औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहरात सार्वजनिक वाहतूक (Public Transport) अजून परवडणारी, सुरक्षित व सोयीस्कर बनवण्यासाठी सुरू केलेल्या ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंजच्या (Transport For All Challenge) पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी दाखवल्यामुळे औरंगाबाद शहर आता दुसऱ्या टप्प्यात भाग घेण्यासाठी पात्र ठरले आहे. ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंजच्या दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरलेल्या 46 शहरांची यादी केंद्र शासनाने सोमवारी प्रसिद्ध केली.
सोमवारी दिल्ली येथे केंद्र सरकारचे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ही यादी प्रसिद्ध केली. यावेळेस गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव व स्मार्ट सिटीज मिशन डायरेक्टर कुणाल कुमार व अन्य माननीय उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचा एक उपक्रम म्हणून ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंज 15 एप्रिल 2021 ला सुरू करण्यात आले होते. आयटीडीपी या संस्थेच्या सहायाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नागरिकांच्या वाहतूक गरजा सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
मनपा प्रशासक व आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटीने ट्रान्सपोर्ट फॉर ऑल मोहिमेत भाग घेतला. ट्रान्सपोर्ट फॉर ऑल या मोहिमेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यांमध्ये औरंगाबादने "ट्रान्सपोर्ट फॉर ऑल टास्क फोर्स" स्थापित केले व त्यानंतर सर्वेक्षणाद्वारे नागरिकांची वाहतूक संबंधी समस्या जाणून घेतल्या आणि शहराच्या 5 मुख्य समस्यांची निवड केली. यात रिक्षेवाले, बस ड्रायव्हर व कंडक्टर यांचेही मत नोंदवण्यात आले. पार्किंग व्यवस्थेचा अभाव, रिक्षा भाड्यात अनियमितता, चालकाद्वारे ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन, बस व अन्य वाहतूक मध्यामांबद्दल अपुरी माहिती या समस्या समोर आल्या. आता या समस्यांवर तोडगा म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी स्टार्टअप्सची मदत कशी घेऊ शकतो यावर विचार सुरू आहे.
या चॅलेंजच्या पहिला टप्पा यशस्वीरित्या पार करणे औरंगाबाद शहरासाठी महत्त्वाचे आहे. पुढच्या टप्प्यांमध्ये नागरिकांना त्यांच्या वाहतूकसंबंधी प्रश्नांना उत्तर देण्याचे कार्य होईल.
या चॅलेंजसाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे व स्मार्ट सिटी बसचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनीकर यांचा मार्गदर्शनाखाली उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड, विश्लेषक सागर इंगळे व माध्यम विश्लेषक अर्पिता शरद हे काम करत आहेत.