Aurangabad Municipal Corporation Tendernama
मराठवाडा

पालकमंत्री म्हणतात, आठवडाभरात औरंगाबादचा पाणीपुरवठा सुरळीत करू

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादकरांची तहान भागवण्यासाठी दीर्घकालीन आणि ठोस उपाययोजना न करणाऱ्या महापालिकेच्या नियोजन शुन्य कारभारावर 'टेंडरनामा'ने प्रहार करताच ठाकरे सरकारने राज्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिव संजीव जैस्वाल यांना खडबडून जागे केले. पाठोपाठ औरंगाबाद शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी देखील पाणी वाढविण्याचे आदेश दिल्यानंतर अखेर तहान लागल्यावर विहिर खोदण्याचे काम सुरू करत औरंगाबाद महापालिकेने अजब कारभाराचे दर्शन घडवले. त्यातुन आता औरंगाबादकरांसाठी १० एमएलडी पाणी वाढविण्यास सुरूवात झाली आहे.

औरंगाबादकरांना वार्षिक साडेचार हजार रूपये पाणीपट्टी देऊनही बाराही महिने तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यातही बहुतांश ठिकाणी जलवाहिनी आणि एअर व्हाॅल्व्हला गळती लागल्याने दुषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे शहरात पाण्यासाठी सर्वत्र बोंबाबोंब सुरू आहे. एकीकडे ना नळाला पाणी, दुसरीकडे महापालिकेचे टँकरही मिळत नसल्याने खाजगी जार आणि टँकरसाठी नागरिकांना खिसा रिकामा करावा लागत आहे. तीव्र पाणी टंचाई असताना जलकुंभांवर लावलेले तिसरे डोळे अर्थात सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून काही राजकीय पुढारी मतांची झोळी भरण्यासाठी मोफत पाणीपुरवठा म्हणून टँकरवर स्वतःचे नाव गोंदवत थेट जलकुंभावरून पाण्याची चोरी करतात. धक्कादायक म्हणजे मोफत पाणी वाटप योजनेच्या नावाखाली मध्यरात्री काही बड्या बांधकामांवर वळवले जात असल्याचा आरोप देखील नागरिकांनी महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांच्याकडे केला.

औरंगाबादकरांसाठी गंभीर बनलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या समंस्येवर 'टेंडरनामा'ने वृत्त मालिका सुरू केल्यानंतर ठाकरे सरकारने राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे सचीव संजीव जैस्वाल यांना जागे केले. त्यांनी तीन दिवसापुर्वी औरंगाबादेत धाव घेऊन महापालिका आणि एमजेपीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यात १६८० कोटीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या संथगती कारभारामुळे एमजेपीचे कार्यकारी अभियंता अजयसिंग यांची चांगलीच कान उघाडणी केली.

पालकमंत्री लागले कामाला

ठाकरे सरकारच्या आदेशानंतर जैस्वाल यांच्या पाठोपाठ शहरातील सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री सुभाष देसाई यांनी देखील कडक पावले उचलली आहेत. देसाई यांनी सोमवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडे व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उपाययोजनांची माहिती घेतली.

अशा केल्या सुचना

● हर्सूल तलावातून चार ऐवजी सहा एमएलडी पाणी पुरवठ्यात वाढ करुन एमआयडीसीकडून एक ऐवजी ४ एमएलडी असे एकुन दररोज १० एमएलडी पाणी वाढवण्याच्या सुचना करण्यात आल्या.

● तसेच गारखेडा विभागात १८०० मीटर लांबीची जलवाहिनी तातडीने टाकण्याचे नियोजन करा असेही सांगितले.

● तसेच त्यांच्या सूचनानंतर ठिकठिकाणी गळती लागलेल्या जलवाहिनीची आणि नाथसागरातुन जिथुन पाणी उचलण्यात येते तिथे पाणबुड्यांच्या माध्यमातून दुरूस्ती करण्यात आली आहे.

