औरंगाबाद (Aurangabad) : G -20 परिषदेच्या निमित्ताने राज्य सरकारने मनपाला (Aurangabad Municipal Corporation) ५० कोटी, तर शहरातील पीडब्ल्यूडी (PWD) अंतर्गत रस्त्यांसाठी १७ कोटीचा निधी दिला. त्यातून होत असलेल्या कामांचा 'टेंडरनामा' प्रतिनिधीने स्पाॅटपंचनामा केला. यातील पीडब्ल्यूडी व्यतिरिक्त मनपा अखत्यारीतील कामांपैकी कोणत्याही कामाचा मूळ कंत्राटदार (Contractor) कामावर न दिसता सर्व कामे वाटाघाटीने वाटून दिल्याचे सब कंत्राटदारांकडून सांगण्यात आले.
दुसरीकडे वर्क ऑर्डरची प्रोसेस सुरू आहे, म्हणत विदेशी पाहूण्यांच्या स्वागतासाठी तोंडी आदेशाने २५ ते ३० टक्के कमी दराने काम करतोय साहेब, अशी मेहरबानीची भाषा ठेकेदार करत आहेत. दुसरीकडे एकाही कंत्राटदाराच्या हातात वर्क ऑर्डर नसताना मनपा प्रशासन टेंडर काढूनच काम सुरू असल्याचा दावा करते आहेत. यामागे खरे गौडबंगाल काय आहे, हे शोधण्याचे काम करणारा निवडणूक विभाग मात्र अद्याप साखर झोपेत आहे.
शहरात शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीदरम्यान २८ डिसेंबरपासून शासनाने आचारसंहिता लागू केली आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता ज्या दिवशी लागू केली, त्याच दिवशी सरकारने G-20 निमित्त विविध विकासकामांसाठी मनपाला ५० कोटींचा निधी मंजूर केला. मात्र एकीकडे निधी मंजूर दुसरीकडे आचारसंहिता अशा कात्रीत अडकलेल्या मनपा प्रशासनाने मात्र विदेशी पाहूण्यांच्या ये - जा मार्गावर विविध विकासकामे हाती घेतली.
विनावर्कऑर्डर कोट्यवधीची कामे
विशेष म्हणजे ही सर्व कामे अंतिम टप्प्यात असताना अद्याप एकाही कंत्राटदाराकडे कामाची वर्क ऑर्डर नाही. प्रत्येक कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता, सब कंत्राटदारांकडून मुख्य कंत्राटदारांचे भ्रमणध्वनी आणि नाव मिळाले. त्यानंतर प्रत्येकाला संपर्क करून वर्क ऑर्डर कुठे आहे, टेंडर काढले आहे का, आपण सदर कामाची सुरक्षा अनामत रक्कम कोणत्या बॅंकेत भरली, कामगारांचा विमा आणि पीएफ काढला आहे का, असे प्रश्न विचारल्यावर ही सर्व कामे कार्यालयीन प्रोसेसमध्ये आहेत, अद्याप आम्हाला वर्क ऑर्डर दिली नसल्याचे म्हणत कंत्राटदार अधिकाऱ्यांकडे बोट दाखवत आहेत. उघड उघड आचारसंहितेचा भंग करून विनावर्कऑर्डर ऑफलाईन होत असलेल्या या कामांवर प्रश्नचिन्ह उभे राहात आहे.
'टेंडरनामा'ने वृत्त प्रकाशित करताच गुरूवारी (ता. १९) मनपा प्रशासनाच्या कारभाऱ्यांनी टेंडर काढून कामे सुरू असल्याचा दावा केला आहे.
असा आहे मनपाचा दावा
● त्यात G-20 निमित्ताने राज्य सरकारने ५० कोटींचा निधी दिला आहे. त्यातून सुशोभिकरणाची जवळपास ८५ कामे केली जाणार आहेत, तर उर्वरित कामांनाही लवकरच सुरूवात होईल , असे मनपा प्रशासनाचे मत आहे.
● फेब्रुवारी महिन्यात शहरात G-20 निमित्त विदेशी पाहूण्यांच्या शिष्टमंडळासह बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे विदेशी पाहूण्यांच्या स्वागतासाठी मनपाने ऑफलाईन २५ ते ३० टक्के कमी दराने विकासकामे मर्जीतल्या कंत्राटदारांना दिल्याने ही कामे उत्कृष्ट कशी होणार असा प्रश्न उपस्थित करताच ८५ पैकी ६९ कामांना कायदेशिर मंजुरी देऊनच कामे सुरू केल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. त्यापैकी ४४ कामे सुरू आहेत. आता पाठोपाठ उर्वरित १५ कामेही सुरू आहेत. इतर २५ कामे टेंडर प्रक्रियेत असल्याचा दावा मनपाने केला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही कामे मार्गी लागतील, असा दावा मनपा प्रशासनाने केला आहे.