औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना विदेशी पाहुण्यांच्या मार्गावरील कचरा लपवण्यासाठी महापालिका प्रशासनाने वेगळेच ‘जुगाड’ जुळवल्यामुळे ठेकेदाराला (Contractor) मोठा आर्थिक फायदा होणार आहे. यासाठी चक्क १७ लाख ७० हजाराचे टेंडर (Tender) काढण्यात आले असून, त्यामुळे काही अधिकाऱ्यांची सोय देखील होणार असल्याची शहरभर चर्चा आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडून ३ फेब्रुवारी रोजी बी - २ पध्दतीचे एक टेंडर प्रसिध्द करण्यात आले. यात औरंगाबाद शहरात दिनांक २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान विविध राष्ट्राचे प्रतिनिधी येणार असल्याचा उल्लेख करत त्यांच्या स्वागतासाठी मुख्य रस्त्यावर तिरंगी पडदे व कार्पेट लावण्याचा उल्लेख केला आहे.
या कामास महापालिकेच्या प्रशासकांची मान्यता मिळाल्यानंतर अल्प कालावधी (Short Ttender) सात दिवसांच्या मुदतीसाठी महापालिकेचे उपायुक्त तथा नोडल अधिकाऱ्याच्या मान्यतेने ते प्रसिध्द करण्यात आले होते. यात तीन ठेकेदार सहभागी झाले होते.
मर्जीतल्या ठेकेदारासाठी अशी केली 'शाळा'
टेंडर काढण्यापूर्वी महापालिकेतील उद्यान व वृक्ष प्राधीकरण विभागाने एका खाजगी मंडप व्यावसायिकाकडून अंदाजपत्रक मागवले होते. त्यात याकामासाठी १५ लाख रूपये खर्च येणार असल्याचे समोर आले. त्यानंतर महापालिकेतील एका शाखा अभियंत्याने मर्जीतल्या एका ठेकेदाराला १४ लाख ९४ हजाराची रक्कम भरण्याचे कळवले. हुशार ठेकेदाराने तितक्याच रकमेचे टेंडर भरल्याने त्याला याकामाची लाॅटरी लागली. १७ लाख ७० हजाराच्या या कामात एक टक्का इसारा रक्कम म्हणून १७ हजार ७० रूपये व सुरक्षा अनामत रक्कम म्हणून ३५ हजार ४०० व ६०० रूपये रकमेचे हे टेंडर होते. यात वर्ग १ ते ७ ठेकेदारांना आवाहन केले होते.
असा आहे कचरा लपविण्याचा जुगाड
विविध राष्ट्रांच्या प्रतिनिधींना त्यांच्या मार्गावरील मुख्य रस्त्याच्या बाजुला असलेली जुनाट घरे, कचरा, गवत आणि रानटीझुडपे दिसू नयेत, यासाठी दहा फूट उंचीचे लोखंडी पाइप गाडून त्यावर नवे तिरंगा कापड लावणे, तसेच त्याखाली कार्पेट अंथरणे शहरात जवळपास सहा हजार मीटरमध्ये हे काम होणार आहे. यासाठी साठ हजार स्केअरफूट कार्पेट अंथरले जाणार आहे. कारपेट आणि तिरंग्याचे कापड मिळून ठेकेदाराला ५५ रूपये रनिंग मीटर प्रमाणे पैसे दिले जाणार आहे.
दुसरीकडे अशाच पध्दतीने विदेशी पाहुण्यांच्या मार्गावर जीथे घाण कचरा आहे त्या पुढे G -20 ची ब्रॅंडींग करण्यासाठी दहा ते बारा फुटाच्या होर्डींग लावण्यात आल्या आहेत. यासाठी ५० लाखाचे टेंडर काढण्यात आले असून शहरातील पाच ठेकेदारांची तुंबडी भरण्यात आली आहे.टेंडरनामाने या कामाची पाहणी केली असता इतक्या पैशात या जागा कायमच्या स्वच्छ करून तेथे सौंदर्यबेट तयार झाले असते.