औरंगाबाद (Aurangabad) : सिडको एन - सहा वार्ड क्रमांक ६२ संभाजी काॅलनी ई - सेक्टर येथील एका कॉंक्रिटच्या रस्त्याचे काम करताना वीजचोरी केल्याने महावितरणकडून ठेकेदाराची केबल जप्त करण्यात आली. त्यानंतर रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदार १५ दिवसांपासून बेपत्ता आहे. या अर्धवट कामामुळे नागरीकांना रस्त्यावरून ये-जा करताना गैरसोय होत आहे. ठेकदाराने रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागात करण्यात आली आहे. मात्र, हे सर्व आरोप ठेकेदाराने फेटाळून लावले आहेत.
नगरविकास खात्याच्या निधीतून होत असलेल्या दहा लाखाच्या कॉंक्रिट रस्त्याच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सदर काम औरंगाबादच्या लक्ष्मण गिर्हे नामक ठेकेदाराला देण्यात आले होते. ठेकेदाराने रस्त्याचे काम झाल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या अंतिम कडेला शोल्डर फिलिंग न केल्याने नागरिकांना वाहन आत - बाहेर काढण्यास त्रास होत आहे. विशेषतः जेष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे नरवडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. प्रत्येकाच्या दारात करण्यात आलेली खोलगट चारी अपघाताला आमंत्रण देत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. मी स्वतः ठेकेदाराने केलेल्या वीजचोरीचा भांडाफोड केल्यानंतर तो मुख्य रस्त्यावरच मातीचे ढिगारे टाकून फरार झाला आहे. त्यामुळे मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. रस्त्याचे काम होऊन १५ दिवसांपासून बारदाना आणि राडारोडो रस्त्यावर पडून असल्याचे नरवडे यांचे म्हणणे आहे.
रस्ता कामात वीजचोरी
नरवडे यांच्याशी संपर्क केला असता धक्कादायक माहिती समोर आली. ठेकेदाराने चक्क महावितरणच्या घरगुती वीज पुरवठा करणाऱ्या सिंगल फेज तारेवर आकडा टाकून वीज चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार माझ्या नजरेत आल्यावर कोणाला शाॅक लागू नये व दुर्घटना घडू नये म्हणून मी स्वतः तातडीने महावितरणला कळवले. यात ठेकेदाराने वीजचोरी करून संपूर्ण रस्त्याची व्हायब्रेटर मशिनने दबाई करून घेतली व कटिंग मशिनने संपूर्ण रस्त्याची कटिंग केल्याचे महावितरणला सांगितले. सदर कामात वीज कनेक्शन चुकीच्या पध्दतीने घेतल्याने महावितरणकडून वीज चोरीचा पंचनामा केला व ठेकेदाराची केबल जप्त केली. मात्र पुढे अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी हातमिळवणी केल्याने काहीही कारवाई केली नाही. याबाबत आम्ही महावितरणकडे देखील पाठपुरावा करणार असल्याचे नरवडे म्हणाले.
ठेकेदारावर कारवाई करा
ठेकेदाराने रस्त्याच्या कामात गैरप्रकार केला आहे. या कामात वीज चोरी केली आहे. यामुळे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी. तसेच त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. मी तक्रार मागे घ्यावी म्हणून ठेकेदाराने मला आर्थिक प्रलोभन दाखवले.
- मनिष नरवडे, तक्रारदार
काय म्हणतात ठेकेदार
टेंडरमधील शेड्यूल 'ब'मध्ये नमूद केल्याप्रमाणेच काम कले आहे. या भागात काम करताना काही कार्यकऱ्यांनी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. काम चालू असताना काही मद्यपींनी मजुरांनी केलेली अलायमेंट तोडण्याचा प्रयत्न केला. ओल्या कामावर मुद्दाम गाड्या चालवल्या. दारू पिण्यासाठी काही मद्यपी हात पुढे करत असत. व्हायब्रेट आणि रोड कटींगसाठी मी मशिन आणल्या होत्या. सर्व काम जनरेटरनेच केले आहे. एक दिवस डीझेल संपल्याने व पंप बंद असल्याने तातडीच्या कामासाठी महावितरणच्या तारावर आकडा टाकला होता, हे मी मान्य करतो. पण चोरीचा उद्देश नव्हता. तक्रारदाराचे आरोप मला मान्य नाहीत. हाती आलेला मोबदला आणि झालेला खर्च पहाता मला पीडब्लूडीने दरवाढ न दिल्याने तोटा सहन करावा लागला आहे.
- लक्ष्मण गिर्हे, ठेकेदार
या संपूर्ण प्रकरणाची मी सविस्तर चौकशी करेल. चौकशीत ठेकेदार दोषी असेल तर कारवाई केली जाईल.
- अशोक येरेकर, कार्यकारी अभियंता