Aurangabad Tendernama
मराठवाडा

सारोळ्यातील विकासकामांचे महालेखापाल कार्यालय करणार का परिक्षण?

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : कास पठारच्या धर्तीवर सारोळा निसर्ग पर्यटन केंद्र परिसराचा विकास केवळ कागदोपत्री करण्यात आल्याचे टेंडरनामाच्या पाहणीत समोर आले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०१८ पासूनच येथील प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले होते. त्यानुसार इको टुरिझम राज्य योजनेसह तसेच विविध सरकारी योजनेतून कोट्यावधीच्या योजना लाटल्या गेल्या. मात्र, मिळालेल्या निधीतून कुठेही विकासकामे झालेली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे वन विभागाने विविध सरकारी योजनेतून मिळवलेल्या कोट्यावधींच्या कामांचे नागपूरच्या महालेखापाल कार्यालयामार्फत परिक्षण करणे गरजेचे आहे.

औरंगाबाद-अजिंठा राज्य महामार्गावरील औरंगाबादपासून अवघ्या २४ किमी अंतरावर असलेल्या फुलंब्री तालुक्यातील वन क्षेत्राने वेढलेल्या ५० कुटुंबांचे सारोळा हे छोटेसे गांव. हे गाव चौका घाटापासून ७ किमी अंतरावर आहे. घनदाट झाडाझुडपांनी आणि डोंगरमाथ्याने वेढलेल्या या गावाची निसर्ग किमया वेगळीच. यामुळेच तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपूते यांनी वन पर्यटन स्थळाच्या संकल्पनेतील निसर्गाच्या सानिध्यात रममान होण्यासाठी सारोळा गावचा परिसर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून सज्ज करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या आदेशाप्रमाणे वन विभागाने देखील सारोळ्याचा विकास करण्याचा ध्यास घेतला होता. व त्यानुसार निधी प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले होते.

● इको टूरिझम योजनेअंतर्गत मे २०१८ मध्ये राज्य सरकारने येथे पायाभूत सुविधांसाठी सारोळा निसर्ग पर्यटन केंद्रासाठी पावणे तीन लाखांचा निधी दिला होता . त्यातून बांबू रोपवन घेणे, मिश्र रोपवन, गवत रोपवन आदी कामे केवळ कागदोपत्री करण्यात आली आहेत. प्रत्यक्षात ही कामे कुठेही दिसत नाहीत.

● या वन पर्यटन स्थळाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळामार्फत सन २०२० - २१ मध्ये सुमारे १३ लाख रुपयांचा निधी वन विभागाला प्राप्त झाल्याचे उपलब्ध कागदपत्रावरून दिसत आहे. यातून दोन व्ह्यू पॉइंटसह पॅगोडा साकारण्यात आल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

टेंडरनामा स्पाॅट पंचनामा

यानंतर टेंडरनामा प्रतिनिधीने मंगळवारी १६ ऑगस्टला औरंगाबाद ते सारोळा २४ किमी दुचाकीने प्रवास करत हे निसर्गरम्य ठिकाण गाठले. तेथून समुद्र सपाटीपासून एक हजार मीटर उंचीवर असलेल्या या दोन्ही व्हु पाॅईंटच्या पाहणीस सुरूवात केली. गावाच्या उत्तरेला असलेल्या घनदाट हिरव्यागार पहाडाची चिखलमय आणि खडकाळ पायवाटेतून प्रतिनिधीने पायी प्रवासाला सुरूवात केली. सुरूवातीलाच ४५ मीटर अंतरावर घाटाच्या वळणमार्गाच्या पूर्वेला विश्रामगृह नजरेत पडली. आडव्या पडलेल्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला असता कुलुपबंद विश्रामगृहात खकान्यात अडकलेल्या टेबलखुर्च्यां अस्पष्ट दिसत होत्या. निर्मणूष्य कुलुपबंद विश्रामगृहाकडे येणाऱ्या वाटाही ढासळलेल्या दिसल्या. रानटी झुडुपांनी वेढा घातलेल्या या विश्रामगृहालगत अस्वच्छ प्रसाधनगृहांनी पर्यटकांची तारांबळ उडालेली दिसली.

असुरक्षित तळे

सारोळा गाव परिसरातील ६३७ हेक्टर वनक्षेत्राबरोबरच वन विभागाने एक वनतळे तयार केलेले आहे. दुसरीकडे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत लघु पाटबंधारे प्रकल्पाने देखील एक वनतळे तयार केलेले आहे. मात्र, निसर्गरम्य झाडाझुडपात नटलेले ही वनतळे असुरक्षित असल्याने मागील पाच वर्षात २९ युवकांचा बळी गेल्याची आकडेवारी समोर आली.

