Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबाद : 5 वर्षांपासून मिळेना 5 लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : सिडको एन-सात परिसरातील आंबेडकरनगरमधील पिसादेवी रोड ते स्मशानभूमीलगत रस्त्यावरील नाल्याचा स्लॅब कोसळला आहे. जागोजागी मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. पावसाळ्यात नाला भरून वाहतो. त्यामुळे उघडा नाला धोकादायक बनला आहे. गेल्या पाच वर्षांपासून या धोकादायक नाल्याची दुरूस्ती करण्यासाठी मी वार्ड अभियंत्यांपासून कार्यकारी अभियंता ते पालिका आयुक्तांना वेळोवेळी पत्रे दिले, मात्र प्रत्येक वेळी निधी नसल्याचे सांगत अधिकारी वेळ मारून नेत असल्याचा आरोप या भागातील नगरसेविका, प्रभाग सभापती भारती सोनावणे यांनी केला आहे.

दुसरीकडे वार्ड अभियंता सुनिल जाधव यांना विचारणा केली असता नेहमीप्रमाणे दोन महिन्यापूर्वीच पाच लाखांचे अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठांना पाठवले आहे. मंजुरी मिळाल्यावर काम सुरू करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आंबेडकर चौक - पिसादेवी रोड - सार्वजनिक स्मशानभूमीच्या मधोमध पाच फुटांचा नाला आहे. दिवसरात्र या मार्गावर एसटी बसेस, चारचाकी, दुचाकी वाहनांची वर्दळ असते. या मार्गावरच राजे छत्रपती शिवाजी महाराज जाधववाडी बाजार संकुल, तसेच चिकलठाणा एमआयडीसी असल्याने अवजड वाहनांची आणि कामगारांची देखील रात्री-अपरात्री वर्दळ सुरू असते. धक्कादायक म्हणजे, स्मशानभूमीच्या कडेला नाल्याला पडलेल्या खिंडारामुळे नागरिकांना धोका असल्याचे सांगत सहा महिन्यांपूर्वी अंत्ययात्रेत आलेला एक तरूण खिंडारातून नाल्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे येथील रिक्षाचालकांनी सांगितले. शिवाय उघड्या नाल्यात मुकी जनावरे पडून मृत्युमुखी पडतात. त्याची दुर्गंधी पसरत असल्याचे देखील नागरिकांनी सांगितले.

शालेय विद्यार्थी, तसेच कामगारांची ने-आण करणाऱ्या बसगाड्या, ॲटोरिक्षा, तसेच खाजगी प्रवासी वाहनांसह एसटी बसेस येथेच उभ्या केल्या जातात. शिवाय या धोकादायक नाल्याच्या कडेलाच फळ भाजी विक्रेते, चहाची हॉटेल उभे राहतात. शिवाय येथे रिक्षा आणि टॅक्सिस्टॅन्ड देखील आहे. नजरचुकीने कुणाचा पाय अथवा वाहन नाल्यात पडल्यास दुखापत होऊ शकते. लहान मुलेही नाल्याच्या आसपास खेळत असतात, त्यांच्या जीवालाही धोका आहे.