औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील उड्डाणपुलांच्या कठड्यावर आणि दुभाजकात केलेल्या रंगरंगोटी आणि त्यावरील आकर्षक चिंत्रावर सरेआम काळे फासण्याचा उद्योग ठेकेदार (Contractor) जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीने केला आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांना व वर्कऑर्डर मधील अटीशर्तीना कंपनीने तिलांजली दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियुक्त करण्यात आलेल्या या कंत्राटदाराचा उरफाटा कारभार सध्या औरंगाबादेत चर्चेचा विषय बनला आहे. आधी रंगरंगोटी व त्यावर आकर्षक चित्र काढल्यानंतर डांबरीकरण, असा उरफाटा कारभार करणाऱ्या या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी औरंगाबादकरांनी केली आहे.
विशेष म्हणजे काही निर्लज्जांच्या पान - तंबाखू आणि गुटख्यांच्या पिचकाऱ्यात आता ठेकेदाराच्या काळ्या डांबराची भर पडल्याने शहरातील उड्डाणपुलांचे जोड रस्ते, दुभाजक आणि कठड्यांवरील रंगरंगोटीसह चिंत्राची शोभा घालवली आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांना विचारणा केली असता, माझ्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मी स्वतः जाऊन पाहणी केली आहे. रंगरंगोटीसह रस्ता सुधारण्याचा ठेका त्याच्याचकडे आहे. ठेकेदाराला दोन दिवसापूर्वीच दुरुस्ती करण्याची तंबी दिली आहेत, अशा चुकीच्या कामाचा रुपयाही त्याला देणार नाहीत, यात नुकसान त्याचेच असल्याचे त्यांनी टेंडरनामाशी बोलताना सांगितले.
G -20 परिषदेच्या बैठकीनिमित्त शहरात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना शहर चकचकीत दिसावे, यासाठी त्यांच्या येण्या- जाण्याच्या मार्गावरील रस्ते, उड्डाणपुलांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी आधी संपूर्ण रस्त्यांचे डांबरीकरण करा, त्यानंतर रस्ता दुभाजक, पुलांचे कठड्यांवर रंगरंगोटी आणि चित्र काढा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र सूचनांकडे दुर्लक्ष करत या ठेकेदाराने आधी रंगरंगोटी आणि नंतर डांबरीकरण केल्याने झालेल्या सुशोभिकरणावर काळे डांबर फासले गेले आहे. जालनारोडवरील सर्वच उड्डाणपुलांवर हा प्रकार पाहुण औरंगाबादकर संताप व्यक्त करत आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कामावर देखरेख करण्यासाठी नेमलेल्या उप विभागीय अभियंता , शाखा आणि कनिष्ठ अभियंत्यांनी रंगरंगोटी केल्यानंतर डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदाराच्या या उरफाट्या कारभाराबाबत हरकत घेतली नाही, असा सवाल औरंगाबादकर करत आहेत. शहरातील जालनारोडवरील सिडको उड्डाणपूल, मोंढानाका आणि क्रांतीचौक उड्डाणपुलावरील रंगरंगोटी व सुशोभिकरणाचे पार वाटोळे झाले आहे.
फोटो काढा, कारभाऱ्यांना व्हाॅटसप करा
G - 20च्या नावाने शहरात मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ, एमआयडीसी आणि महावितरणकडून कोट्यवधीची कामे सुरू आहेत. ठेकेदारांना कमाई करून देण्यात येत आहे. जागृत नागरिकांनी ते थांबवायला हवे. तसेच फोटो काढून संबंधित विभागाच्या मुख्य प्रशासकांना पाठवावे, जेणेकरून कारभाऱ्यांचा आणि ठेकेदारांचा उरफाटा कारभार समोर येईल.