औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद लेणी - जटवाडा या रस्त्याचे भाग्य लवकरच उजळणार असून, या रस्त्याच्या दर्जोन्नतीसाठी तीन कोटीचा प्रस्ताव नुकताच शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामुळे पर्यटक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि कामगारांची वाट सुकर होणार आहे.
औरंगाबाद व फुलंब्री तालुक्याला जोडणारा हा रस्ता शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, कामगार, विशेषतः देशविदेशातील पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. नागसेनवन, पाणचक्की, विद्यापीठ रोड, सोनेही महल, मकबरा ते औरंगाबाद लेणी हे रस्ते चकाचक झाल्यानंतर औरंगाबाद लेणीपासून पर्यटकांना थेट अजिंठा लेणीकडे जाता येईल, यावर तोडगा काढण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
बिबी का मकबरा ते औरंगाबाद लेणी प्रमुख जिल्हा मार्ग ४२ याच रस्त्याला जोडणारा हनुमान टेकडीच्या पाठीमागून ते जटवाडा असा हा डोंगराच्या खालून वळण मार्ग आहे. जटवाडापासून हा रस्ता दक्षिणेकडे हर्सुल कारागृह व्ही.आय.पी. रस्त्याला जोडतो, तर उत्तरेकडे फुलंब्री - खुलताबाद - वेरूळ महामार्ग आणि औरंगाबाद - अजिंठा - जळगाव या राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याचे काम करतो.
औरंगाबादेतील जगप्रसिध्द असलेला मकबरा, पानचक्की, सोनेरीमहल , औरंगाबाद लेणी पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक शहरात दाखल होतात. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीतूनच त्यांना या ऐतिहासिक वास्तुंचे दर्शन करण्यासाठी प्रवास करावा लागत असे. मात्र आता औरंगाबाद लेणी ते जटवाडा रहदारीची उत्तम सुविधा या रस्त्यामुळे होणार असल्याने वेरूळ - अजिंठाकडे प्रवास करणार्या सर्व पर्यटकानांना शहरातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आत - बाहेर पडण्यासाठी या रस्त्यामुळे अनेक गैरसोयी दूर होणार आहेत.
या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला २०२२ - २३ च्या अर्थसंकल्पात ८० लाख रुपये मिळाले होते. त्यातून तीन काॅंक्रिट पुलांचे व रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम मार्गी लागले आहे. आता २०२३-२४च्या अर्थसंकल्पात या रस्त्याच्या रुंदीकरण व काॅंक्रिटीकरणासाठी ३ कोटीची तरतूद व्हावी, असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत शासनाला पाठविण्यात आला आहे.
गेल्या शेकडो वर्षापासून औरंगाबाद लेणी आणि जटवाडाच्या पहाडाच्या कुशीतून जाणाऱ्या या रस्त्याची दुरूस्ती व्हावी, अशी कल्पना आजवर कुणाला सुचलीच नव्हती. हा रस्ता फक्त दीड किलोमीटर लांबी व पाच मीटर रुंदीचा आहे. दिवसाफक्त आसपासच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी या रस्त्याचा वापर करत असत.
मोठे जंगल आणि पहाड असल्याने सायंकाळनंतर वाटमारीच्या भितीने इकडे कोणी फारसे फिरकत नसत. पर्यटकांना शहरात ये - जा करताना मोठा वळसा घालून कोंडीतून यावे लागते. मात्र आता हा रस्ता विकसित केला जाणार असल्याने पर्यटकांचा वेळ आणि पैशात बचत होणार आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी दीड वर्षापासून रस्त्याचा सर्व अभ्यास करून माजी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता व शहरातील व शहराबाहेरील पर्यटन स्थळांना हा रस्ता किती महत्वाचा आहे हे शासनाला देखील पटवून दिले होते.
सद्यःस्थितीत या रस्त्याच्या बांधकामाला शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. रस्ता विकसित होणार असल्याने या भागातील ओव्हर, जटवाडा, हर्सूल व बेगमपूरा परिसरातील शेतकरी, व्यापारी, मजूर, तसेच विद्यार्थांसह पर्यटकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. या भागातील जनतेस शहर जवळ होणार आहे.