औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादचे ‘अ’ श्रेणीतील मॉडेल रेल्वेस्टेशन स्वच्छतेबाबत 'ढ' असल्याचे टेंडरनामा पाहणीत उघड झाले आहे. टेंडरनामा प्रतिनिधीने स्टेशनसंदर्भात वृत्त मालिका प्रकाशित केल्यानंतर येथील स्वच्छते बाबतीत देखील प्रवाशांनी असंख्य तक्रारी केल्या. त्यानुसार टेंडरनामा प्रतिनिधीने शुक्रवारी सकाळी सव्वानऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत स्टेशन परिसराची पाहणी केली. दरम्यान प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून वर्षाला सुमारे ६० ते ७० कोटींचे उत्पन्न मिळवणाऱ्या या मॉडेल रेल्वेस्टेशन आणि परिसरात मोठ्या प्रमाणात समस्यांच्या विळखा असल्याचे दिसले.
आरोग्य निरीक्षक गायब
विशेष म्हणजे बकाल झालेल्या या रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्थेकडे देखील कानाडोळा असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे स्टेशनवरील स्वच्छतेची जबाबदारी असलेले स्वास्थ निरीक्षक आर. के. चौधरी यांच्या कक्षाला दुपारी एक पर्यंत कुलूप दिसले. प्लॅटफॉर्मवर देखील ते पाहणी करताना दिसले नाहीत. दुरध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नांची देखील उत्तरे देण्यास टाळाटाळ करत रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी आणि कंपनीच्या व्यवस्थापकाकडे बोट दाखवले.
व्यवस्थापक म्हणतात प्रवासी घाण करतात
यानंतर प्रतिनिधीने दिल्ली येथील एन एस सपोर्ट कंपनीचे व्यवस्थापक चंद्रकांत खोपे यांना विचारले असता त्यांनी सदर कंपनीला स्वच्छतेचे तीन वर्षाचे कंत्राट दिल्याचे सांगितले. स्वच्छतेसाठी ३६ कंत्राटी कर्मचारी असून प्रत्येकाला पंधरा हजार वेतन असल्याचे म्हणत हे पब्लिक सेक्टर आहे. नित्यनियमाने सफाई करून देखील प्रवासी घाण करतात असे ते म्हणाले. याशिवाय प्लॅटफॉर्मवर अनधिकृतरित्या अनेकांचा वावर असल्याने घाणीचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
असे आहे अस्वच्छतेचे दर्शन
नुकताच औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर भारतीय रेल्वे प्रशासनाने १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता पंधरवडा मोठ्या थाटामाटात साजरा केला. जागोजागी पोस्टरबाजी करण्यात आली. त्याच पोस्टरजवळ जागोजागी अस्वच्छतेचे दर्शन आज घडत आहे. स्टेशन परिसरातील रस्त्यांवर खड्डे तर पाचविलाच पुजलेले आहेत. तुटलेले बॅरिकेटस्, ठिकठिकाणी वाळण्यासाठी टाकलेल्या कपड्यांनी रेल्वेस्टेशन परिसर बकाल होत आहे.
कोट्यवधीचे उत्पन्न, सुविधांचे काय?
देशभरातील रेल्वे स्टेशनच्या ए दर्जाच्या यादीत समावेश असलेल्या या स्टेशनवरून रेल्वे प्रशासनाला ६० ते ७० कोटींवर उत्पन्न मिळत असताना त्या गतीने रेल्वेस्टेशनचा विकास होत नसल्याची खंत देखील प्रवाशांनी व्यक्त केली. कोट्यवधीचे उत्पन्न देणाऱ्या रेल्वेस्टेशनवर सोयी-सुविधांत सुधारणा आणि वाढ करण्याची गरज आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
रेल्वे स्टेशन परिसरात ठिकठिकाणी उघड्यावरच लघुशंका केली जात असल्याचे प्रकार होत असल्याने महिला प्रवाशांना खाली माना घालूनच आत - बाहेर पडावे लागते. मोडक्या जुन्या इमारतीचे प्रवेशद्वार बंद केल्याने तेथे आत - बाहेर भिकाऱ्यांचे निवारागृह तयार झाले आहे. प्रवेशद्वार बंद केल्याने एकाच नव्या इमारतीतून प्रवाशांची ये - जा होत असल्याने प्रवाशांना चेंगराचेंगरीचा सामना करावा लागत आहे. याचा फायदा घेत चोरट्यांची चांगलीच दिवाळी साजरी होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. याच जुन्या इमारतीसमोरील ड्रेनेजच्या चेंबरची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
नव्या इमारतीसमोरील पोलिस चौकी बेवारस अवस्थेत असून अनेक जण अनधिकृत ताबा घेत आहेत. या चौकीचा आराम करण्यासाठी अनेकांकडून वापर केला जात आहे. रेल्वेस्टेशनवरील ही परिस्थिती दूर करण्याची मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे.
मेटल डिटेक्टर बंद
रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीमध्ये प्रवेश करताना सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टर लावण्यात आले. परंतु, आजघडीला ते बंदच असून, ते केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. याठिकाणी लावलेले लोखंडी बॅरिकेट काढण्यात आले. बॅरिकेट अभावी रेल्वेस्टेशनमध्ये ये-जा करणारे प्रवासी मेटल डिटेक्टरच्या बाजूने ये-जा करतात. त्यामुळे रेल्वेस्टेशनची सुरक्षा धोक्यात येत आहे.