लाभले एमजेपीचे अभियंता

राज्याच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैयस्वाल यांच्याकडे पालकमंत्र्यांनी महापालिकेस मदत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील ज्येष्ठ अभियंत्यास उसनवारी तत्वावर नियुक्ती द्यावी अशी सूचना केली व ती मान्य करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून शहरासाठी देण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ करण्याची सूचना केली.

देसाई यांच्या सुचनेनंतर असे केले नियोजन

सध्या एमआयडीसीच्या एन -१ येथील जलकुंभांवरून महामंडळाकडून दररोज १ एमएलडी पाणी दिले जाते, त्यात ३ एमएलडी वाढ करून ४ एमएलडी पाणी देण्याचे नियोजन केले गेले आहे. सद्यस्थितीत महापालिकेने नियुक्त केलेल्या टॅकरच्या कंत्राटदारांकडुन एन - ५ एन - ७ , कोटला काॅलनी, नक्षत्रवाडी येथून १५ टॅकर भरण्यात येतात . दररोज ५०० फेर्या टॅकरच्या होतात. त्यामुळे दररोज पाच एमएलडी पाणी गुंठेवारी वसाहतीत पुरवठा होत असे. आता सर्व टॅकर हळुहळू एमआयडीसीकडून मिळणार्या पाण्यावर शिफ्ट करण्यात येत आहेत. प्रारंभी सिडको एन - ७ जलकुंभांवरील टॅकर बंद करण्यात आले आहेत. हे टॅकर सिडको एन -१ एमआयडीसीच्या जलकुंभाकडे वळवण्यात आले आहेत. सद्यस्थितीत १ ऐवजी ४ एमएलडी पाणी तिथुन महापालिकेला मिळणार आहे.

असा झाला टेंडरनामा वृत्तमालिकेचा परिणाम

● जुन्या शहरासाठी ४ ऐवजी १० एमएलडी पाणी हर्सुल तलावातून महापालिका दररोज फक्त ४ एमएलडी पाण्याचा उपसा करीत होती. या पाण्यात १० एमएलडीपर्यंत वाढ करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या काम करणार्या कंत्राटदार कंपनीकडून सोमवारी हर्सूल तलाव ते जटवाडा जलशुध्दीकरण केद्रापर्यंत ३५० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यास सुरूवात झाली. येत्या आठवड्यात हे काम पुर्ण होईल.

● त्यानंतर हर्सूल तलावातून अतिरिक्त ६ एमएलडी पाणी जुन्या शहराला मिळेल. हे पाणी दिल्लीगेट , शहागंज पाण्याच्या टाकीपर्यंत आणले जाईल. हर्सूल तलावात सध्या मुबलक साठा असल्याने जुलै अखेरपर्यंत पाणीपुरवठा करता येईल असा अंदाज महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी लावत आहेत.

● एकंदरीत वाढत्या उन्हाच्या त्रासात नागरिकांना होणारा पाणी पुरवठा वाढावा यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु आहेत व येत्या आठवड्यात त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील, असा दावा देसाई यांनी व्यक्त केला आहे.

विभागीय आयुक्त आणि प्रशासकांकडुन संयुक्त पाहणी

● हर्सूल तलावापासून जटवाडा रोडवरील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सोमवारी सुरूवात झाली. या कामाची पाहणी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, महापालिकेचे प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांनी संयुक्तपणे केली. त्यानंतर त्यांनी सिडको एन-५ जलकुंभाला भेट दिली. जलकुंभांवरील कारभाराची दोन्ही अधिकार्यांनी झाडाझडती घेऊन टॅकर भरणे बंद केले.व सर्व टॅकर सिडको एन-१ एमआयडीसीच्या जलकुंभावर भरण्याचे आदेश दिले. यावेळी जटवाडा रोडवरील जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी करताना काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का असा प्रश्न केंद्रेकरांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना विचारला.