धोकादायक व्ह्यू पाॅईंट

पुढे सारोळा गाव परिसरातील डोंगरमाथा, डोंगरकडा व दर्‍यांचे दर्शन घेत प्रतिनिधीला ४५ मीटर लांब अंतर कापल्यावर व्ह्यू पॉईंट दृष्टीस पडला. तर त्याच्या पाच मीटर अंतरावर दुसरा व्ह्यू पॉईंट दृष्टीस पडला. यावरुन औरंगाबाद शहर व चौका घाट राज्य महामार्गाचे विहंगम दर्शन घडवण्यासाठी पठाराचे रूंदीकरण व सपाटीकरण करून हे धोकादायक व्ह्यू पाॅईंट तयार केले आहेत. कुठलेली संरक्षक कठडे नसलेले हे व्ह्यू पाॅईंट अपघातासाठी धोकादायक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

ऐतिहासिक हौदाचा केला कचरा

पहिल्या व्ह्यू पॉईंटच्या पायथ्याशी श्री गणेश मंदिरा नजीक काळ्याशार पाषाणात पुरातनकालीन दगडात कोरलेला हौद दिसला. ९ फुट खोली ७ मीटर लांबी व ५ मीटर रूंदी असलेल्या या हौदाचा सद्य:स्थितीत कचरा झालेला दिसला. ऐकेकाळी येथे बाराही महिने पाणीसाठा होत होता. याचा फायदा जनावरे, पर्यटक व गावकर्‍यांना होत असे. तसेच मंदिरातील वेळोवेळच्या धार्मिक कार्यक्रमांसाठी याच पाण्याचा उपयोग होत असे. मात्र वन विभागाच्या दुर्लक्षाने हौदाचा कचरा झाल्याचे दिसले.

बारा वर्षापूर्वीचे शेड गंजले

टेंडरनामा प्रतिनिधीने सारोळा पर्यटन स्थळाच्या विकासकामांची अगदी बारकाईने माहिती घेतली असता वॉच टॉवर व अन्य किरकोळ कामांसाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळाकडून २००९-१० या आर्थिक वर्षात ४ लाख ६८ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती एका विश्वसनीय सुत्राने पुराव्यासह दिली. मात्र या निधीतून दहा हजार रूपये खर्च करून गणपती मंदिर परिसरालगत १५ बाय २० फुटाचा गोलाकार सिमेंट चबुतरा बांधण्यात आला आहे. त्यावर तितक्याच आकाराचे फायबर शेड उभारण्यात आले. त्यालगतच तिसरा व्ह्यू पॉईंट उभारला आहे. मात्र या दोन्ही व्ह्यू पॉईंटची दयनीय अवस्था झाली असून, पर्यटकांसाठी ते असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. वन विभागाच्या दुर्लक्षित कारभाराने दुरूस्तीकडे गत बारा वर्षापासून दुर्लक्ष असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

विश्रामगृहांचे खंडर

सारोळा गाव परिसराला लागूनच डोंगराच्या पायथ्याशी ब्रिटीश-निजाम काळातील एक जुने व सुंदर विश्रामगृह होते. त्याच्या जोडीला ५० वर्षांपूर्वी वन विभागाने दुसरे एक विश्रामगृह बांधण्यात आले होते. मात्र सद्य:स्थितीत कालमर्यादा संपलेल्या या विश्रामगृहाच्या फुटकळ दुरूस्तीच्या नावाखाली केवळ निधी लाटला जातो. मात्र, दुरूस्तीकडे कानाडोळा केला जात असल्याने या स्थळाला अवर्जून भेट देणाऱ्या पर्यटक व शाळकरी मुलांची आबाळ होताना दिसली.

खऱ्याअर्थाने विकास व्हावा

अजिंठा, वेरुळ या जागतिक पर्यटन स्थळाबरोबरच म्हैसमाळ या थंड हवेच्या पर्यटन स्थळासारखाच सारोळा वन पर्यटन स्थळाचा देश-विदेशातील पर्यटक लाभ घेण्यासाठी येतात. मात्र येथे पुरेशी पार्किंग, स्वच्छतागृहे आणि चांगले उपहारगृह देखील नाही. राज्य आणि केंद्र सरकारकडे निधी प्राप्तीसाठी पाठवलेल्या प्रस्तावानुसार विकासकामे होत नाहीत. बाराण्याचा प्रस्ताव मात्र चाराण्याचा देखील विकास होत नाही. त्यामुळे वन विभागामार्फत संयुक्त या स्थळाचा विकास घडवताना प्रामाणिकपने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

रानमेवा आणि चाऱ्याच्या रकमेतून होऊ शकतो विकास

या परिसरात निलगायी, हरीण, रानडुक्कर, कोल्हे, पालींदर, मोर व अन्य पशुपक्षी तसेच सरपटणारे अजगर, फुरसा यासारखे प्राणी पहावयास मिळतात. ऋतूचक्रानुसार बिबा, करवंदे, चारोळी, टेंभूर्णे यासारख्या रानमेव्यांपासून देखील वन विभागाला मोठे उत्पन्न मिळते. त्यात जुनी आणि जीर्ण , किड लागलेली वृक्षतोड देखील मोठ्या प्रमाणावर होत असते. चार्‍यापासून मिळणार्‍या उत्पन्नातील अर्धी रक्कम वनक्षेत्र परिसरातील गाव विकासाच्या किरकोळ कामासाठी खर्च करुन उर्वरित अर्धी रक्कम वन विभागाकडे सरकार दरबारी जमा केली जाते. हा निधी जरी पायाभूत सुविधांसाठी योग्य रित्या खर्च केला तरी या निसर्गरम्य पर्यटन स्थळाचा विकास होऊ शकतो असे येथील ग्रामस्थांनी प्रतिनिधीला सांगितले.