दुभाजकाचे तुटले लचके

रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्याचे काम केले गेले. मात्र  या कामामुळे देखील 'असून अडचण, नसून खोळंबा', अशी अवस्था झाली आहे. दुभाजकाचे काम निकृष्ट तसेच त्याची उंची कमी आहे. दुभाजकात काळी माती टाकण्याचे काम टेंडरमध्ये नसल्याचे प्रकल्प सल्लागार यांनी स्पष्ट केले असले तरी मनपा कारभाऱ्यांनी संबंधित विभागाकडून माती न टाकल्याने झाडांमध्ये कचरा साठला आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणीचा ठरत आहे. काही हाॅटेल व्यावसायिक उष्टावळी टाकत आहेत. त्यामुळे खाद्याच्या शोधात भटकणारी कुत्री दुभाजकात दडून बसतात. त्यात दुभाजकात ताव मारण्यासाठी भटकी कुत्री मध्येच रस्ता ओलांडत असल्याने अपघात होत आहेत.

दुभाजक बांधकामानंतर महिन्याभरातच त्याचे लचके तूटल्याने कंत्राटदाराचा निकृष्ट कारभार उघड झाला. 'टेंडरनामा'च्या वृत्तानंतर त्याने एका ठिकाणी दुरूस्तीचे काम हाती घेतले. तूटलेल्या दुभाजकाची जोडाजोडी सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान पसरले होते. परंतु, तुटलेल्या दुभाजकात यू आकाराचा पत्रा जोडून कंत्राटदाराने जुगाड करत त्यात काॅंक्रीट न भरताच यंत्रणा पसार केली. आधीच केलेल्या कामाचा दर्जा चांगला नाही, त्यात अशा अर्धवट कामाने दुभाजक, यंत्रणानिर्मित खड्डे आणि दुभाजकातील कचऱ्यामुळे दीड कोटीच्या नव्या रस्त्याची शोभा मातीत मिळवल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

कंत्राटदाराला सांगतो

या संदर्भात सल्लागार प्रमुख समीर जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, मनपाच्या संबंधित अधिकारी आणि मी स्वतः याआधी कंत्राटदाराला सूचना केली होती. त्याने काम हाती घेतले होते. काम निकृष्ट नाही, त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे. दुभाजकाची दुरूस्ती तातडीने करायला सांगतो, असे ते म्हणाले. तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या कामाबाबत कानावर हात ठेवले.